संगमनेरातील घारगाव पोलिसाला खोपोली पोलिसांकडून अटक! गुटख्याची गाडी पोलीस संरक्षणात पोहचविली पुण्यात!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे तात्पुरत्या स्वरूपात नेमकणुकीस दिलेल्या एका पोलीस कर्मचार्याने चक्क अवैध वाहतूक करणार्या गुटक्याचा वाहनाला मदत केली. तसेच या व्यावसायासाठी भांडवल पुरविले. तसेच नेमणुकीस दिलेल्या ठिकाणी न थांबता गुटख्याच्या वाहनासोबत थेट जुन्नर तालुक्यातील भोरवाडी पर्यंत संरक्षण दिले. याप्रकरणी त्यास रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यास काल न्यायालयात हजर केले असता उद्यापर्यंत (दि.19) पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवाजी कावडे असे या बहाद्दराचे नाव आहे. हे पुर्वी नाशिक पोलीस दलात होते. काही वर्षापुर्वी त्यांनी नगरला बदली करुन घेतली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कावडे याची नेमणूक पुर्वी पारनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र, ते फार उपद्रवी असल्यामुळे त्यांच्यावर एक गंभीर आरोप झाला आणि त्यांची तडकाफडकी बदली नगरच्या पोलीस मुख्यालयात करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसात लॉकडाऊन सुरू झाले आणि सांगमनेर तालुक्यासाठी पोलीस अधिक्षकांनी अतिरिक्त पोलीसबळ दिले. त्यात शिवाजी कावडे यांचा सामावेश होता. आता या महाशयांना घारगाव पोलीस निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली आळेखिंड येथील चेकपोष्ट येथे नेमणूक दिली होती. त्यामुळे, खर्या अर्थाने चोराच्या हाती तिजोरी दिल्यासारखे होते. कारण, चेकनाक्याहून तर फार मोठी आयात निर्यात होते. त्यामुळे, त्यांची बदली हेतुपुर्वक तर तेथे केली नव्हती ना? असा प्रश्न अनेकांनी उभा केला आहे. कारण, घारगाव हाद्दीतून पुणे जिल्ह्यात अगदी राजरोस वाळुच्या गाड्या पुणे जिल्ह्यात जातात. मात्र, याच ठिकाणातून गुटखे देखील सुखरून पुणे तालुक्यात पोहचविण्याचे काम केले जात होते. हे कार्यक्षम अधिकारी क्षिरसागर (खोपोली) यांच्यामुळे समोर आले आहे.
या पोलिसांनी सखोल माहिती घेतली असता कावडे हा कर्मचारी या वाहनाला प्रोटेक्ट करीत थेट जुन्नर तालुक्यातील भोरवाडी येथे गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी कावडे यांस तेथून अटक करुन थेट खोपोली पोलीस ठाण्यात नेवून बंद केले. तोवर या प्रकाराची कोणाला कानोकान खबर नव्हती. मात्र, त्यानंतर तेथील पोलीस ठाण्यातून थेट नगर पोलीस अधिक्षक कार्यालयात पत्र आले की, नगर पोलीस दलातील शिवाजी कावडे याचा गुटखा प्रकरणात हात असून त्यास अटक करण्यात आली आहे. त्यानंतर नगरच्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान संगमनेरात कोविडने 90 पर्यंत मजल मारली आहे. तर जवळपास 40 पेक्षा जास्त रुग्ण हे विनापरवाना संगमनेरात दाखल झाले आहे. त्यामुळे हे चेकनाके कशासाठी होते? हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. एकीकडे नांदुर चेकनाका येथे सुजाता थोरात ही पोलीस कर्मचारी जीव ओतून ड्युटी करते तर पोलीस निरीक्षक संजय कवडे यांनी याच चेकनाक्यावर चांगले कर्तव्य बजावले म्हणून दोन हजार रुपयांचा सन्मान होतो. इतकेच काय! शहर वाहतूक शाखेचे अधिकारी पप्पू कादरी हे दिवसभर तेथे तळ ठेकून कर्तव्य बजावत असताना दुसरीकडून पुण्याच्या आळेखिंड चेकनाक्यावर अशा प्रकारे खाकीला लाजवेल असे कृत्य होत असेल तर अप्पर पोलीस अधिक्षक व पोलीस उपअधिक्षक, स्थानिक पोलीस निरीक्षक यांचा कर्मचार्यांवर धाक व वचक कसा नाही? असाही प्रश्न संगमनेरकरांनी उपस्थित केला आहे.
हा प्रकार करताना त्यांचे कोणी साथिदार होते. त्यांच्या सोबत कोणकोण सामिल आहे, हा प्रकार कोणाला माहित कसा झाला नाही. माहित होता तर मग वरिष्ठांना सांगितला का नाही. असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. यापुर्वी देखील तत्कालीन पोलीस अधिक्षक सौरभ त्रिपाठी यांनी खात्याशी गद्दारी करणार्या अनेक पोलीस कर्मचार्यांना खात्यातून निलंबित केले आहे. इतकेच काय! अनेकांना खात्यातून काढून देखील टाकले आहे. त्यांच्या कार्यकाळात जवळपास 40 पोलिसांचे वेगवेगळ्या कारणास्तव निलंबन करण्यात आले होते. त्यांना त्यावेळी निलंबनका बादशह असे म्हटले जात होते. मात्र, त्यांनी चुकीला कधी माफी दिली नाही. त्यामुळे त्यांचा खाकीवर एक वेगळाच वचक होता. तर तत्कालीन पोलीस अधिक्षक लखमी गौतम यांनी अनेक उचापती खोर पोलिसांच्या कुंडल्या जमा केल्या होत्या. जेव्हा बदल्या करण्यात आल्या तेव्हा जे खाकीचे कलेक्टर आणि गेली वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी हुकूमत गाजविणार्या पोलीसांच्या राजूर, जामखेड, नेवासा, अकोले, घारगाव, कोपरगाव अशा ठिकाणी बदल्या करुन त्यांची खोड मोडली होती.
त्यामुळे आता कावडे यांच्याबाबत पोलीस अधिक्षक मोठा निर्णय घेतील यात शंकाच नाही. मात्र, खाकीला बदनाम करणार्या आणि खाकीच्या आडून धनबलाढ्य होणार्या व्यक्तींसाठी ते काय करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच कावडे याच्याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यातून सखोल चौकशी झाल्यास अधिक माहिती मिळू शकते. त्यामुळे खोपोली पोलिसांच्या व्यतीरिक्त पारनेर आणि घारगाव येथे कसून चौकशी आवश्यक असल्याचे खाकीतून बोलले जात आहे.