तहसिलदारांच्या गाडीपुढे वाळुचा ट्रॅक्टर! मग काय! रायत्याच्या तस्करावर ठोकला गुन्हा!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी गावात खुद्द संगमनेर तहसिलदार यांनी रायते येथील वाळुचा ट्रॉक्टर पकडला आहे. ही कारवाई बुधवार दि.24 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास केली. याप्रकरणी वसंत सखाहरी माळी (रा. रायते) याच्यावर तहसिलदार अमोल निकम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमोल निकम यांनी प्रांताधिकारी यांची बैठक आटपून ते कुरण येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे तेथील आढावा घेण्यासाठी ते निघाले होते. कुरणकडे जात असताना सुकेवाडी परिसरात असताना त्यांच्या सरकारी वाहनाला एका नंबर नसणारा टॅक्ट्रर दिसला. त्यानंतर त्यांचे वाहन चालक रवि थोरात यांनी संबंधित ट्रॅक्टरला वाहन आडवे लावून त्याची सखोल चौकशी केली. त्यात पुर्ण वाळु भरलेली होती. याबाबत वाहन चालकास विचारणा केली असा त्याने उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. त्याचे नाव विचारले असता त्याने वसंत माळी असे सांगितले.
दरम्यान ही वाळु चोरीची आहे. असे लक्षात येताच तहसिलदार यांनी माळी याच्याकडे वाहनाची कागदपत्रे मागितली तसेच वाळु वाहतुकीचा परवाना मागितला मात्र, यापैकी या बहाद्दराकडे काहीच नव्हते. त्यामुळे हा ट्रॉक्टर थेट पोलीस ठाण्यात आणण्यात आला. स्वत: तहसिलदार यांनी फिर्यादी होत या वाळुतस्कराच्या मुसक्या आवळल्या. ही माहिती तालुक्यात पसरली असता अनेकांनी आपली वाळुतस्करी रात्रभर बंद ठेवली होती. या गुन्ह्याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात वाळु चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या वाहन चालकाला अटक करुन फारसे काही होते की नाही माहित नाही. मात्र, ट्रॅक्टर मालक, तसेच संगनमताने होणारी तस्करी अशी मोठी साखळी जोवर आरोपीच्या पिंजर्यात टाकत नाही. तसेच त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई तसेच तडीपारीचे प्रस्ताव तयार केले जात नाही, तोवर ही वाळुतस्करी संपुष्टात येणार नाही.
तहसिलदार महोदय असेच एकदा पठार भागावर गेले तर त्यांना अशा अनेक वाळुच्या गाड्या इकडून तिकडे जाताना दिसतील. सध्या चार गाड्या 24 तास सुरू असून काही वाळुच्या गाड्या थेट संगमनेर ते अकोले अशा मार्गस्त होतात तर काही पठार ते पुणे ग्रामीण असा प्रवास करतात. त्यामुळे वारंवार पठार भागाहून तक्रारींचा पाऊस पडतो. त्यामुळे हकनाक महसुलखाते बदनाम होत आहे. आज तहसिलदार यांनी केलेल्या कारवाईचा अनेकांनी धसका घेतला असून जर असे महसुलचे एखादे पथक तयार केले तर फार मोठा महसूल शासनासाठी जमा होऊ शकतो.
हे वरवर कारवाईसाठी गोडगोड वाटले तरी संगमनेरात अनेक बडे नेते आहेत. त्यांच्या वलयाखाली अनेकांचे धंदे जोरात सुरू आहे. त्यामुळे, पोलीस, महसूल, राज्य उत्पादन शुल्क असे अनेक विभाग आहेत. जे कारवाई करण्यासाठी इच्छूक असून देखील राजकीय दबावापोटी कारवाई करताना हातबलता जाणून येते. मात्र, तडाख्यात सापडला त्याची खैर नाही. हे प्रशासकीय अधिकार्यांनी आज दाखवून दिले आहे.