आजी आमदारांच्या विरोधात माजी आमदार थेट कलेक्टर दालनात! कारवाई हाच सरपंच योद्ध्यांचा सन्मान का?
अकोले तालुक्यातील राजूर ग्रामपंचायत आणि सरपंच ते तहसिलदार- आमदार संभाषण अधिक पेटते झाले आहे. तालुक्यातील बहुतांशी सरपंच यांनी आक्रमक भुमिका घेत प्रशासन आणि विद्यमान आमदारांच्या विरोधात बंड पुकारला आहे. तर त्यांच्या पाठीशी माजी आमदार वैभव पिचड हे खंबिरपणे उभे राहिले असून त्यांनी आज सरपंचांचे एक शिष्ठमंडळ घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. घडलेला प्रकार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या कानावर घालून त्यांना एकच प्रश्न विचारला. साहेब, आजवर सरपंच यांनी शासनाच्या तोंडी आदेशाने सगळे लोक स्वत:च्या जिवाची बाजी लावून नागरिकांचे संरक्षण करीत आहेत. त्याचा सन्मान म्हणून तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहात का? त्यांना जिल्हाधिकारी यांनी समर्पक उत्तर देऊन काळजी नसावी असे सांगितल्याचे समजते आहे.
तर आमदार आणि प्रशासन यांचा निर्णय कोविड योद्धे सरपंच यांच्या फार जिव्हारी लागला होता. त्यामुळे सरपंच सेवा मंडळाने प्रशासनाला काही प्रश्न विचारत जाब विचारला होता. तर अकोले तालुक्यातील जवळजवळ सर्वच सरपंच नाराज झाले होते. स्वत:चा जीव धोक्यात घालून कोविडला सामोरे जायचे, जनतेच्या हितासाठी रात्र-रात्र जागायचे, लोकांचे वाद आणि मतभेद अंगावर ओढून घ्यायचे, शासनाकडून कोणता कागद नाही, कोणते संरक्षण नाही आणि जर जनतेच्या हितासाठी कधी गाव बंद केला तर काही लोक लागेच आमच्यावर कारवाई करण्याच्या भाषा करतात! हे योग्य आहे का? त्यामुळे आम्ही घरी बसतो, आमचे अधिकार काढून घ्या आणि गावगाडा लोकप्रतिनिधींच्या ताब्यात द्या. अशा भावना सरपंचांनी व्यक्त केल्या आहेत.
आज मंगळवार दि.30 रोजी सरपंचांचे शिष्ठमंडळ जिल्हाधिकार्यांना भेटले. त्यात माजी आमदार यांनी जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे, सरपंच मंडळाचे काही अंशी समाधान झाले आहेत. आजवर सरपंच यांना शासनाने कोणतेही लेखी आदेश व अधिकार दिले नव्हते. आता मात्र, पिचड यांच्या भेटीनंतर हे लेखी आदेश व अधिकारी प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, अकोले तालुक्यात आजी माजी आमदार यांच्यातील मतभेद आणि तालुक्याचे राजकारण तापताना दिसत आहे. आता सर्व सरपंच यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अशा प्रकारच्या धमक्या आम्ही खपवून घेणार नाही असे त्यांनी अधिकार्यांना कळविले आहे. तर तशा प्रकारे प्रांताधिकारांना देखील निवेदन देण्यात आले आहे.