निळडवंडे कॅनॉलच्या खड्ड्यात वाळुची गाडी पलटी, संगमनेरसह कोंची-मांचीचे तीन तरुण जागीच ठार!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड मंदिरासमोर एक झेनॉन ही वाळुने भरलेली गाडी एका 25 फुट खड्ड्यात पडून त्यात तीन जणांना दुर्दैवी मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना आज रविवार दि. 28 रोजी पहाटेच्या सुमारास घडली. यात वाहन चालकासह तीन तरुणांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पहाटे 7 वाजता संगमनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्रविण भैय्यसाहेब सय्यद (वय 30, रा. संगमनेर खुर्द), विठ्ठल मुरलीधर बर्डे (वय 30, रा. कोंची, ता. संगमनेर), सुरेश संतोष माळी (वय 45, रा. मांची, ता. संगमनेर) अशी मयत झालेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या कोरोनाचा कहर सुरू असला तरी त्यात लॉकडाऊन काही अंशी शिथिल करण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. तर अनेकजण दोन रुपये कमविण्याच्या हेतूने काहीतरी हलचाल करीत आहेत. तालुक्यात भले-भले राजकीय वरदहस्त असणारे खुलेआम वाळु तस्करी करीत आहेत. मात्र, काहीजण स्वत:च्या हिमतीवर असा प्रकार करण्याची धडस करताना दिसत आहे. यातलाच हा एक प्रकार असावा असे अनेकांना वाटते आहे.
रविवारी पहाटे हे संगमनेर तालुक्यातील नर्सरी वाटीचा डोह येथे एक झेनॉन गाडी घेऊन वाळु आणण्यासाठी गेले होते. यांची पहाटेच्या सुमारास गाडीभर वाळु काढून ते परतीच्या मार्गावर असताना हिवरगाव पावसा शिवारात त्यांना रस्त्याच्या बाजुला असणार्या निळवंडे कॅनॉलच्या खड्ड्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे वाहन भरधाव वेगात नेत असताना ते कॅनॉलच्या खड्ड्यात पडले. त्यात या तिघांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.
ही घटना सकाळपर्यंत कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र, काही काळानंतर रस्त्याने ये-जा करणार्या एका व्यक्तीचे लक्ष त्या कॅनॉलच्या खड्ड्यात गेले असता त्याला एका वाहन उपलटी झाल्याचे दिसले तर दोघे अजूबाजुला पडलेले दिसले. एक विशेष म्हणजे जेव्हा अपघात झाला तेव्हा गाडी चालुच होती. काही काळाने ती बंद पडली तरी तिची लाईट चालुच असल्यामुळे तेथे प्रकाश जाणवल्याने हा प्रकार लक्षात आला असावा अशी माहिती प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यानंतर या तिघांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मयत घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान या वाळुचोरी प्रकारामुळे वाळुतस्करी हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अवघ्या तीशीतील तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे, महसूलमंत्र्यांच्या मतदारसंघात असे प्रकार घडतात हे मात्र खरोखर दुर्दैव आहे. असे मत अनेकांनी सोशल मीडियातून व्यक्त केले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात सध्या कोरोना, गोवंशीय मांस आणि वाळु तस्करी हे राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे.