रतनवाडीच्या मुजोर रेशनचे दुकानाचा परवाना तडकाफडकी निलंबित, अकोले तहसिलदारांचा निर्णय!

 
सार्वभौम (राजूर) :
                अकोले तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील रतनवाडी गावातील स्वस्त धान्य (रेशनिंग) दुकानात गैरव्यवहार होत असल्याचे एप्रिल महिन्यात उघडकीस आले होते. लॉकडाऊन काळात सरकारने मोफत धान्य वाटप करण्याचे निर्देश दिले असतांना तालुक्यात बर्‍याच ठिकाणी धान्याचा काळाबाजार, चोरीच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना आपण सोशल मीडियावर अनेकदा ऐकल्या आहेत. पण 25 एप्रिल रोजी रतनवाडी ग्रामस्थांनी गावातील रेशनिंग दुकानदाराची तक्रार पुरवठा अधिकारी व तहसीलदार अकोले यांच्याकडे केली होती. त्याचा वारंवार पाठपुरावा सुरू होता. 2 महिने उलटूनही कारवाई होत नसल्याने आज शुक्रवार दि. 15 रोजी ग्रामस्थांनी तहसीलदार अकोले यांच्या कार्यालयाबाहेर सकाळपासून ठिय्या मांडला होता. कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही असा पवित्रा घेतल्याने अखेर संध्याकाळी उशिरा तहसीलदार साहेबांनी या प्रकरणी कारवाई करत दत्तु लक्ष्मण झडे (रा. रतनवाडी, ता. अकोले) यांना दोषी धरुन त्यांचा दुकानदाराचा परवाना रद्द केला आहे.

       गेल्या काही दिवसांपासून हा बहाद्दर आपला मनमानी कारभार चालवत होता. त्यावर गावकर्‍यांनी आवाज उठविला असता रतनवाडी ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला चांगले यश आले आहे. या दुकानदारावर ग्राहकांना मालाची पावती न देणे, नियमाप्रमाणे व्यक्तीसंख्येत धान्य न देणे, डिसीएसमध्ये कामकाज न करणे, आधार सिडिंग न करणे, नवीन लाभार्थ्यांची यादी न करणे, ग्राहकांशी सौजन्याने न वागणे अश्या प्रकारच्या अनेक त्रुटी व ठपके रेशनिंग दुकानदारावर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा परवाना निलंबित करण्यात आला असून कार्डधारकांच्या सोयीकरिता नजीकचे दुकान रुख्मिणी महिला बचत गट, साम्रद यांना जोडण्यात आले आहे.
                             
दरम्यान अकोले तालुका हा दुर्गम व बहुतांशी अशिक्षित भाग आहे. येथे 600 पेक्षा जास्त योजना आदिवासी आणि अन्य समाजासाठी आहे. मात्र, दुर्दैव असे की, त्यांची माहिती ग्रामस्थांना सोडा, ग्रामसेवक तलाठी आणि बड्याबड्या अधिकार्‍यांना माहित नाही. आपल्याकडे एक तत्कालिन प्रकल्प अधिकारी तुकाराम पिचड होते. त्यांनी अनेक योजना गावागावापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यानंतर कोणी अधिकारी आणि पुढारी त्यासाठी पुढे आला नाही. हा वस: घेऊन स्वप्निल धांडे, विनय सावंत, अमित भांगरे असे अनेक युवा तरुण पुढे येत आहेत. ते अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहेत. त्यामुळे  आदिवासी समाज्याला कोठेतरी न्याय मिळण्याची अपेक्षा वाटू लागली आहे. अकोले तालुक्यात रेशन वाटप घोटाळा आणि गोरगरिबांची अवहेलना यासाठी रतनवाडी हा फक्त, एक नमुना आहे. बाकी बहुतांशी ठिकाणी दुकानदार इतकी मुजोरी दाखवितात की, जसे त्यांच्या घरातून वाटप करीत आहे. तर काही ठिकाणी चांगले दुकानदार देखील आहेत. 
                           
लॉकडाऊन सुरू असताना नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्याच्यावर लक्ष ठेऊन काम करुन घेतले जात होते. आज काही नियम शिथील झाल्यानंतर प्रशासनाने त्याच्यावर कारवाईचा बगडा उचलला आहे. जर अशा प्रकारे जनतेवर अन्याय होत असेल तर तो कोणाला खपत नाही. त्यामुळे, अशा प्रकारचे गैरकृत्य कोणी करु नये. असे आवाहन प्रशासनाने प्रत्येक रेशन दुकानदारांना केले आहे. तर अशा प्रकारे रेशन घोटाळे होत असेल, दुकानदार  फार मुजोरी करुन भ्रष्टाचार करीत असेल तर स्वप्नील धांडे अंबेवंगण यांच्याकडे संपर्क करणे अपेक्षित आहे.
- आकाश देशमुख