एका बुक्कीत त्याने तिचा दात पाडला, सात जणांवर गुन्हा दाखल संगमनेर तालुक्यातील घटना!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यातील दरेवाडी शिवारात शेतात काम करणार्या महिलेचा एका बुक्कीत दात पाडल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. 16 जून रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. यात सुनिता मच्छिंद्र दरगुडे ही महिला जखमी झाली असून याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तु शंकर नागरे, लक्ष्मण शंकर नागरे, अनिल लक्ष्मण नागरे, महेश दत्तु नागरे, अलका नागरे, शैला नागरे, संगिता नागरे (सर्व रा. दरेवाडी, ता. संगमनेर) यांची फिर्यादीत नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुनिता दरगुडे या महिलेच्या भावाने दरेवाडी शिवारात टॉमेटोचे पिक वाट्याने केले आहे. त्याला खत घालण्यासाठी या ताई शेतात गेल्या होत्या. त्यावेळी संबंधित आरोपीत व्यक्ती तेथे आले. त्यांनी या महिलेस आरेरावी करत दमबाजी करण्यास सुरूवात केली. तु आमच्या शेतात यायचे नाही. असे म्हणत दोघांमध्ये बाचाबाचीला सुरूवात झाली. त्यावेळी तिला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. यावेळी महेश दत्तु नागरे यांनी जखमी महिलेस अशी एकच बुक्की मारली की, तिचा खालचा एक दातच पडला. त्यावेळी त्या रक्तभंबाळ झाल्या.
या घटनेनंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. संबंधित घटना पोलिसांना समजली असता त्यांनी जखमी महिलेचे जबाब घेऊन सात जणांवर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी जमावबंदीसह जिल्हाधिकारी आदेशाचे उल्लंघन, मुंबई पोलीस अॅक्ट व अन्य कडक कलमान्वये कठोर कारवाईची पाऊले उचलली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची शोधाशोध सुरू केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी पोलिसांच्या रडारवर असून महिलांना मात्र जामीन घ्यावा लागणार आहे. अशा प्रकारे महिलेवर हात उचलून मारहाण केल्यामुळे अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे.
दरम्यान जिल्ह्यात सर्वाधिक जमीन तक्रारीचे गुन्हे संगमनेर तालुक्यात आहे. येथे वर्ग एकच्या जमीनी वर्ग दोन करुन भल्याभल्या नेत्यांनी जमीनी लुटल्याचे पुरावे सरकारी दप्तरात पडलेले आहे. तर लॉकडाऊन उघडल्यानंतर तब्बल निव्वळ 20 पेक्षा अधिक गुन्हे जमीन वादातून घडलेले आहेत. यात खून करण्यापासून तर हाफ मर्डरपर्यंत असे गंभीर गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यामुळे येथे प्रत्येकाच्या जमिनीच्या सिमारेषा आखून देण्याचे काम भू-संपादन विभागाने करुन देणे आवश्यक आहे. अन्यथा वितभर तुकड्यासाठी असेच मुढदे पडत राहितील. यासाठी लोकप्रतिनिधींना पुढाकार घेणे गरजेचे आहे.