खिरविर्‍यात एका तरुणावर कोयत्याने वार! तिघांवर गुन्हे दाखल! प्रकृती गंभीर!


अकोले (सार्वभौम) : 
                          अकोले तालुक्यातील खिरविरे येथे मुंबईहून आलेल्या व्यक्तींना जागेच्या वादातून ठार मरण्याचा प्रयत्त झाला. हे घर तुमच्या बापाचे नाही, तुम्ही मुंबईतच झक मारायची, इकडे कशाला आले असे म्हणत प्रकाश यशवंत पराड (रा. खिरविरे) यांनी अल्केश नामदेव कराड (वय 38) याच्यावर कोयत्याने वार केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर संगमनेर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात 307 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
                               
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.30 मे रोजी अल्केश पराड हा त्याच्या घरात जेवण करीत होता. यावेळी आरोपी तेजस यशवंत पराड, किरण यशवंत पराड, प्रकाश यशवंत पराड (सर्व. रा. खिरविरे) हे त्याच्या घरासमोर गेले. दरम्यान अल्केशने वादात्मक जागेवर काही वाळु व विटा टाकल्या होत्या. हे सर्व साहित्य आरोपी यांनी काढण्यास सांगितले होते. मात्र, अल्केशने त्यास विरोध केला. या दरम्यानच्या काळात दोघांमध्ये टोकाची बाचाबाची झाली. त्यावर आरोपी त्यास म्हणाले की, हे घर काय तुझ्या बापाचे आहे का? तुम्ही मुंबईतच झक मारायची, इकडे कशाला आले असे म्हणत अल्केशला शिवीगाळ दमदाटी सुरू केली. हा वाद इतक्या टोकाला गेला की, आरोपी यांनी अल्केशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. दरम्यान प्रकाश पराड हे तेथे आले व म्हणाले की, त्याला जीवंत सोडू नका, त्याला संपून टाकू. असे म्हणत तेजव व किरण यांनी अल्केशला धरले व प्रकाश यांनी त्यांच्या कंबरेचा लोखंडी कोयता काढून अल्केशच्या डोक्यावर ठार मारण्याच्या उद्देशाने मारला. परंतु अल्केशने तो हुकविण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र त्याचा वार नाक आणि ओठांवर झाला. हा प्रकार घडल्यानंतर एकच आरडाओरड झाला. त्यामुळे घरातील लोक हा वाद सोडविण्यासाठी आले असता त्यांना देखील मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान अल्केश यास गंभीर मार लागला असून त्यास उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात नेमके कारण काय आहे, घटनेत काहीशी साशंकता आहे, त्यामुळे पोलीस शोध घेत आहेत. मात्र, या घटनेबाबत वेगवेगळी चर्चा सुरू होती. घटना घडल्यानंतर अकोले पोलीस घटनास्थळी गेले होते. त्यांनी घटनेची माहिती घेत स्पॅट पंचनामा केला आहे. त्यामुळे या घटनेचा पोलीस गाभिर्याने तपास करतील यात शंका नाही.