त्या तिघांच्या मृत्युला संगमनेरचा नवले इंजिनिअर व ठेकेदार जबाबदार! तिघांवर गुन्हा दाखल! पाटलाग करणार्‍या खाकी कर्मचार्‍याला सुटका का?


 सार्वभौम (संगमनेर) : 
                        संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा शिवारात झेनॉन ही वाळुने भरलेली गाडी एका 25 फुट खड्ड्यात पडून त्यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला. ही घटना घडल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केले. मात्र, ही घटना होण्यामागे नेमके कोण-कोण दोषी आहे. याचा शोध घेणे गरजेचे आहे. खरंतर पोलिसांनी रस्ता करणार्‍या कंपनीचा कॉन्ट्रॉक्टर व संगमनेरचे इंजिनिअर दादासाहेब अशोक नवले (रा. संगमनेर) यांना आरोपी केले आहे. मात्र, जरा पोलिसांनी अधिक सखोल तपास केला तर लक्षात येईल की एक खाकीतील कर्मचारी या वाहनाच्या मागे लागला होता. तो पोलीस गणवेशात नव्हता मात्र, त्याच्याकडे एक झायलो गाडी होती. ती देखील एका वाळु तस्कराची असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, नुसते कॉट्रॅक्टरच नाही, तर मलिदा गोळा करण्याच्या नादात या व्यक्तीमुळे तीन तरुणांचा मृत्यू झाला असून त्याची सखोल तपास करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक यांनी देणे गरजेचे आहे.
                             
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवार दि. 28 रोजी पहाटेच्या सुमारास चौघा तरुणांनी प्रवरा पात्रातून एक गाडीभर वाळुची चोरी केली होती. त्यानंतर ते पुणे मार्गाने जात असताना त्यांच्या मागावर एक काळ्या रंगाची झायलो गाडी लागली. अर्थात हे सर्व वाळुतस्कर असल्यामुळे त्यांना एकमेकांच्या खानाखुना माहित होत्या. त्यामुळे वाहन चालक परवेज भैय्यसाहेब सय्यद (वय 30, रा. संगमनेर खुर्द) याने आपली झेनॉन 207 एम एच 14 एएच 1073 ही गाडी वेगाने पुण्याच्या दिशेने नेली. आपल्या पाठीमागे खाकी वर्दी लागली आहे. हे माहित असल्यामुळे, मागे पुढे पाहत तो भरधाव वेगाने गाडी चालवत होता. जेव्हा तो हिवरगाव पावसा, निमगाव ठेंभी गावच्या शिवारात खंडोबा मंदीराच्या जवळ गेले असता त्यास समोरच्या खड्ड्याचा अंदाज आला नाही.
                         
 दरम्यान मागे पुढे पाहण्याच्या नादात त्याला वेग आवरता आला नाही. त्यामुळे तो थेट निळवंडे कॅनॉलचे काम चालु असलेल्या 22 फुटी खड्यात जाऊन त्यांची गाडी कोसळली. त्यात परवेज सय्यद याच्यासह विठ्ठल मुरलीधर बर्डे (वय 30, रा. कोंची, ता. संगमनेर), सुरेश संतोष माळी (वय 45, रा. मांची, ता. संगमनेर) अशी तिघे मयत झाले आहेत. हा प्रकार खाकी वर्दीवाल्याच्या लक्षात आला असता त्याने थेट तेथून पळ काढला. हा कर्मचारी श्रीरामपूर येथील एका विभागीय कार्यालयात काम करतो. तसे तर त्याच्या खात्यातील कलेक्टर आहे. त्यामुळे नेवासा, राहूरी, कोपरगाव राहता, संगमनेर, अकोले अशा विविध भागात तो असाच भटकत असतो. त्याच्याकडे असणारी गाडी ही आश्वी येथील एका वाळु तस्कारची असते तर कधी दुसरी असते.
                             
  सध्या लॅकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे जवळजवळ सर्वच धंदे स्लॅक होते. मात्र, आता जसजसे नियम शिथील होत चालले आहे. तसतसे अवैध धंदे जोेर धरू लागले असून मटका, जुगार, कत्तलखाने, वाळु, गांजा, बनावट दारू हे राजरोस सुरू असल्याचे दिसते आहे. त्यामुळे, ज्यांचे लेनदेन ठरलेले आहे. अशा कार्यालयात अ‍ॅडिशनल व्यक्ती ठेऊन मलिदे जमा करण्याचे किशोर धंदे सध्या जोरदार सुरू आहे. मात्र, अती तेथे माती होते असे म्हणतात खरे! पण, या कर्मचार्‍यामुळे तिघांची माती झाली हे विसरुन कसे चालेल? त्यामुळे पोलिस प्रशासनाने याचा शोध घेतला पाहिजे. अन्यथा अशा एका व्यक्तीमुळे सगळे प्रशासन टिकेचा धनी होऊन जाते.
             
 आता या घटनेतील एक जखमी व्यक्तीची अनेकांनी कानभरणी केली तर काहींनी वेगवेळ्या धमक्या दिल्याचे समजते आहे. हा व्यक्ती एकमेव वाचला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. तो बोलो अगर ना बोलो! पण याची चौकशी झाल्यास सत्य बाहेर येईल. तसेही संबंधित व्यक्तीचे नाव जगजाहीर होत आले आहे. मात्र, ते पोलिसांपर्यंत का गेले नाही? याबाबत आश्चर्य वाटते. अशाच प्रकार कोणी वाळुतस्करांशी संगनमत करतात आणि नंतर त्याची हत्या होते. असे अनेक उदा. नगर जिल्ह्यात आहे. त्यामुळे, पोलीस नेहमी म्हणतात, गुन्ह्यापेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला. आज वाळुने तीन नेले उद्या खाकीवर वेळ येऊ एकते. त्यामुळे याला प्रतिबंध घातला पाहिजे. एक पळवाट म्हणा की सजगता! पण, पोलिसांनी कंपनीचा कॉन्ट्रॉक्टर व संगमनेरचे इंजिनिअर दादासाहेब अशोक नवले (रा. संगमनेर) यांना आरोपी केले आहे. जेथे काम चालु आहे. तेथे बॅरिकेटिंग केली नाही, दिशादर्शन फलक लावले नाही त्यामुळे या अपघातास त्यांना कारणीभूत ठरविले आहे. मात्र, त्यांच्याबरोबर खर्‍या अर्थाने जो त्यांच्या मागे लागला होता. त्याला सुद्धा यात आरोपी करावे अशी मागणी काही सामाजिक संघटनांनी केली आहे.