अरेच्चा ! अकोले बंदचा निष्फळ प्रयत्न ! 22 जण क्वारंटाईन,4 हायरिस्क! 679 होमक्वारंटाईन!


सागर शशिकांत शिंदे
सार्वभौम (अकोले) :- 
                        अकोले शहराच्या नजीक एक कोरोना बाधित रूग्ण मिळून आल्यामुळे स्थानिक पुढारी आणि नागरिक यांनी आज दि. 28 जून रोजी एकमताने बैठक घेतली. त्यात असे ठरविण्यात आले की, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काही दिवस अकोले शहर बंद ठेवण्यात यावे. मात्र, या निर्णयावर एकमत झाले नाही. काही व्यापारी बंदला सकारात्मक होते तर काहींना कडाडून बिरोध केला. त्यामुळे शहरात कोणताही बंद पाळला जाणार नाही. तरी हकनाक कोणी येऊन गर्दी करु नये. असे आवाहन स्थानिक नागरिकांनी जनतेला केले आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंस्फुर्तीने हा निर्णय घेण्यासाठी ५० पेक्षा जास्त लोक एक झाले होते. मात्र, काहींनी या निर्णयाला खो दिला आहे. त्यामुळे आता अकोले बंद राहणार नाही अशी माहिती बैठकीत उपस्थित असणार्‍या व्यक्तींनी दिली आहे.  त्यामुळे शासनाने विहीत केलेल्या अत्यावश्यक सेवा नियम व अटी राखून अकोले चालु राहणार आहेत.
                   
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहराच्या मध्यवर्ती भागात एका भांड्यांच्या व फर्निचरच्या दुकानातील एक व्याक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. हा व्यक्ती काही माल आणण्यासाठी नाशिक व उल्हासनगर येथे जाऊन आल्यानंतर त्यास दोन दिवसांपुर्वी त्रास होऊ लागला होता. त्यामुळे तो शहरातील एका पेट्रोलपंपाच्या जवळ असणार्‍या एका रुग्णालयात उपचार घेत होता. दरम्यान त्यास श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्याने त्याला डॉक्टरांनी स्वॅब घेण्यासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविले होते. त्यानंतर अचानक नगरच्या रुग्णालयातून रिपोर्ट आला की, अकोले शहरातील एक व्यक्ती कोरोना बाधित आहे. त्यामुळे सरकारी डॉक्टरांसह अनेकांनी तोंडात बोट घातले. नेमकी हा व्यक्ती कोण? जो कोरोना बाधित मिळून आला आहे. नंतर त्याची शहानिशा करण्यात आली.
                        दरम्यान एक दुर्दैवाची गोष्ट अशी की, या रुग्णाची खाजगी डॉक्टरांनी स्थानिक सरकारी वैद्यकीय अधिकार्‍यांना कानोकान खबर लागू दिली नाही. हा रिपोर्ट येईपर्यंत अकोेल्याचे वैद्यकीय अधिकारी अनभिज्ञ होते. त्यानंतर मात्र, कोविड योद्धे तहसिलदार मुकेश कांबळे, सचिनकुमार पटेल व इंद्रजित गंभीरे यांनी संबंधित व्यक्तीच्या संपर्कात असणार्‍या व्यक्तींची शोधाशोध सुरू केली. त्यानंतर  शहरातील एक व्यक्ती कोरोना बाधिताच्या फारच संपर्कात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सगळ्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे सुरू केले. आता यात डॉक्टरांंसह 22 व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
                   
सध्या अकोले तालुका हा आजुबाजूच्या शहरांच्या तुलनेत फार म्हणजे फार सेफ आहे. येथे आजवर 35 हजार संशयितांना होमक्वारंटाईन करण्यात आले होते. तर आज त्यातील फक्त 3 हजार 500 लोक होमक्वारंटाईन आहेत. जे लोक 25 लोक कोरोना बाधित झाले होतेे. त्यापैकी 22 लोक ठणठणीत होऊन घरी गेले आहेत. सध्या हायरिस्क म्हणून केवळ 27 रुग्णांचा सामावेश असून समशेरपूर, कोतुळ आणि आज कृषीउत्पन्न बाजार समिती अशा तीनच ठिकाणे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत.
आज जो रुग्ण मिळून आला आहे त्याच्या संपर्कात 22 जण आलेले आहेत. तर तो ज्या ठिकाणी राहत होता. तो भाग प्रशासनाने सील केला आहे. कृषीउत्पन्न बाजार समिती या परिसरातील 147 घरे व त्यामध्ये राहणारे 679 लोक प्रशासनाने होमक्वारंटाईन केले आहेत. त्यामुळे आता येथील लोकांना बाहेर पडता येणार नाही. यांना लागणार्‍या जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा शासन करणार आहे. यात सर्वात महत्वाचे म्हणजे या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या चौघांना हायरिस्क मध्ये घेतले असून त्यांचे स्वॅब घेण्यासाठी संगमनेर येथे पाठविण्यात आले आहे. हे सर्व अकोले शहरातील असून जर यापैकी एकाचा जरी अहवाल पॉझिटीव्ह आला तरी अकोल्यासाठी ती एक धोक्याची सुचना असणार आहे.
                             
    दरम्यान अकोल्याचे संगमनेर होऊ नये किंवा त्याला मालेगाव सारखे रुप येऊ नये यासाठी स्थानिक नागरिकांनी एकी दाखवत आज दि. 28 रोजी सायंकाळी 5 वाजता एक  बैठक घेतली होती. त्यात असे ठरले की, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शहर किमान काही दिवस बंद ठेवणे गरजेचे आहे. मात्र, त्या निर्णयावर एकवाक्यता झाली नाही. त्यामुळे चारदोन व्यापाऱ्यांच्या अट्टाहासापोटी अकोले बंदचा प्रस्ताव हाणून पडला आहे. यातून आरोग्य नको तर पैसा महत्वाचा हा संदेश पुन्हा समोर आला आहे. यात प्रशासनाचा कोणताही हस्तक्षेप नव्हता तर व्यापारी व नागरिक यांच्या संगनमताने घडवून आणलेली ही बैठक होती. मात्र तिला यश आले नाही.
दरम्यान आज अकोले बंद करण्यास काही व्यापार्‍यांनी नकार दिला. बंदमुळे आमचे फार मोठे नुकसान होते. नागरिकांची गैरसोय होते, त्यामुळे कोरोनासोबत दुकाने चालु ठेवायचे असे सांगण्यात आले. मात्र, अकोल्यात किती व्यापारी दुकानाच्या बाहेर सॅनिटायझर ठेवतात, कोणकोण आपला परिसर निर्जंतुकीकरण करतो, कोणीकोणी दुकानाबाहेर सोशल डिस्टन्ससाठी नियमानुसार चौकट आखली आहे. दुकानात किती व्यक्ती शारिरीक अंतर ठेऊन वावर करतात? किती लोक मस्कचा वापर करतात? व्यापारी म्हणून किती लोकांकडे परवाने आहेत? असे अनेक प्रश्न आता अनेकांनी ऐरणीवर आणले आहेत. बंद हा एकमतेने झाला असता तर कोरोनाची संशयित साखळी तुटली असती असे अनेकांना वाटते तर आपले आर्थिक नुकसान नको असा काही व्यापार्‍यांना वाटते. या तु-तू मै-मै मध्ये आजची बैठक काहींना हाणून पाडली आहे. त्यामुळे अकोले बंद नाही तर फुल सुरू राहणार आहे.
--------------------------------------
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 62 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 400 दिवसात 560 लेखांचे 62 लाख वाचक)