प्रशासनावरील दबावाने डॉ.कर्पेंच्या अर्जाचे ऑपरेशन रखडले! मुजोरीचा अन्याय अधिकार्यांवरही! जीव गेल्यावर कारवाई करणार का?
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर शहरात कापड व्यापारी आणि डॉक्टर यांच्यातील वाद चव्हाट्याहून पुन्हा पोलीस ठाण्यात गेले आहेत. मात्र, आज जितकी गरज कापडाची आहे. त्यापेक्षा कित्तेक पटीने गरज डॉक्टरांची आहे. हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे, सहाजिक शासन देखील सांगते खबरदार जर डॉक्टरांच्या नादाला लागाल तर..! पण हे सरकार प्रणित प्रशासन काल ज्या डॉक्टरांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वात पहिले कोरोनाशी युद्ध खेळण्यासाठी दंड थोपटले होतेे. त्यांच्या पाठीशी उभे न राहता धनदांडग्या लोकांच्या दबावाला बळी पडून साधा एक अर्ज निकाली काढण्यास असमर्थता दर्शवित आहे. त्यामुळे, एकीकडे आरोग्य खाते ते पोलीस प्रशासन यांच्याकडे कैफियत मांडून देखील तक्रारी अर्ज थप्पीला लावले जात आहे. हे होतय कोणाच्या काळत तर जे ठाकरे सरकार म्हणते आहे. डॉक्टरांना प्रोत्साहन द्या, जे गृहमंत्री म्हणतात डॉक्टरांना संरक्षण द्या.! आणि त्यांच्याच काळात डॉक्टरांच्या हॉस्पिटलवर हल्ले होतात काय, त्यांना धमक्या दिल्या जातात काय, त्यांना हॉस्पिटलबाहेर काढले जाते काय, वैद्यकीय स्टाफला अस्पृश्यतेने वागणूक दिली जाते काय तरी देखील प्रशासन फक्त बघ्याची भुमिका घेते! वा रे उद्धवा! अजब तुझे सरकार.! फक्त एकच गोष्ट अधोरखित करावी वाटते, जेव्हा याच संगमनेरात एकही खाजगी डॉक्टर घराच्या बाहेर पडत नव्हता, तेव्हा याच अमोल कर्पे यांचा दवाखाना प्रत्येकासाठी खुला होता. आज दोन वेळा क्वारंटाईन होणारा हा डॉक्टर आपल्याकडे न्याय मागतो आहे. मुख्यमंत्री महोदय आपण, सर्वात लोकप्रिय म्हणून गणले गेले त्यामुळे, तुमच्या शिवराज्यात कोणावर अन्याय होऊन नये! हीच इच्छा! अशी आर्त हाक एका अन्याय सहन करणार्या डॉक्टरांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरातील डॉ. अमोल कर्पे यांचे जाणता राजा मार्गावरील मालपाणी प्लाझा इमारतीच्या मागे क्लिनिक आहे. कोरोनाच्या संकटकाळात डॉ. कर्पे हे त्याचे क्लिनिकच्या बिल्डिंगमध्ये रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या इतर वैद्यकीय स्टाफ सोबत सध्या वास्तव्यास आले आहे. त्यांचा डॉक्टरकीचा अभ्यास चांगला असल्यामुळे लोक त्यांच्याकडे मोठ्या विश्वासाने ये-जा करतात. इतक्या कडूकाळ दिवसात देखील हे प्रेम तसूभर कमी झाले नाही. या दरम्यानच्या काळात डॉ. अमोल कर्पे हे एका रुग्णाच्या संपर्कात आल्याची कागाळी उठली आणि एक कर्तव्य तथा जबाबदारी म्हणून ते दि. 9 मे रोजी नगर जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या तपासणीसाठी गेले. मात्र, याच वेळी काही व्यक्तींंनी संधी साधली आणि थेट डॉक्टरांच्या घरावर हल्ला केला. 7 ते 8 लोकांनी डॉ. कर्पे यांच्या क्लनिकमध्ये जाऊन तेथे काम करणारे डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी यांना अश्लिल शिवीगाळ केली. भर शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. तर तेथील महिला कर्मचार्यांना लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव करून क्लिनिकची तोडफोड करत जिवे मारण्याची धमकी दिली. आता एक न्यायी हक्काच्या लढाईसाठी कर्पे यांनी कोणताही कायदा हातात घेतला नाही. कारण, त्यांनी लोकशाहीचे रक्षक म्हणून पोलिसांवर विश्वास ठेवत कायदेशीर संबंधित व्यक्तींच्या विरोधात 15 मे रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्याचे काय झाले? देवाला माहित. पण, गेल्या काही दिवसांपुर्वी नाशिक परिक्षेत्रासाठी आयजी साहेबांनी सुचना केल्या होत्या. की, कोणाचाही अर्ज दाखल करुन घ्यायचा नाही. तर फिर्यादीचे म्हणणे एकूण घेत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करुण घ्यावा, काय खरे काय खोटे हे तपासाअंती सिद्ध होईल. अर्थात तत्कालिन एसपींनी त्या आदेशाचे तंतोतंत पालन केले होते. मात्र, आता नवे गडी नवे राज्य त्यामुळे, जरी एखादा अर्ज प्रशासनाच्या दरबारी दाखल केला. तरी तो निकाली काढायला फारतर आठवडा जातो. पण या अर्जाला अद्याप मुहूर्त निघत नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईचा फायदा घेत कर्पे यांच्यावर रोज शब्दांचे हल्ले होत आहेत. पोलीस आमचे काही वाकडे करू शकत नाही, अशा शब्द कानावर पडले की, हे काही अंशी खरे वाटू लागते. मात्र, संगमनेरात अशी एकही खमकी खाकी वर्दी नाही का? की जी ज्योती प्रियासिंग प्रमाणे कोतकरांसारख्या बलाढ्य व्यक्तीला कायद्याची ताकद दाखवू शकते, येथे लखमी गौतम प्रमाणे एकही अधिकारी नाही का? जो बच्चु कडू सारख्यांना कोर्टात खेचू शकतो, रविंद्र तायडे सारखा पोलीस पोलीस निरीक्षक पप्पू कलानी सारख्या व्यक्तीला सातव्या मजल्याहून खाली ओढीत आणतो, इतकेच काय इशु सिंधू यांनी सुरेश जैन सारख्या व्यक्तीला जेलची हवा खाऊ घातली. मग संगमनेरमध्ये सगळेच राजकीय दबावाचे बळी आहेत की यांचे हात रंगलेले आहेत? जे डॉक्टर आज कोविडसाठी लढत आहे. त्यांच्या वैयक्तीत हेवेदावे जरी असले तरी त्यांच्या चांगल्या कामाचे मुल्यांकन हा समाज आणि प्रशासन करत नाही?

खरंतर आज प्रथमत: वाटू लागले आहे की, प्रशासनाने एक प्रसिद्धपत्रक काढून चूक नाही तर योग्यच भुमिका घेतली होती. कारण, सगळ्या सामान्य जनतेने पाहिले होते. जेव्हा टाईफाइड आणि मलेरियाची साथ आली तेव्हा ज्यांनी गटारीवर बिल्डिंगा बांधल्या तेथे उभे रहायला जागा नसे आणि जात तेच गेट बंद असून फक्त छोटीशी बोळ आपन आहे. मग या कडूकाळ दिवसात ज्या कर्पेंनी स्वत:चा जीव घोक्यात घालुन निष्फळ आणि प्रांजळपणे सेवा देऊ केली. त्यांना वैयक्तीक द्वेषापोटी छळले जात असेल तर त्यांच्या पाठीशी प्रशासन का उभे रहात नाही?
खरंतर एकीकडे डॉक्टरांना कोविड योद्धे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांच्या पंख छाटणार्यांना अभय द्यायचे. हे कितपण योग्य वाटते? प्रशासन ही कुणाची गुलामी नाही तर तेे न्यायाचे दुसरे अंग आहे आणि लोकशाहीची अंम्मलबजावणी करणारे तंत्र आहे. मात्र, ते असे दबावाखाली काम करीत असतील तर न्याय मागायचा कुणाकडे? सद्यातरी मीडियांच्या माध्यमातून एकट्या पडलेल्या डॉक्टरांच्या या भावना सरकारपर्यंत व वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत जाणार आहे. मात्र, त्यापुर्वी स्थानिक प्रशासनाने हा अर्ज निकाली का काढला नाही? याचे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहे.
वास्तवत: डॉ. कर्पे यांच्या अन्यायाला फार मोठी पार्श्वभूमी आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की त्यांनी वारंवार तेच सहन करावे. कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे हे नव्याने सांगायला नको. पण, त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाला प्रशासन का कान्या नजरेने पाहत आहे. हे याचे उत्तर त्यांना हवे आहे. सद्या डॉ. कर्पे यांना वारंवार येणार्या जीवघेण्या धमक्या, हल्लेखोरांची मानसिकता आणि दिवसेंदिवस वाढत जाणारा त्रास हा एकदिवस त्यांच्या जीवावर बेतू शकतो. त्यास जबाबदार कोण हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र, सद्यातरी त्याचे मनोबल खचत चालले असून त्यांच्या कुटुंबियांना या लोकांपासून धोका आहे. असे े डॉ. अमोल कर्पे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.दरम्यान सरकारने डॉक्टर लोकांवर होणारे हल्ले, कोरोनाच्या काळात त्यांच्या प्रति कोणी चुकीचे पाऊले उचलल्यास त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करावे. तर त्यासाठी शिक्षेची तरतुद देखील केली आहे. आता शहरातील डॉ.कर्पे यांना दिल्या जाणार्या त्रासाला त्याच्यावरील अन्यायाला पोलीस प्रशासन तसेच सरकार न्याय देऊन संबंधितांवर कारवाई करणार करते की नाही. हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
भाग 1