अकोल्यातील कोतुळमध्ये पुन्हा एक रुग्ण.! बाकी अहवाल निगेटीव्ह.! संगमनेरचे रुग्ण बरे होऊन घरी.!
संकेत सामीरे
सार्वभौम (अकोले)
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे आणखी एक रग्ण कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. कोतुळमधील काझीगल्ली येथे राहणारी ६५ वर्षीय महिलेस या आजाराने ग्रासले आहे. यापुर्वी कोतुळ येथे एका हॉटल चालकाला कोरोनाची बाधा झाली होती. ही महिला त्याच्या संपर्कात आल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान कालपासून कोतुळगाव चार दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले होते. तर ४ हजार ४०० नागरिकांनी स्वत:ला होमक्वारंटाईन करुन घेतले होते. त्यामुळे येथील प्रादुर्भाव कमी होण्यास फोर मोठा हातभार लाभला आहे. आज हा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर प्रशासनाने कोतुळकडे धाव घेत ते क्षेत्र प्रतिबंधीत करण्यासाठी हलचाली सुरु केल्या आहेत.
नगर शहरातील वाघ गल्ली नालेगाव येथील ३८ वर्षीय महिला कोरोनाची बाधा झाली आहे. तर अकोले तालुक्यातील काझी गल्ली, कोतुळ येथील ६५ वर्षीय महिलेचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. हे दोन्ही रुग्ण यापूर्वी तेथे बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. दरम्यान, अकोले व संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील ३६ व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ही आनंदाची बाब असून आज जिल्ह्यातील ०४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहे.
यामध्ये संगमनेर, राहाता, शेवगाव आणि नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. आज त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २४९ झाली आहे तर एकूण रुग्ण संख्या ३०४ इतकी झाली आहे.