संगमनेर तालुका आणि घारगावात सात ठिकाणी चोर्‍या व कुर्‍हाड चाकुने मारामार्‍या! कायद्याचा धाक संपला?


सार्वभौम (संगमनेर) :
                  संगमनेर तालुका आणि घरगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चोर्‍या आणि मारामार्‍यांचे काहूर माजले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाने घातलेली दहशत आणि तालुक्यात गुन्हेगारी वृत्तीने घातलेली धुमाकुळ यामुळे या तालुक्यात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. पठार भागावर घारगाव पोलीस ठाण्यात अनेक बडे क्राईम दाखल होत असून पोलिसांनी मात्र आता हात टेकले आहे. आज आश्वीत दुकानफोडी तर वाळुचोरी, घारगावातील साकूर येथे लाठ्याकाठ्यांसह कुर्‍हाडींनी मारामार्‍या, पळसखेड येथे कुर्‍हाडीने हाणामार्‍या, हिवरगाव पठार येथे देखील वादंग, सावरगाव तळ येथे मारामार्‍या, घारगाव येथील रणखांब येथे वांदग, असे दखलपात्र आणि अदखलपात्र अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळेे, येथे कायदा व सुवस्था आणि पोलिसांचा धाक आहे की नाही. असा प्रश्न सामान्य जनतेला उपस्थित झाला आहे.
                 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सार्वजानिक नळावर झालेल्या किरकोळ भांडणाचे रुपांतर थेट काठ्या, कुर्‍हाडी व लोखंडी गाजाच्या मारहाणीपर्यंत गेले. ही प्रकार साकुर परिसरातील चिंचेवाडी येथे घडला. याप्रकरणी बिलाल हैदर पटेल, हाबीब बिलाल पटेल, आरिफ बिलाल पटेल, आरीफा आरीफ पटेल, आरफीन हबीब पटेल, आयशा हबीब पटेल, जरदीश हबीब पटेल, तनजिला आरीफ पटेल (रा. साकुर, चिंचेवाडी) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर यात कादर हैदर पटेल हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ जणांना आरोपी करण्यात आले आहेत. या घटनेनंतर काही काळ या परिसरात तणाव निर्माण झाला होता.
                   
तसेच संगमनेर तालुक्यात पळसखेडे येथे मेंढ्या चारण्याच्या कारणाहून नारायण रंगनाथ वाघ (रा. पळसखेडे) यांना नांदुरशिंगोटे येथील चौघांनी बेदम मारहाण केली. कुर्‍हाडीचा दांडा उलटा करुन वाघ यांच्यावर मागिल भांडणाचा राग कोढण्यात आला. ही घटना 11 जून रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पळसखेडे शिवारात घडली. याप्रकरणी दिलीप विठोबा चकोर, संतोष चकोर, गणेश दिलीप चकोर, आरुण दिलीप चकोर यांच्यासवर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                                तर घारगाव परिसरात हिवरगाव पठार येथे शौचालय बांधण्याच्या कारणाहून किरकोळ वाद झाला होता. त्याचा राग मनात धरुन आरोपी नितीन रामू मिसाळ व कविता मिसाळ या दोघांनी सिद्धार्थ विलास मिसाळ यांच्या पाठीत चाकू मारला. तसेच त्यांचे हातपाय धरुन मारहाण करीत त्यांच्या डोक्यात विट टाकली. ही घटना 10 जून रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हिवरगाव पठार येथे घडली. सिद्धर्थ हे गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                   
तसेच संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे शेतात रोटा मारण्याच्या कारणाहून दोन कुटुबात प्रचंड वाद झाले. ही जमीन आमची आहेत असे म्हणत चौघांनी एकास शिवीगाळ दमदाटी करीत ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना 11 जून रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. यात गोरक्ष रामभाऊ गाडे यांनी फिर्याद दाखल केली असून हनुमंत विठोबा नेहे, दत्तू विठोबा नेहे, रविंद्र दत्तू नेहे, जालिंदर हनुमांता नेहे (सर्व. रा. सावरगाव तळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
                   
तर घारगाव परिसरातील रणखांब येथे सोपान दगडू नाईकवाडी या व्यावसायीकाच्या गट नंबर 260 मध्ये आरोपी एकनाथ रखमा नाईकवाडी यांनी अनाधिकाराने घुसपेठ केली. सोपान यांच्या मालकीच्या असलेल्या 91 व 13 गुंठे क्षेत्रात त्यांना न विचारता एकनाथ यांनी अतिक्रमण केले. हा जाब विचारण्यासाठी ते गेले असता आरोपी म्हणला की, थांब तुझा खून करुन टाकतो. अशी धमकी देत त्याने शिवागाळ दमदाटी केली. याप्रकरणी काल घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                        संगमनेरात आश्वी येथे खळी गावात मारुती मंदिराच्या समोर नामदेव तुकाराम नांगरे यांच्या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन नेला आहे. ही घटना 10 जून रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली. यात किराणा माल, एलईडी टिव्ही, एचपीचे झेरॉक्स मशिन व इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा मुद्देमाल चोरी गेला आहे. हा प्रकार नांगरे यांना समजला असता त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तर लॉकडाऊनमुळे जे चोरटे शांत पहुडले होते. ते जागे झाले असून त्यांनी आता पोलिसांना  नव्याने आवाहन दिले आहे. सद्या गुन्हा कायम तपासावर आहे.
                                 
 तर आश्वी परिसरात प्रतापपूर गावच्या शिवारात वाळुतस्कारांनी वेगळाच प्रताप मांडला होता. येथे एम.एच 22एए 1017 हे वाहन शासकीय मालकीची वाळु तस्कारी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी संबंधित प्रवरा नदिपात्रात जाऊन ते वाहन ताब्यात घेतले. त्यात 1 लाख 10 हजारांच्या मुद्देमालासह जप्त केले आहे. याप्रकरणी संतोष भाऊसाहेब माळी (रा. प्रतापपूर, ता. संगमनेर) यांस आरोपी करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रात्री अपरात्री या परिसरात वाळुतस्करीचा व्यावसाय सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, बर्‍याच दिवसानंतर कारवाईचा मुहूर्त सापडल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
एकंदर संगमनेर तालुक्यात जमीन वादाचे फार मोठे प्रमाण आहे. तर दुसरीकडे प्रशासनाला हाताशी धरुन वर्ग एकच्या जमीनी लुटण्याचे प्रमाण देखील येथे फार आहे. त्यामुळे चार पोलीस ठाणे असून देखील येथे नेहमी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे.
-सागर शिंदे
-सुशांत पावसे