संगमनेर कापड व्यापार्याचा पोलीस ठाण्यात खुलासा ! पाच पानी डॉक्टरांची कुंडली
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर शहरात डॉक्टर आणि कापड व्यापारी यांची पारंपारिक वादातून जुगलबंदी सुरू आहे. त्यात पोलीस चांगलेच भरडले जात असून त्यांना कागदांची पुर्तता करताना नाकीनव आला आहे. डॉक्टरांनी एक अर्ज दिला त्याला प्रतिउत्तर म्हणून कापड व्यापार्यांनी पोलीस ठाण्यात आपला खुलासा सादर केला आहे. त्यात आपण दोषी नसून डॉक्टरांनी कशा पद्धतीने कांगावा केला आहे. हे सविस्तर मांडण्यात आले आहे. त्यामुळे, पोलिसांची डोकेदुखी वाढली असून धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय असे चित्र दिसत आहे. त्यामुळे सद्यातरी दोन्ही अर्जांची चौकशी पोलीस ठाण्यात कसोेशीने सुरू आहे.
कापड व्यापार्यावर आरोप केल्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्याकडे खुलासा सादर केला आहे. त्यात म्हटले आहे की, आमच्या विरोधात जी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ती कल्पोकल्पीत आहे. तो एक बनाव असून ते आरोप देखील बिनबुडाचे आहे. ते म्हणतात, आम्ही कापड व्यापारी असून एक प्रतिष्ठीत व्यक्ती आहोत. जे काही नाव आणि मिळकत कमविली आहे ती कष्टाची आहे. आम्ही वृंदावन कॉलनी परिसरात राहतो. तेथेच तक्रारदार डॉक्टर यांचे क्लिनिक नामे हॉस्पिटल आहे. त्या दिवशी रात्री 10:30 वाजले असावे. इतक्या उशिरा पर्यंत या हॉस्पिटलमध्ये जनरेटर चालु होते तर काही लोक मोठमोठ्याने बोलत होते. या सर्व प्रकाराचा त्रास व्यापार्याच्या घरात असणार्या अपंग व मतीमंद मुलास होत होता. कारण, त्याची खोली ही डॉक्टरांच्या क्लिनिकच्या बाजुने आहे. त्यामुळे त्याला मानसिक त्रास होत असल्याचे लक्षात येत होते. म्हणून व्यापार्याने थोडे पुढे होऊन क्लिनिकच्या खाली पार्कींगमध्ये बसलेल्या वॉचमनला विनंती केली की, रात्र झाली आहे. त्या जनरेटरचा त्रास मुलास होत आहे त्यामुळे ते बंद कर. मात्र, वॉचमनने त्यांचे ऐकून न घेता उलट आरेरावीची भाषा सुरू केली.
दरम्यानच्या काळात डॉक्टरांचे बंधू तेथे आले त्यांना देखील जनरेटर बंद करुन जमलेल्या लोकांना शांत बसण्यास सांगण्याच्या विनंती केली. मात्र, त्यांनी त्यांनी आमची बाजू ऐकून न घेता आरेरावी करुन दमदाटी सुरू केली. त्यावेळी आम्ही शांत राहिलो, आम्ही सभ्य व ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांना प्रतिकार केला नाही. त्यावेळी ते बंधू म्हणाले की, आम्ही आमच्या जागेत काहीही करु. असे म्हणताच कापड व्यापारी म्हणाले की, तुमचा हॉस्पिटल परवाणा रद्द झालेला आहे. तरी देखील येथे रात्रीच्या वेळी लोक का जमा झाले आहेत. याचा अर्थ येथे बेकायदेशीर हॉस्पिटल चालु आहे. हे ऐकल्यानंतर डॉक्टरांच्या बंधुंना राग आला आणि त्यांनी उर्मटपणे बोलणे सुरू केलेे. या वेळी आम्ही त्यांना व उपस्थित लोकांना काहीच शिवीगाळ केली नाही. हा प्रकार तेथे उपस्थित असणार्या सर्वांनी पाहिला आहे. त्यावेळी घडलेल्या प्रकाराची माहिती आम्ही पोलीस निरीक्षक अभय परमार यांना फोनहून दिली होती. असे खुलाशात म्हटले आहे.
त्यात पुढे म्हटले आहे की, डॉक्टरांनी आमच्या विरुद्ध तक्रार का दाखल केली हा प्रश्न आम्हाला निर्माण झाला. त्यावेळी असे लक्षात आले की, त्यांच्या क्लिनिकच्या ठिकाणी बेकायदा हॉस्पिटल सुरू होते. ही बाब आम्ही पाठपुरावा करुन प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. तसेच औरंगाबाद खंडपीठात पिटीशन दाखल करुन हॉस्पिटल तथा बांधकाम व परवाण्याबाबत कायद्याचा भंग केल्याचे निदर्शनास आणून दिले होते. हा प्रकार बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टच्या तरतुदीनुसार नियमांचे भंग करणारे आहे. हे समोर आल्यानंतर जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी डॉक्टरांचे प्रमाणपत्र रद्द केले होते. त्यामुळे त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यानंतर संगमनेर नगरपालिकेने त्यांच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केलेला आहे.
तर संगमनेर ग्रामीण रुग्णालय यांनी हे हॉस्पिटल चालु आहे. असे लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. त्यामुळे डॉक्टर हे आमच्यावर नाराज झालेले आहेत. आम्ही एक अल्पसंख्यांक असून डॉक्टरांचे उच्चपदस्थांमध्ये उठणेबसणे आहे. त्यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे ते कोणालाही जुमानत नाही. आम्ही त्यांच्या वॉचमन किंवा कोणत्याहीं व्यक्तीला शिवीगाळ केलेली नाही तथा धमकाविले नाही. डॉक्टर हे प्रशासनाचा वेळ वाया घालवून आकस बुद्धीने आमच्या विरोधात तक्रार दिली आहे. असे कापड व्यापार्याने पोलीस ठाण्यात दिलेल्या खुलाशात म्हटले आहे.
भाग 4 क्रमश: