साकुर चौफुलीवर वाळुच्या ढंपरने दोघांना चिरडले! पाय झाले निकामी! तर अकोल्याच्या दोन वाळुतस्कारांच्या मुसक्या आवळल्या!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यातील साकुर फाटा येथे एका वाळुच्या ढंपरने दोन दुचाकीस्वरांना चिरडले. यात एकाचे दोन पाय गेले असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज गुरुवार दि.11 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ढंपर ताब्यात घेतला असून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तर दुसर्या प्रकरणात अकोल्याच्या दोन वाळुतस्करांच्या मुसक्या अकोले पोलिसांनी आवळल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाळुचा एक ढंपर मांडव्याकडे चालला होता. या दरम्यान साकुर चौफुली परिसरात शेंडेवाडी येथील दोन तरुण साकुरकडे जात असताना या ढंपर चालकाने त्यांना चिरडले. यात सुखदेव दत्तुु काळे (वय 30) तर नवनाथ चंद्रराम काळे (वय 35) ही दोघे जखमी झाले असून यात एकाच्या पायाहून ढंपरचे चाक गेल्यामुळे त्यास दोन्ही पाय गमवावे लागतील की काय? अशी परिस्थिती आहे. हा प्रकार घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे. मात्र, दोघे गंभीर जखमी झाल्यामुळे नागरिकांनी ढंपर ताब्यात घेतला आहे.
दरम्यान हा प्रकार घारगाव पोलिसांना समजला असता ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ढंपर ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात संपर्क साधाला असता तीन तासानंतर देखील त्यांच्याकडे अद्याप कोणतीही माहिती नसल्याचे सागण्यात आले. मात्र, हा प्रकार घडल्यानंतर तो ढंपर कुणाचा होता, अपघात झाला कसा, त्यात काय होतो, तो कोठे चालला होता. त्यावर वाहन चालक कोण तर त्याचा मालक कोण, इतकेच काय तर त्यात कोणत्या बड्या पुढार्याची पार्टनरशीप आहे याची माहिती सोशल मीडियावर फिरू लागली होती. तर हे वाळुचे ढंपर मातीच्या नावाखाली राजरोस कुणाच्या वरदहस्ताने सुरू आहेत. हे देखील जगजाहिर आहे. त्यामुळे झाकली मुठ सव्वा लाखाची. याबाबत न बोललेलं बरं!
यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे, गेल्या दोन आठवड्यापुर्वी याच साकुर परिसरात वाळुतस्कारांनी तलाठ्यावर हल्ला केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल दाखल आहे. मात्र, सरकारी अधिकार्यांवर हात उचलण्याची यांची मिजास होते तरी कशी? पठार भागावर सरकारशाही आहे की मोगलाई माजली आहे. हा प्रश्न अनेकांना पडला आहे. येथे आजवर अनेक जीवघेणे हल्ले झाले आहेत, अनेकांचे जीव गेले आहेत तरी देखील पठार भागला शहानपण येत नाही. एकीकडे तेथे सामान्य मानसांना रोजगार नाही, पिण्यासाठी पाणी नाही, मुलभूत गरजांची पुर्तता नाही. असे असतांना वंचित राहिलेल्या या भागात लोकप्रतिनिधी धनबलाढ्य झाले असून सेवा सुविधा पुरविण्याचा वस: घेण्याऐवजी वाळुतस्तकरी करुन पर्यावरण आणि आदिवासी समाजाचे शोषण करीत आहेत.
आता ही वाळुतस्करी कशी व कोठे चालते हे अगदी सामान्य व्यक्तींना माहित आहे. याबाबत पोलीस आणि महसूल अनभिज्ञ असेल असे म्हटले तर तो निव्वळ मुर्खपणा ठरेल. कारण, भर लॉकडाऊन सुरू असतांना यांचे धंदे सुरू होते. पठार भागाची वाळु ही थेट पुण्यात सप्लाय होते. सध्या आळेफाटा परिसरातून यांना परवानगी नाही. मात्र, पारनेरमार्गे कोणताही चेकनाका यांच्या वाहतुकीस आडथळा ठरत नाही. त्यामुळे हा धंदा अगदी राजरोस सुरू आहे. हा सर्व प्रकार प्रशासनाला माहित असून देखील त्यांचा हात बरबटलेले असल्यामुळे हा प्रश्न तेव्हाच ऐरणीव येतो. जेव्हा कोणाचाही जीव जातो किंवा कोणीतरी निधड्या छातीचा समाजसेवक यांच्याविरुद्ध आवाज उठवितो. असे झाले तर हे वाळुतस्कर घरात जाऊन धमक्या देण्यात कोठे कमी पडत नाही. त्यामुळे यांच्यावर खरोखर कारवाई करायची असेल तर येथे सक्षम अधिकार्यांची गरज असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान अकोले पोलिसांनी पठार भागावर एका वाळु तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहेत. बोरी गावच्या शिवारात वाळु तस्कारी होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जोंधळे यांना मिळाली होती. त्यांनी या परिसरात सापळा रचून एम.एच 17 एई 9918 हा ढंपर ताब्यात घेतला. त्यांच्याकडे मालाची चौकशी केली असता तो चोरीचा असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी निवृत्ती रामभाऊ गांडाळ (रा. पिंपळगाव खांड) व धनंजय रमेश देशमुख (रा. कोतुळ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून एकूण 6 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.