संगमनेर पठारावर आदिवासी कुटूंबावर हल्ला! खोरंच डोक्यात घातले तर 32 टाके पडले, 15 जणांवर गुन्हे दाखल

- सुशांत पावसे संगमनेर (सार्वभौम) :- 
                   संगमनेर तालुक्यातील अकलापूर परिसरातील शेळकेवाडी व चिमटेमळा येथे शेतातील बाभळीची झाडे तोडण्याच्या कारणाहून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. तर काही काळात पुन्हा त्याच आदिवासी कुटूंबावर तेथील नरवडे कुटुंबाने हल्ला करीत डोक्यात फावडे मारत ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात चौघे जखमी झाले आहेत. तर दोन्ही फिर्यादीत 15 जणांवर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
                       
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी रविंद्र सोनवणे हा शेळकेवाडी येथील शेतामध्ये ट्रॅक्टर घेऊन नांगरण्यासाठी गेला होता. या दरम्यान त्याने बांधावरील बाभळीची झाडे तोडली. यावेळी फिर्यादी नवनाथ तळपे व त्याचा भाऊ, आई, वडील यांनी रविंद्र सोनवणे यास झाडे का तोडली अशी विचारणा केली असता त्याने शिवीगाळ दमदाटी सुरू केली. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली असता त्याने लाकडी काठी व लाथाबुक्यांनी मारहाण केली. या झटापटीत सोमनाथ काशिनाथ तळपे, काशिनाथ शंकर तळपे, हिराबाई काशिनाथ तळपे यांना मुक्कामार लागला आहे. या प्रकारानंतर तळपे कुटूंब घरी येऊन पोलीस ठाण्याकडे तक्रार देण्यासाठी जात असताना पुन्हा 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी नवनाथ नरवडे, दादाभाऊ नरवडे, रवींद्र सोनवणे व अन्य सात जण यांनी तळपे यास जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्या हातावर काठी मारली. आरोपी दादाभाऊ नरवडे याने घरापुढील बांबु उचलुन हिराबाई यांच्या डोक्यात मारला तर दुसर्‍याने काशिनाथ तळपे यांच्या डोक्यात बांबु मारुन जखमी केले. तर आरोपी नवनाथ याच्या भावाने घरापुढे पडलेले फावडे (खोरं) उचलून सोमनाथ तळपे यांच्या डोक्यात मारले. डोक्याला अधिक मार लागल्याने तो तेथेच बेशुद्ध पडला.
                       
तो जमिनीवर पडलेल्या अवस्थेत पहिल्यानंतर सर्व आरोपींनी तेथून काढता पाय घेतला. जर आमच्या नादाला लागाल तर सगळ्या कुटुंबाला ठार मारु अशी धमकी देत निघून गेले. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सोमनाथ यांना घारगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, दुखापत गंभीर असल्यामुळे येथे उपचार होणार नाही असे डॉक्टरांनी सांगत पेशटला दुसरीकडे हलविण्याचा सल्ला दिला. त्यास  घुलेवाडी येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर रुग्णास लोणी येथील प्रवरा हॉस्पिलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाच्या डोक्यास 32 टाके पडले असून त्यांची प्रकृती अद्याप गंभीर आहे.
                 
तर हा वाद होण्यापुर्वी एक तास आधी येथे याच जमिनीच्या वादातून मारामार्‍या झाल्या होत्या. बांधावर असणारे बाभळीची झाडे तोडली त्यामुळे तळपे-तळपे कुटुंबात वाद झाले होते. झाडे तोडताना नवनाथ तळपे यांनी नबाजी शकंर तळपे, शांताराम नबाजी तळपे, अरुण नबाजी तळपे, ललीता अरुणा तळपे, रंजना शांताराम तळपे, रविंद्र लहादू सोनवणे यांना विरोध केला होता. त्यामुळे या व्यक्तींनी नवनाथ तळपे, सोमनाथ तळपे, काशिनाथ तळपाडे, काशिनाथ तळपे, हिराबाई तळपे यांना लाकडी काठीने मारहाण करत शिवीगाळ दमदाटी केली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर एक तासात नरवडे यांच्याशी वाद होऊन तळपे कुटुंबावर जिवघेणा हल्ला झाला. या दोन्ही फिर्यादी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या असून तपासी अधिकारी देशमुख यांनी चौघांना अटक केली आहे. तर अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणी पोलीस उपाधिक्षक यांनी एकास अटक केली आहे. 
खरंतर, संगमनेर मध्ये कोरोणाचा प्रदुर्भाव पठारभागा सह सर्वत्र पसारला आहे. त्यातच रस्ता, जमीन व बांदाच्या वादाने तालुक्यात उच्चाटन गाठले आहे. किरकोळ वाद हा जीवघेणा झाला आहे. तालुक्यात जमीनीचा वाद जणूकाही रक्तानेच चटावला आहे की काय असे सुज्ञ लोकांना वाटू लागले आहे. बीड येथील पोलीस अधीक्षकांनी घेतलेला निर्णय संगमनेर मध्ये ही लागु करावा असे संगमनेरकरांना आता वाटू लागले आहे.