संगमनेरच्या दरेवाडी व हिंगेवाडीत फुल राडा, सहा जखमी, 14 जणांवर गुन्हे दाखल!


सार्वभौम (संगमनेर) : 
                      संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे रस्त्याच्या वादातून दोन गटात फुल राडा झाल्याची घटना शनिवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यात कारंडे कुटूंबातील चारजण जखमी झाले असून त्यांच्याच भाऊबंदकीतील 11 जणांवर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनुसया भागा कारंडे, सुरेश भागा कारंडे, सरला सुरेश कारंडे, भागा कारंडे (सर्व रा. दरेवाडी, ता. संगमनेर) अशी जखमींची नावे आहेत.

                         याबाबत सविस्तर माहिती अशी की, दरेवाडी येथे कारंडे या दोन कुटूंबांचा गेल्या कित्तेक दिवसांपासून रस्त्याचा वाद आहे. यापुर्वी त्यांच्यात अशा प्रकारच्या चकमक झालेल्या आहेत. मात्र, शनिवारी हा वाद फार टोकाला गेला. यातील आरोपी शिवाजी रामा कारंडे, मारुती रामा कारंडे, विठ्ठल दत्तु कारंडे, दत्तु रामा कारंडे, म्हातु दत्तु कारंडेे, उत्तम गजाबा कारंडे, राजु मारुती कारंडे यांच्यासह अन्य चौघेजण अशा 11 जणांनी मिळून अनुसया कारंडे यांच्याशी रस्त्याचे भांडण काढून वाद केला. जिल्ह्यात जमाबंदी असताना देखील आरोपी हे एकत्र आले व त्यांनी अनुसया कारंडे, सुरेश कारंडे, सरला कारंडे, भागा कारंडे यांना घरात घुसून काठी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                       
तर संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी शिवारात सामाईक बांधाबाबत चर्चा सुरू असताना दोन गटात हाणामार्‍या झाल्या. तिघांना कुर्‍हाडीने   मारहाण करण्यात आली या झटापटीत तीनजण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग शिवाजी सांगळे व त्यांचे दोन भाऊ अशी तिघे जखमी झाले आहेत.
                             
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पांडुरंग सांगळे व आरोपी शुभग निवृत्ती सांगळे हे त्यांच्या सामाईक बांधावर चर्चा करीत होते. त्यावेळी तेथे सत्यम निवृत्ती सांगळे हा आला व अचानक शिवीगाळ करु लागला. त्यावेळी पांडुरंग यांनी त्यास समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाद टोकास गेले असता आरोपी शुभम सांगळे हा सत्यमला म्हणाला की, जा रे घरातून कुर्‍हाड घेऊन ये.! यांच्याकडे पाहतोच जरा. त्यावेळी सुरेश भागवत सांगळे म्हणाले की, हा जरा जास्तच माजला आहे. यांच्याकडे पहाच, त्यावेळी सत्यमने कुर्‍हाड आणून दिली व शुभमने रागाच्या भरात थेट पांडुरंग यांच्या हातावर मारली. तसेच कुर्‍हाडीचा दांडा उलटा करुन तो डाव्या खांद्यावर जोराने मारला. यावेळी पांडुरंग यांचे दोन भाऊ हा वाद सोडविण्यासाठी आले असता त्यांना देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यामुळे काल तिघांच्या विरोधात आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.