दामदुप्पटच्या नादी लागून 10 लाख 12 हजार गेले, मैत्री करुन विश्वासघात केला, गुन्हा दाखल..
सार्वभौम (संगमनेर) :
दाम दुप्पट फायदा करुन देतो असे सांगत चिखलीच्या एका तरुणाने मालदड रोड येथील एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात 10 लाख 12 हजार 500 रुपये घेऊन विश्वासघात केल्याचे म्हटले आहे. ही घटना दि. 11 ऑगस्ट 2017 ते दि. 8 सप्टेंबर 2017 या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी सचिन माधवराव कानवडे (रा. मालदड रोड, ता. संगमनेर) यांच्या फिर्यादीनुसार संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नितीन साहेबराव हासे (रा. चिखली, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नितीन हासे याने सचिन कानवडे यांच्याशी हेतुपुर्वक मैत्रीचे संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन केला. मी एका एसआरएस ट्रेड नावाच्या कंपनीत मोठ्या पदावर आहे. माझ्याकडे चांगल्या स्किमा आहेत. ज्याचा तुम्हाला फार फायदा होईल, मोठा आर्थिक मोबदला मिळेल. माझ्या प्लॅनमध्ये जर तुम्ही पैसे गुंतविले तर त्यात तुम्हाला दामदुप्पट रक्कम मिळेल. असे गोलमाल बोलून हासे याने कानवडे यांचा विश्वास संपादन केला. त्यावेळी, कानवडे यांनी एक गुंतवणूक म्हणून हासेकडे 10 लाख 12 हजार 500 रुपये रक्कम दिली. हा व्यवहार त्यांचा मर्चंड बँक सगमनेर समोर झाला होता.
दरम्यान 2017 ते आजवर कानवडे यांनी हासे यास फायदा अणि मुद्दल याबाबत वारंवार विचारपूस केली. दरम्यानच्या काळात त्यांच्यात काही व्यवहार झाला. मात्र, त्यातून कानवडे यांचे यांचे समाधान झाले नाही. दिलेली रक्कम हकनाक गुंतून बसली, फायदा नाही तर तोटाच होऊन बसल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी हासेकडे पैशाची मागणी केली असता त्याने उत्तरे देण्यास टाळाटाळ सुरु केली. हे खेळ तब्बल तीन वर्षे सुरू होता. मात्र, कानकाटे यांना योग्य मोबदला मिळाला नाही.
दरम्यान गेली 3 वर्षे त्यांच्याकडे पैशाची मागणी करुन देखील ती रक्कम मिळाली नाही ना मोबदला, पोलीस ठाण्यात जाऊन प्रकरण लांबेल असे म्हणता-म्हणता अखेर आपण बुडत्या जाहजावर पैसा लावला असे लक्षात येताच त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. सचिन कानवडे यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात हासेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पोलीस उपनिरीक्षक परदेशी करीत आहेत.
अशा घटना वारंवार घडत असतात, त्यामुळे जेव्हा पैसा गुंतवणूक करायची असेल तेव्हा योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. दाम दुप्पट आणि हव्यासापोटी गुंतवलेली मुद्दल देखील निघून जाते. त्यामुळे, व्यापारी आणि नोकरदार यांनी अशा प्रकारची खाजगी गुंतवणूक करताना विचार केला पाहिजे. अशी प्रतिक्रिया पोलीस प्रशासनाने दिली आहे.