ये बाबो.! केळेवाडीत दंगा होऊन एक मयत आणि तेथेच आढळला कोरोनाचा रुग्ण! संगमनेरात पठारावर मुंबईचा प्रसाद!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यातील पठार भागावर केळेवाडी येथे आज मंगळवार दि.26 रोजी दोन गटात दंगा झाला. त्या पळापळीत एक मयत झाला. त्यासाठी पोलिसांवर आरोप प्रत्यारोप होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना तेथे मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे लॉ अॅण्ड ऑर्डर सोबत तेथे आरोग्याचा देखील प्रश्न आ वासुरन उभा राहिला आहे. त्यामुळे, पोलीस आणि आरोग्य तसेच महसूल विभाग सर्वच केळेवाडीत एकवटले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, केळेवाडी येथील एक कुटुंब मुंबईत राहत होते. त्यावेळी त्यांच्या घराशेजारी राहणार्या एका व्यक्तीला कोरोना झाला होता. मात्र, एकोप्याच्या नात्याने या कुटूंबातील एकाने त्या कोरोना बाधित व्यक्तीचा टॉवेल वापरला होता. काही दिवसात त्या व्यक्तीला त्रास होऊ लागला असता त्यास रुग्णालयात दाखल केले होते. त्यात तो पॉझिटीव्ह असल्याचे लक्षात आले. हा प्रकार या केळेवाडीच्या कुटुंबास समजताच त्यांनी थेट गाव गाठले. मात्र, टॉवेल वापरणार्या व्यक्तीच्या मनात कोठेतरी कोरोनाची भिती होती. त्यामुळे, त्याने गावात कोणाशी संपर्क केला नाही. इकेच काय! शंका असल्यामुळे तो कुटुंबात देखील न राहता त्याने स्वत:चे बिस्तान वेगळे मांडले होते.
दरम्यान त्यास त्रास होऊ लागला असता त्याने प्रशासनाशी संपर्क केला. त्यांनी कुटुंबातील तिघांचे स्वॅब घेण्याची विनंती केली होती. त्यापैकी आज एकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे सध्या केळेवाडी सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली असून तेथे कायदा व सुव्यवस्थेसह आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान गावकर्यांनी घाबरुन जाऊ नये, कोणी वेगळ्या अफवा पसरवू नये. आपली स्वत:ची व कुटूंबाची काळजी घ्यावी. शक्यतो अत्यावश्यक काम नसेल तर घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.