कोविड विरुद्ध संगमनेरची खिंड लढविणारी ती महिला पोलीस! 60 दिवस सीमेवर पाय रोखून उभी!


  रोखठोक सार्वभौम :- 
                           सन 1664 साल, आपल्या बालकाचे संरक्षण करण्यासाठी हिरकणी नावाची महिला राजगडाच्या तटबंदीला छेद देत आपल्या बाळासाठी बुरूंज उतरली होती. होय! ती एक मातृत्वाची जबाबदारी पार पाण्यासाठी तिने तिच्या जीवाचा आकांत केला होता. अर्थात हे शौर्य एका महिलेचे होते.  तशाच आज पोलीस दलात असणार्‍या हजारो हिरकण्या त्यांच्या मातृभुमीचे रक्षण करण्यासाठी कोविड शत्रुवर संहार करण्यासाठी दिवसरात्र रस्त्यावर उभ्या आहेत. काहीही झाले तरी हे नि:शस्त्र युद्ध जबाबदारीने ड्युटी करून जिंकायचे आहे. सज्जन मायबाप जनतेचे रक्षण करायचे आहे आणि कोरोना या विषाणूचा संहार करायचा आहे. असेच धेय्य उरात बाळगून पोलीस उभा आहे. आपल्या संरक्षणासाठी! अशाच एका पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून एकही सुट्टी न घेता भर उन्हात 12 तास काम करणार्‍या महिला पोलीस सुजाता पांडूरंग थोरात (शहर वाहतूक शाखा संगमनेर) यांची कहाणी आज रोखठोक सार्वभौम आपल्यासमोर मांडणार आहे.!
                                    देशाला कोरोना विषाणूने विळखा मारला आणि बोलबोल करता भरधाव वेगात धावणारा देश आज डोळ्याची पाते लवते ना लावते तोच अगदी स्तब्ध झाला. त्यावेळी जेव्हा लोक घराच्या बाहेर पडण्यासाठी घाबरत होतेे, तेव्हा पोलीस मात्र खंबीरपणे रस्त्यावर उभे राहून देशाचे संरक्षण करीत होते. मात्र, खरी भिती तर तेव्हा वाटत होती, जेव्हा त्यांना घरी जाण्याची वेळ येई. त्यावेळी मात्र, काळजाचे पाणी-पाणी आणि हातपायाचा  लटकापरा होई. अर्थात त्यांना मृत्युचे भय मुळीच नाही. मात्र, त्या घरातून एक लहानसं बाळ, बाबा-बाबा म्हणत पुढे धावत येणार आहे. रोज हजारो हातांना स्पर्श आणि ज्ञानी मानसांचे तोंड पदरात काय-काय देऊन जाईल देवाला माहित. म्हणून पोलीस, डॉक्टर व सेवक म्हटले की अंग अगदी शहारून येते. अशीच एक कहाणी या पोलिसाची आहे.
                             जेव्हा 25 मार्च 2020 रोजी देशात लॉकडाऊन सुरू झाला, तेव्हा सुजाता यांच्या डोळ्यातील पाणी असून स्थिरावले देखील नव्हते. कारण, अगदी आदल्या दिवशी त्यांच्या सासुबाईंचा 14 वा नुकताच पार पडला आणि त्यांच्या ऑफिसातून फोन आला, त्यांची ड्युडी नांदूर शिंगोटे चेकपोष्ट येथे लावण्यात आली होती. थोरात ताई 12 तासांच्या ड्युटीवर हजर झाल्या. अर्थात त्यांची जबाबदारी फार मोठी होती. कारण, संगमनेरात जर कोरानाची आयात होणार होती, तर तोच एक संशयित मार्ग होता. त्यामुळे, एक जरी व्यक्ती सुटला तरी तेच प्रादुर्भावाचे कारण ठरू शकले असते. त्यामुळे, सुजाता यांनी पहिल्या दिवशी स्वत:शी खुनगाठ बांधली. जान जाऐं लेकीन शान न जाऐ! काही झालं तरी एकाही वाहने परवाण्याशिवाय जाणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल थोरात यांनी एकही दिवसाची रजा घेतली नाही. त्यांची चेक पोष्ट वरुन एकदाही दुसरीकडे बदली झाली नाही, 12 तासांपेक्षा जास्त पण कमी वेळ काम त्यांनी कधीच केले नाही. दमले, थकले असे म्हणून त्यांनी कधी आराम केला नाही, जेवायला जायचे आहे, घरी लहान मुले आहेत, पाणी पिवून येते अशी कधीही बहाने सांगून त्या अपवाद म्हणून एकदाही कधी घरी आल्या नाही. भर ऊन्हात जरा आराम करते असे करम कटाळे वाक्य त्यांच्या तोंडून ऐकायला मिळली नाही. अगदी 12 तास त्यांनी रस्त्यावर आपली ड्युटी चोख पार पाडली.
                     म्हणजे आज दोन महिने झाले. या दरम्यानच्या काळात त्यांनी 20 ते 30 हजार गाड्या स्वत: चेक केल्या आहेत. ज्यांच्याकडे संदिग्ध माहिती आणि परवाने नाहीत त्यांना अगदी कोण्या राजकीय हिटलरचा जरी फोन आला, तरी त्यांनी कधी गाडी सोडली नाही. अशा त्यांनी 10 ते 15 हजार गाड्या माघारी पाठविल्या आहेत.
मात्र, या दरम्यानच्या काळात रोज घरी जाताना त्यांच्या मनात फार मोठी धकाधूक होते. कारण, रोज हजारो लोकं व त्यांच्या वाहनांशी संपर्क येतो. त्यामुळे, घरात जाताना सर्वात मोठे दु:ख त्यांना जाणवते. कारण, लोकांना घरात बसायला मिळते आहे. तर ते बसत नाही. अन यांना घराच जायचे आहे. मात्र, हिंमत होत नाही. किती मोठा विरोधाभास आहे. त्या सकाळी 7:30 वाजता घरून निघाल्या की, त्यांच्या जेवणाचा डब्बा, पाण्याची बाटली आणि सुरक्षेसाठी लागणारे साहित्य सोबत घेऊन निघतात. तर रात्री 8:30 वाजता घरी आल्यानंतर त्यांचा स्वयंपाक होतो, त्यानंतर घरातील चिलेपिले जेवण करतात. या काळात त्यांचे पतीदेव फार समझदारीची भुमिका पार पाडतात. ते देखील नोकरदार आहेत. मात्र, संसाराचा गाडा एक विचाराने चालवितात, म्हणून इतक्या कष्टानंतरही त्यांच्यात कधी वाद होत नाहीत.
                             थोरात यांच्यासोबत फार मोठी टिम आहे. मात्र, त्या अशा एकमेव आहे. ज्या पहिल्या दिवसापासून ते आजवर एकाच ठिकाणी कार्यरत आहे. त्यांच्यासोबत असणार्‍या सोेमेश्वरी शिंदे यांचे देखील कौतुक केले पाहिजे. त्यांनी देखील थोरात यांच्यासोबत काही दिवस रणरागिणीसारखे काम केले आहे. इतक्या उन्हात तेही डोंगराच्या जवळ, त्यात उन्हाच्या प्रचंड झळ्या आणि एका ऊनाड रानात केवळ एका टेंटच्या आश्रयाने सर्व गोष्टींवर मात करायची आहे. तसेतर पोलीस म्हणजे रोज मृत्युशी युद्ध करायचे आहे. ते ही बिना शस्त्र, त्यामुळे, खरोखर या महिला पोलिसांचे करावे तितके कौतुक कमीच आहे.
                         खरंतर पोलीस जेव्हा रस्त्यावर उतरले तेव्हापासून सामान्य जनता सगळी घरात बसली होती. रोडशो करणारे शौकीन होते ते फक्त बडे बाप के बेटे आणि पांढर्‍या कपड्यातील बगळे. त्यामुळे, त्यांना अडविले की त्यांचा मिजास काही औरच असायचा. तो कोरोना फिरोना मला नका सांगू, तुमच्या साहेबांना फोन लावा, तुम्ही आम्हाला ओळखलं नाही का? वर्दी चढविली म्हणजे तुम्ही फार मोठे झाले का? मंत्री साहेबांच्या मी जवळचा आहे, तुम्ही मला पाहिले नाही का? असे अनेक शब्दप्रयोग ऐकुण यांचे कान पकून गेले आहेत. जर अशा बड्या नेत्याला अडविले तर त्याच्या गाडीच्या एकतर काचा देखील लवकर खाली होत नाही. त्यात त्याला गाडीची ऐंन्ट्री करायला लावली तर त्याचा इगो दुखून जातो. चारसहा फोन लावतो आणि आपोआप निघून जातो. असे मनाला दुखावणारे किस्से मजेने स्विकारुन ते जड काळजाने पचवायचे आणि तो दिवस धकून न्यायचा. असा हा मान सन्मानाचा कोरोना बंदोबस्त थोरात यांनी दोन महिने अगदी अथकपणे सोसला आहे. तो केवळ एक देशसेवेचे रक्षक म्हणून.!
                               अर्थात पोलिसांचे मनोबल फार खचले आहे. नगरचे तत्कालीन पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा पोलिसांच्या खचलेल्या मनाला ताजेतवाने करण्यासाठी काहीतरी उपक्रम राबवत असे. असेच काही उपक्रम, प्रेरणादायी संकल्पना, प्रशस्तीपत्रक, रिवार्ड असे काहीतरी उपक्रम पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांना राबविणे गरजेचे आहे. कारण, रामायण, महाभारत आणि पाणिपत सांगून गेले आहे. खचलेल्या सैन्याला घेऊन राजाने कोणतेच युद्ध लढू नये. खचलेल्या सैन्यांना सुर्याजीने फार मोठी प्रेरणा दिली आणि कोंढाणा जिंकला असे 1670 चा इतिहास सांगतो. त्यामुळे देशाचा गड राखण्यासाठी सिंह साहेबांनी अशा कोविड योध्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. तरच हे युद्ध अधिक वागाने जिंकणे शक्य आहे. अन्यथा गड येईल पण सिंह जाईल हेच खरे आहे.!

हिच देशसेवा मी अविरतपणे करेल..!
कोविड-19 च्या काळात फार भयानक अनुभव आले. पोलीस रस्त्यावर कोणासाठी उभे आहेत. हे देखील लोकांना समजत नाही. कोणी आमच्यावर रुबाब गाजविला तर कोणी अंगावर गाड्या घालून धिटाई केली. घरी जाताना कुटूंबाचा विचार केला की फार चिंता वाटते. कारण, आम्ही देखील माणसे आहोत. त्यामुळे, प्रत्येकाने पोलीस दलाकडे जवानाच्याच भावनेने पाहिले पाहिजे. आमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी जो विश्वास दाखविला त्याला सार्थ करण्याचे काम मी करत आहे. ही माझ्यासाठी एक प्रामाणिक देशसेवा करण्याची संधी आहेे. ती मी अविरतपणे करेल.
- सुजाता थोरात (पोलीस कर्मचारी)


 प्रत्येक कोविड योद्ध्यास माझा सलाम!
कोरोना प्रत्येकाला एक नवा धडा शिकवून गेला आहे. त्यात पोलीस दलाला तर फारच. कारण, कोविडसोबत जे युद्ध लागले होते. ते नि:शस्त्र होते. अदृश्य दुष्मण होता. त्यावर संहार केला असेल तर त्यात डॉक्टर आणि पोलीस यांचा फार मोठा वाटा आहे. खरंतर डॉक्टरांना शंका असते की हा रुग्ण आहे. मात्र, पोलीस पुर्णपणे अनभिज्ञ असतात. तरी येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला सामोरे जातात. तपासणी, विचारणा, जनतेचा रोष, जबाबदारी हे सर्व हसत हसत सहन करतात. त्यामुळे, देशातील तमाम पोलिसांनी आर्मीतील कर्णलांनी सलाम केला आहे. ही एक प्रत्येकासाठी प्रेरणाच आहे. त्यामुळे, माझ्या कर्मचार्‍यांसह देशातील प्रत्येक कोविड योद्ध्यास माझा सलाम!
- पप्पू कादरी (सपोनी, संगमनेर श.वा. शाखा)
सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 426 लेखांचे 40 लाख वाचक)