अकोल्याच्या लिंगदेवमध्ये सगळी लपवाछपवी! त्या हॉस्पिटलला दडविण्यासाठी, राजकीय हस्तक्षेप होतोय की काय? जनतेला भेडसावणारे संदिग्ध प्रश्न!


सार्वभौम (अकोले) :
                      अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे एका शिक्षकाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर प्रशासनासह तालुक्याची खळबळ उडाली. त्यानंतर गावकरी आणि प्रशासन तसेच आरोग्य विभाग यांनी लपवाछपवीची भूमिका बजावणे सुरू केले आहे. कारण हा व्यक्ती एका संगमनेर येथील एका राजकीय पुढार्‍याच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला होता. मग त्याला कोरोना असताना तो व्यक्ती पुन्हा घरी गेलाच कसा? त्याचा चौदा दिवसाचा क्वारंटाईन कोर्स पूर्ण झाला होता का? त्याचे स्वॅब त्याच्या घरी येऊन घेतले गेले असे का सांगण्यात येत आहे? असा झाले तर तो दवाखाण्यात का गेलो होता? जेव्हा त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे समजताच त्याला घरून बोलावून त्यास शाळेत क्वारंटाईन केले आहे. असे का भसविण्यात आले? असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहे. मात्र, जर प्रशासन एकमेकांना झाकझाकीचे काम करीत असेल तर येणार्‍या काळात तुम्ही एकमेकांना वाचवू शकता. मात्र, कोरोना कोणाची गय करणार नाही. त्यामुळे सद्या झाकली मुठ सव्वा लाखाची असे दिसत असेल तरी यामागे कोणाला दडविण्याचे काम सुरू आहे. हे न समजण्याईतपत जनता दुधखुळी नाही. असे सुर सुज्ञ जनतेतून बाहेर पडू लागले आहे.
                                 गेल्या काही दिवसांपुर्वी संगमनेर शहरातील दोन रुग्णालयात उपचार घेणारे दोघे रुग्ण पॉझिटीव्ह मिळून आले होते. त्यानंतर संगमनेरकरांनी त्यावर आवाज उठविला होता. हे खापर तेव्हा सरकारी रूग्णालयाच्या माथी मारुन सगळे नामानिराळे झाले. इतकेच काय! स्वत: तहसिलदार मोहदयांनी त्यांच्या रुग्णलयांना शुद्धतेचे प्रमाणपत्र बहाल केले. त्यामुळे, ज्या डॉक्टरांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून आजवर आपले प्राण जनसेवेसाठी लावले त्या सरकारी अधिकार्‍यांना तोफेच्या तोंडी बांधण्यात आले. मात्र, हा प्रकार आता येथेच थांबला नाही. तर अकोले तालुक्यातील एक संशिंयत संगमनेर शहरातील एका मोठी राजकीय पार्श्वभूमी असणार्‍या हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्यांच्याच अधिपत्याखाली खाजगी स्वॅब घेण्याची यंत्रणा उभारण्यात आली आहे. या शिक्षक महोदयांना जेव्हा त्रास होऊ लागला होता. तेव्हा त्यांना कोणतीही शासकीय यंत्रणा पुरविण्यात आली नाही. ते स्वत: एका दुचाकी वाहनावर संगमनेरला आले होते. त्यांनी संबंधित राजकारणी व्यक्तीच्या रुग्णालयात उपचार घेतले. असे बोलले जाते की, त्या व्यक्तीचे संगमनेरातच स्वॅब घेण्यात आले होते. त्यांनतर त्यास घरी पाठविण्यात आले. ते शिक्षक चक्क कोरोना बाधित असताना देखील त्यांच्या दुचाकीवर पुन्हा घरी आले.
                           आता या सर्वात एक महत्वपुर्ण गोष्ट अशी की, या प्रकरणी हॉस्पिटलची   चौकशी नको, बदनामी नको, राजकीय व्यक्तींंच्या मागे ससेमीरे नको, अशा एक ना अनेक गोष्टींमुळे एक छान स्टोरी प्रशासनाने तयार केल्याचे बोलले जात आहे.  हॉस्पिटलला क्लिनचीट देण्यासाठी प्रशासनाव दबाव आणल्याचे बोलले जात आहे. या व्यक्तीला जर कोरोनाचे सिमटन्स आढळून येत होते तर त्याला घरी सोडलेच कसे? त्यांच्यामुळे अनेकांना प्रादुर्भाव होऊ शकतो. हे त्यांना ज्ञात झाले नाही का? जो तपासणीसाठी येतात त्यांना सरकारी रूग्णालयात का पाठविले नाही? किंवा तपासणी करणारे इतके अज्ञानी व्यक्ती होते की काय? ज्यांंना कोरोनाची शंका देखील येऊ शकली नाही. त्यांनी संबंधित व्यक्तीस ताब्यात का घेतले नाही? घरी का काढून दिले? एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकार कोट्यावधी रूपये खर्च करीत आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे परप्रांतियांना परराज्यात सोडविण्यासाठी एकाच बसमध्ये किती सोशल डिस्टन्स ठेऊन पाठविले जात आहे. तर दुसरीकडे ज्याला कोरोना झाला आहे. त्याला थेट घरी पाठविले जात आहे. हा किती मोठा निष्काळजीपणा म्हणायचा? याला जबाबदार कोण? 
                                     गेल्या काही दिवसापुर्वी रुग्णांचा चैतन्य देणार्‍या एका हॉस्पिटलमध्ये असा प्रकार घडला होता. तर त्यांना संगमनेरकरांनी पळता भुई थोडी केली होती. आता मात्र, यावर कोणी बोलायला तयार नाही. म्हणजे आपले ते पोरगं आणि लोकाचे तो कार्ट, मोठ्यांचे निव्वळ धुपते आणि सामान्यांचा जाळ आणि धूर सोबत निघतो.! अशीच पद्धत समाजात रूजू लागली आहे.  हा व्यक्ती जेव्हा कोरोना बाधित असल्याचे समजले तेव्हा अकोले प्रशासन तेथे घाईघाई हजार झाले. मात्र, हे महाशय शाळेत नव्हे तर ते घरी होते. त्यांना शिताफीने निरोप धाडला आणि तत्काळ गावच्या प्रशासकीय प्रमुखाने बोलावून घेतलेे. तेव्हा हे शिक्षक स्वत: गाडी चालवत शाळेत आले. तेव्हा ते क्वारंटाईन होते. असे भासविण्यात आले. मात्र, वास्तव फार वागळे आहे.
महत्वाचे नमुद करावेसे वाटते की, शिक्षक हे फार जबाबदार आहेत. त्यांनी हवी तितकी सुरतक्षितता बाळगली. त्यांनी स्वत: प्रशासनाकडे वेगवेगळ्या खोल्यांची मागणी केली होती. मात्र, ती पुर्ण झाली नाही. इतकेच काय! तेथे कोणत्याही प्रकाराची स्वच्छता आणि सुविधा त्यांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांची प्रशासनाशी बाचाबाची देखील झाली होती. शेवटी 14 दिवसांचे क्वारंटाईन असताना देखील त्यांना 10 दिवसात घरी जाण्याचे वेध प्रशासनानेच दिले. मात्र, त्यांना त्रास होत होता, त्यामुळेे ते स्थानिक डॉक्टरांंकडे गेले होते. त्यांनीच संगमनेरला संबंधित रुग्णालयात जाण्यास सांगितले होते. असे नमुद आहे. मात्र, हा सगळा क्रमच बदलण्यात आला आहे की काय! अशी शंका अनेकांनी उपस्थित केली आहे.
                                 एक हस्यास्पद गोष्ट म्हणजे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे की, संबंधित व्यक्तीचे स्वॅब संगमनेरच्या त्या हॉस्पिटलात घेण्यात आले नाहीत. तर स्वॅबवाले कर्मचारी त्यांच्या घरी लिंगदेव येथे येऊन त्यांचे स्वॅब घेऊन गेले. मग हे शिक्षक संगमनेरला कशासाठी गेले होते.? त्यांनी संगमनेरच्या रूग्णालयात जाऊन नेमके काय केले? तेथे खाजगी लॅबवाले इतके कार्यतत्पर म्हणायचे की काय? जे रुग्णाच्या मागेमागे जाऊन त्याच्या घरी गेल्यानंतर स्वॅब घेऊन परत आले. त्यांना तर खरोखर बक्षिस दिले पाहिजे. की माहिती मिळताच ते तेथे जाऊन स्वॅब घेतात. खरंतर हे एक ऐतिहासिक काम म्हटले पाहिजे. कारण, कोण कोणाला जवळ उभे करीत नाही, क्वारंटाईन करणार्‍यांना दोन वेळचे अन्न मिळत नाही. ज्यांना जिल्हा रूग्णालयात नेले जाते त्यांचे स्वॅब न घेताच पुन्हा पाठविले जाते. मग अशा परिस्थितीत संगमनेर ते लिंगदेव येथे जाऊन त्या राजकीय व्यक्तीच्या हॉस्पिटल अंतर्गत असणार्‍या लॅबवाले आपले काम चोख पार पाडतात. हे कौतुकास्पद आहे. मात्र, दुर्दैव असे की, त्यांनी याबाबत कोठे प्रशासनाला कळविले नाही. त्यांना हॉस्पिटलमध्ये संशयीताचा स्वॅब का चालला नाही. म्हणजे सरकारी अधिकार देखील इतकी तत्पर व प्रामाणिक सेवा देऊ शकत नाही, तितकी यांनी दिली आहे. त्यामुळे, हे कुभांड प्रशासनाला जरी पटणारे असले तरी सुज्ञ व्यक्तींना ते न पटणारे आहे. अर्थात सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. उद्या जर महसूल विभागाने या हॉस्पिटलच्या नावे शुद्धपत्र काढले तरी कोणी वाईट वाटून घेऊ नये.! 
                        पण, तुम्हाला आठवतय ना?  संगमनेरच्या दोन रुग्णालयात दोन रुग्ण येऊन गेले होते. त्या डॉक्टरांसह सगळे हॉस्पिटल होमक्वारंटाईन केले होते. सरकारी डॉक्टरांसह खाजगी डॉक्टरांचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली होती. मग या रूग्णालयात देखील रूग्ण येऊन गेला. तेथे हॉस्पिटलचे कोणीच क्वारंटाईन नाही, कोणाची तपासणी नाही, हॉस्पिटल सॅनेटाईझ नाही. म्हणजे येथे माणूस तशी ट्रिटमेंट दिली जाते. एरव्ही संगमनेर आणि समाजहीत मिरविणारी माध्यमांनी देखील मौन धारण करुन बसले आहेत. त्यामुळे अनेकांच्या तोंडून एकच शब्द दबक्या आवाजात बाहेर पडू लागला आहे. वा रे उद्धवा! अजब तुझे सरकार..
            
  काही झाले तरी प्रशासन जी लपवाछपवी करू पाहत आहे. त्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. इतकेच काय? प्रशासनाला याबाबत माहिती विचारली असता त्यांच्याकडून फार संदिग्ध आणि संकुचित उत्तरे मिळू लागली आहेत. मात्र, त्यांचे हाल गुतली गाय आणि फटके खाय अशी झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, या लपवाछपवीत अकोल्याचे मालेगाव किंवा संगमनेर व्हायला नको म्हणजे झालं!
                     दरम्यान प्रशासन त्यांच्या पद्ध्तीने चांगले काम करीत आहे. त्यांच्यावर दबाव असो नको. त्यांनी तालुक्यात  चोख भुमिका पार पाडली आहे. त्यामुळे त्यांच्या सुचनांचे पालन केले पाहिजे. प्रत्येकाने सामाजिक अंतर ठेऊन वावर केला पाहिजे. प्रशासन सांगेल मग त्याचे पालन करू त्यापेक्षा स्वयंप्रेरणेने कोरोनाचा सामाना करा. गर्दी टाळा, संपर्क टाळा, मास्कचा वापर करा, योग्य ती माहिती संकलित करा, जे संदिग्ध वाटते त्याकडे दुर्लक्ष करा, घाबरु  नका काळजी घ्या.!
================
प्रिय वाचक मित्रांनो.! तुमचे आभार कसे मानावे कळत नाही. कारण, तुम्ही बातमी वाचतात आणि पुढे शेअर करतात त्यामुळे रोखठोक सार्वभौम या पोर्टलचे ४२६ बातम्या व लेखांचे ४० लाख ४० हजार वाचक झाले आहे. ते ही अवघ्या ३०० दिवसात. त्यामुळे, इतकी लोकप्रियता ही माझी नसून सार्वभौमचे प्रतिनिधी आणि बातमी शेअर करणाऱ्यांची आहे. तुमचे आम्ही मनापासून आभार मानतो. कारण एका दिवसाला किमान १ लाख ५० हजार लोक आपल्या सार्वभौमवर भेट देतात.


सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 426 लेखांचे 40 लाख वाचक)