मुलगा झाला नाही म्हणून छळ, डॉक्टरच्या पत्नीने केली आत्महत्या, अकोल्यातील कोतुळ येथील घटना! गुन्हा दाखल, तिघांना अटक
सार्वभौम (संगमनेर) -
मुलगा पाहिजे म्हणून गर्भाशयात असणार्या मुलीचा गर्भपात करण्यास प्रवृत्त करणार्या एका डॉक्टर पतीपुढे डी फार्म झालेली पत्नी हतबल होतेे आणि आत्महत्या करते. ही गोष्टी किती शोकांतीकेची वाटते ना? इतकेच काय! तर घरात दोन डॉक्टर, एक नर्स, एक मेडिकल असतांना देखील घर बांधण्यासाठी माहेरहून 20 लाखांची मागणी केली जाते व बापाला आपला त्रास नको म्हणून मुलगी हतबल होते. हे देखील एकताने मन सुन्न होते. असेच एक प्रकार अकोले तालुक्यातील कोतुळ येेथे घडला आहे. नवलेवाडी येथील अश्विनी हीने कोतुळला आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात हुंडाबळी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचे झाले असे की, अश्विनी हीचे डॉ. रोहित भुजबळ (रा. कोतुळ) याच्याशी विवाह झाला होता. काही दिवस दोघांचा संसार चांगला चालला होता. दरम्यान आश्विनीचे डी. फार्म झालेले असल्यामुळे तिला कर्ज काढून एक मेडिकल टाकून देण्यात आले होते. काही दिवसातच ती गर्भवती राहिली असता तिचे पती डॉक्टर महोदयांनी तिला सोनोग्राफी करण्यास सांगितले. मुलगा असेल तर गर्भ ठेवायचा अन्यथा तो नको. असे म्हणत त्यांनी पत्नीकडे आग्रह धरला. मात्र, जे असेल ते मला मान्य आहे. मात्र, गार्भपात नको अशी भुमिका तिने घेतली. त्यानंतर काही दिवसातच आश्विनीला मुलगी झाली. तेंव्हापासून तिचा शारिरीक व मानसिक छळ होऊ लागला. दरम्यान रोहित याने घराचे काम करण्याचे ठरविले होते. मात्र, त्यासाठी पुरेसा पैसा नव्हता. तेव्हा त्यांनी घरात बैठक बसविली आणि आश्विनीच्या घरच्यांकडून 20 लाख रुपये घेण्याचे ठरविले. ही बाब तिला समजली असता ती फार हतबल झाली. कारण, माहेरी इतकी मोठी रक्कम नाही हे तिला माहित होते. त्यामुळे तिने घरच्यांकडे पैशाची मागणी केली नाही. तरी देखील सासरच्यांनी तिच्याकडे तगादा कायम ठेवला. या त्रासाला कंटाळून तीने हा प्रकार तिच्या भावास सांगितला. आपल्या बहिनीचा संसार चांगला चालावा म्हणून या कुटूंबाने आपली जमीन विकण्यासाठी काढली. मात्र, त्याच वेळी कोरोनाचे संकट आले आणि शेतीला ग्राहक भेटले नाही. त्यामुळे, आश्विनीला घरच्यांनी त्रास देणे सुरूच ठेवले.
दरम्यान रविवार दि.17 मे रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अश्विनीच्या भावास तिचा सासरा डॉ. किसन भुजबळ यांनी फोन केला. की, तुझी बहिन आजारी असून तिला डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी अॅम्ब्युलन्स घेऊन ये. हा निरोप कळताच तिचा भाऊ तत्काळ अॅम्ब्युलन्स घेऊन कोतुळकडे रवाणा झाला. तो रस्त्यात असताना तिच्या सासर्याने पुन्हा फोन केला की, तुमच्या बहिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यावेळी आश्विनीचा भाऊ तिच्या घरी गेला असता तिला तिच्या घरातील बेडवर टाकलेले होते. त्यामुळे, हा प्रकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे असून हुंळाबळीचा आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी फिर्यादीनुसार डॉ. रोहित किसन भुजबळ, डॉ. किसन भुजबळ, सुनंदा किसन भुजबळ, राहूल किसन भुजबळ, मंगल राहूल भुजबळ अशा पाच जणांना आरोपी केले आहे. तर यातील रोहीत, किसन स राहूल यांना पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी अटक केली असून या गुन्ह्यात पीडितेला योग्य न्याय देण्यात येईल अशी प्रतिक्रीया अधिकार्यांनी दिली आहे.दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. मयताचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. हा गळफास आहे की काय याचे उत्तर देखील वैद्यकीय अहवालात येणार आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई दिपक ढोमने करीत आहेत.