मा. मधुकर पिचड साहेबांच्या, कर्तुत्वाला समजून घेताना ! - मा. मधुभाऊ नवले



1972 ला राज्यात दुष्काळाचे भयंकार मोठे सावट होते. दुष्काळाची तीव्रता राज्यभर अधिक होती. अकोले तालुक्यात पावसाअभावी दुष्काळ शतकात कधीतरी एकदा पडतो. अधिक पाऊस झाल्यानंतरची हानी मात्र नेहमीच होत असते. एव्हाना देखील जमीन वाहून जाते. कष्टाने घातलेल्या बांधबंदिस्तीचे अतिवृष्टीमुळे अस्तित्व राहत नाही. जनावरे दगावतात. रोगराई वाढते. अतिपर्जन्यवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाला सामोरे जाणे हे अकोले तालुक्यासाठी नित्याचे आहे. मात्र कोरडा दुष्काळ या तालुक्यात 1972 च्या निमित्ताने जनतेला  अनुभवायला मिळाला.
                    या दुष्काळाची तीव्रता फार भयानक होती. त्यावेळी विधात्याच्या मनात काय आहे हे ठाऊन नाही. मात्र, कधी-कधी संकटसुद्धा वरदान लाभावे असे भाग्य घडते. या भयावह दुष्काळाच्या संकटाने अकोले तालुक्याला अशीच वरदान ठरणारी अनोखी भेट दिली. त्याकाळी मधुकरराव पिचड साहेबांच्या सक्षम नेतृत्वाचे वरदान दुष्काळी काळात जनतेला लाभले. तालुक्याला कार्यक्षम नेतृत्व मिळून गेले. अकोले तालुका पंचायत समितीच्या सभापती पदावर मा. मधुकरराव पिचड साहेब होते. स्व. यशवंतराव भांगरे आमदार असताना पिचड साहेबांनी सभापतीपदाची धुरा सक्षमपणे सांभाळली. दुष्काळाचे संकट पिचड साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वासाठी आव्हान समजून समर्थपणे पेलले. आदिवासी बेल्टमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या फार बिकट होती. वाडीवस्तीपर्यंत पाणी पुरविण्याचे नियोजन करणे आवश्यक होते. पूर्ण तालुक्यात अन्नधान्याची गरज भागविण्याइतके खरीपाचे पिक हाती लागले नव्हते. हाताला काम मिळणे हे प्राणवायूइतके अत्यावश्यक होते.  रोजगार हमीची कामे सुरु करणे व मजुरांना कामावरच सुकडीचे वाटप करून पोटाला अन्न पुरविणे ही लोकप्रतीनिधी व प्रशासनावरील मोठी जोखीम होती.
                         
सभापती या नात्याने संकटकाळात जनतेच्या पाठीशी उभे राहण्याचे काम मा. पिचड साहेब यांनी कर्तव्यदक्षपणे बजावले. प्रशासनाला गतीमान करून त्यांनी दुष्काळाचा सामना केला. अनेक कुटुंबाना दुष्काळ आपला मित्र वाटावा असे नियोजन त्याकाळात पिचड साहेबांचे होते. रस्ते, विहीर, पाझर तलाव, वसंत तलाव व बांधबंधिस्ती ही कामे दुष्काळाच्या काळात होऊन गेली. दूरदृष्टीने व नियोजनबद्ध प्लॅनिंग ही कामे झाल्याने 1972 नंतरच्या पावसाळ्यात जलसंधारण कामाचा भूगर्भातील वॉटर टेबल वाढणेस मोठा लाभ झाला. दळणवळणाचे प्रलंबीत प्रश्न मार्गी लागले. मधुकरराव पिचड साहेब कर्तबगार नेते म्हणून जनतेला परिचित झाले. कितीतरी कर्तव्यसक्षम व्यक्ती संधी अभावी बाजूला पडतात.
  अनेकांना संधी मिळते पण त्यांना कर्तुत्व सिद्ध करता येत नाही. अगदी थोडक्या व्यक्ती अशा असतात की ज्या संधी मिळताच तिचे ते सोनं  करतात. मधुकरराव पिचड या थोडक्या व्यक्तीमधील एक आहेत, जे संधीचे सोनं करू शकले.
                            सभापतीपदाच्या माध्यमातून शिडीवर ठेवलेला पाय त्यांनी वरच्या पावक्यावर टाकीत ‘आमदार’कीचा गड काबीज केला. आमदारकी मिळवणे ही महत्वकांक्षा अनेकांना असणे स्वभाविक आहे. मात्र आमदारकी ही जबाबदारी असते याची जाणिव बाळगणारे पिचड साहेब होते. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाची, मतदार संघातील माणसाना आधार ठरण्याची आमदारकी ही मोठी जबाबदारी असते याचे भान मात्र सर्वच लोकप्रतिनीधी ठेवीत नाहीत. याचे भान ठेवणारे संवेदनशील लोकप्रतिनीधी म्हणून मा. मधुकरराव पिचड साहेब यांची ओळख जनतेला झाली. इथेच साहेबांच्या राज्यव्यापी नेतृत्वाचा उदय झाला. प्रवरा नदी खोर्‍यातील पाण्याच्या थेंबाथेंबावर या तालुक्यातील नागरिकांचा व शेतकर्‍यांचा हक्क होता. तरीही पाण्यावाचून जनता वंचित होती. हा हक्क मिळविण्यासाठी प्रवरा पाटपाण्याची चळवळ मा. दशरथराव सावंत साहेब व आम्ही सुरु केली. चळवळीने नागरिकांची, शेतकर्‍यांची व समाजातील सर्व थरातील घटकांची दृष्टी विस्तारली.                               
आता प्रकाशाचा किरण जनतेला दिसू लागला. पाण्यावरील हक्क हा शाबुत करणे ही तालुक्यासाठी स्वातंत्र्यानंतरची दुसरी लढाई ठरली. पिचड साहेबांचे ‘सामाजिक शहाणपण’ या प्रसंगात दिसून आले. सत्ताधारी पक्षाचा आमदार हे राजकीय भूत त्यांच्या मनावर कधी स्वार झाले नसल्याने त्यांनी  जनहित विचारात घेवून आंदोलन दडपण्याच्या भूमिकेत न जाता आंदोलनाचे नेतृत्व करण्यास ते पुढे सरसावले. सावंत साहेबांसह सर्वांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले. पाटपाण्याचा हा लढा अक्षरश: पेटला. स्व. वसंतराव दादा पाटील व शरदराव पवार साहेब यांच्यापर्यंत या लढ्याचे गांभीर्य पिचड साहेबांनी पोहचवले. आंदोलक नेते व समाज यांचा विश्वास संपादन करून आमची भूमिका व मागणी न्यायाची आहे, हे राज्यकर्त्यांना पटवून देण्यात त्यांना यश आले. साहेबांनी आंदोलनाच्या माध्यमातून पाटपाण्याचा हक्क अखेर मिळविलाच. अकोले तालुक्यात हे आर्थिक परिवर्तन ठरले. केवळ प्रवरेचे पाणी पेटले इतकेच या आंदोलनाचे मर्यादित स्वरूप राहिले नाही. पेटलेले पाणी व पेटलेली मन शांत करताना मा. पिचड साहेबांचे कर्तुत्व आणि आता नेतृत्व आमदारकी पुरते मर्यादित राहिले नाही.  लढाऊ नेता ही त्यांची ओळख महाराष्ट्रापर्यंत पोहचली आणि राज्याच्या नेतृत्वाची संधी त्यांना मिळाली.
                      त्यांना मंत्रीमंडळात सामावून घेण्यात आले. राज्यमंत्री ते कॅबीनेट मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष आणि विधान सभेत विरोधीपक्ष नेतेपद अशा अनेक संधी त्यांना प्राप्त होत गेल्या. आदिवासी समाजाचे तसेच दिनदलित समाजाचे संघर्षशील नेते म्हणून ते देशपातळीवर पोहचले. आदिवासी समाज्याच्या हक्काची लढाई त्यांच्या नेतृत्वाखाली उभी राहिली. तरीही मतदार संघाकडे त्यांचे कधीही दुर्लक्ष झाले नाही. आपली प्रतिष्ठा, आपले बौद्धिक सामर्थ्य व दुरदृष्टी तसेच कर्तुत्व त्यांनी मतदार संघासाठी पणाला लावले. राज्याच्या नकाशावर अकोले तालुक्याला लौकिक अर्थाने विशेष स्थान प्राप्त झाले. तालुक्याचा सर्वांगीण विकास करून तालुक्याचा चेहरा साहेबांनी बदलून टाकला.
          प्रलंबित कामांच्या यादीला न्याय देत निळवंडे धरण, पिंपळगाव खांड धरण पूर्णत्वास गेले. पुनर्वसन समाधानकारक झाले. वीज गावगल्ली व वाड्यांपर्यंत पोहचली. दळणवळणांची लांबी कुठच्याकुठे निघून गेली. नदी-नाल्यावर पूल उभे राहिले. मुळा नदीवर के.टी.वेअर तर लघु पाटबंधारे तलाव बांधले गेले. उद्योग व शिक्षण क्षेत्र विकसीत झाले. 
   नागरी सुविधांची ‘सुबत्ता’ माणसांपर्यंत पोहचली. ‘विकास’ ही प्रक्रिया कधी व कुठेच थांबत नसते. कुटुंब असो की तालुका, राज्य असो कि राष्ट्र, व्यक्ती असो कि समाज यांची विकासात्मक भूक भाकरी सारखी आहे. चोवीस तासांत किमान दोनदा हि भूक भागवावी लागतेच. मानवी जीवनात किंवा सृष्टीच्या निसर्गचक्रात अव्याहतपणे विकासाची चाकं फिरती राहतात. विकास कामांना खंड नसतो याचा विचार नव्या पिढीने करण्याची गरज आहे. काल झालेली विकासाची कामे आज नविन पिढीने नाकारणे हे योग्य ठरत नाही. तरीही बिच्चारे राजकीय जीव कधी-कधी किंवा नेहमीच कुठं झाला विकास? काय झाला विकास? असले प्रश्न विचारतात. मात्र, त्यांना मागे वळून पाहू वाटत नाही. कुणाचाही त्याग अगर योगदान नाकारणे हे योग्य नाही हे समाजाने लक्षात घेणे आवश्यक आहे.
                                 
कार्यकर्ता म्हणुन माझी एक विचारप्रणाली आहे. जे उत्तम झालं ते मान्य करून अपूर्ण कामाची अपेक्षा जरूर ठेवावी. कुणा एका व्यक्तीला सातत्याने हे प्रश्न विचारणे म्हणजे राजकीय पुढार्यांनी आपली  निष्क्रियता उघडी करण्यासारखे आहे. अकोल्याच्या राजकारणात मी चाळीस वर्ष आहे.
            तितक्याच कालावधीत मी संगमनेर तालुक्यात सुद्धा संस्थात्मक कामात होतो. इच्छा असो अगर नसो माणूस दोन्ही तालुक्याच्या राजकीय संस्कृतीची मनांत तुलना करणारच. ही तुलना करतांना आपल्याकडे काम करणारांचे कौतुक फार कमी होते ही वास्तवता आहे. उलट, त्यांच्या कामाचे सामाजिक ऑडिट अधिक होते. सामाजिक ऑडिटला माझी हरकत नाही. मात्र वाईट याचे वाटते याच कामात अनेकांचे राजकीय जीवन खर्ची पडल्याचे आपण पाहतो. मा. पिचड साहेब यांना या मानसिक छळवणुकीतून जावे लागले आहे. तरीही जनता व जनहितांच्या कामांची नाळ ते तोडणार नाही.
 राष्ट्रीय पातळीवरील राजकीय नेता ही त्यांची जनमानसातील ओळख आहे. राजकीय टिकाकार ही ओळख पुसुन टाकण्याचा प्रयत्न करतीलही. मात्र, जनसामान्याच्या मनावरील त्यांची प्रतिमा मात्र कुणालाही पुसता येणार नाही हे प्रखर सत्य आहे.

- मधुकरराव नवले (भाऊ)
मो.नं. 8888975555

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------




(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 350 दिवसात 444 लेखांचे 49 लाख वाचक)