बाप दारु पिला म्हणून मुलाने घेतला जीव! अकोल्यातील बोरी गावातील घटना! मुलीने दिली बापाविरुद्ध फिर्याद! आरोपी अटक


सार्वभौम (अकोले) : 
                   दारु पिऊ नको, ती तुझ्या आरोग्यास घातक आहे. असे मुलाने वारंवार सांगून देखील बाप दारु पिल्याचा राग आल्याने त्याला मारहाण करण्यात आली. दरम्यान एक टोला जिव्हारी लागताच बाप मयत झाला. ही घटना अकोले तालुक्यातील कोतुळ परिसरात असणार्‍या बोरी येथे रविवार दि.17 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. यात भागवत गोमा कांबळे (वय 70) हे मयत झाले असून त्याचा पुत्र राजेंद्र भागवत कांबळे याच्यावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                   याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी राजेंद्र कांबळे याला दारु पिण्याचे व्यसन आहे. दारुमुळे आयुष्य उध्वस्त होते. आरोग्याला हानी होते हे माहिती असल्यामुळे तो आपल्या वडीलांना नेहमी सांगत होता. तुम्ही दारु पिऊ नका. अर्थात लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण अशी गंमत कांबळे यांची होती. सद्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे, भागवत यांचे वय झाल्यामुळे त्यांना शरिर फारसे साथ देत नव्हते. त्यातल्या त्यात ते मद्य पिल्यानंतर त्यांना जास्त काही सुदरत नव्हते. त्यामुळे, त्यांचा मुलगा राजेंद्र हा नेहमी समजून सांगत असे की, तुम्ही दारु पिऊ नका. पण, भागवत यांना देखील मद्याचे व्यसन असल्यामुळे त्यांना राहवत नव्हते.
                                दरम्यान देशात कोरोनाने सगळ्यांवर लॉकडाऊनची परिस्थिती ओढविली आहे. त्यामुळे गेली दिड महिना दारुचा अस्वाद घेण्यासाठी कोणाला मिळाला नाही. मात्र, शासन महसूल जमा करण्यासाठी सरसावले आणि त्याचा सर्व भार हा तळागाळातील मद्यपींवर टाकला. त्यामुळे, सगळेच भल्याभल्या रांगांमध्ये लागले. अखेर त्यात कोणीतरी भागवत यांना मद्य आणून दिले आणि त्यांच्याच मुलाने त्यांचा जीव घ्यावा इतकी दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली. राजेंद्र याने वडीलांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा जीव गेला. हा प्रकार त्यांच्या नातीस समजला असता तीने अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यात पोलिसांनी राजेंद्र कांबळे यास अटक केली असून त्यास पुढील तपासासाठी आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


महत्वाचे...

तर ते बाबा वाचले असते.!
आ. डॉ. किरण लहामटे यांनी गेल्या आठवड्यात अकोले तालुक्यातील मद्यविक्री बंद करण्याची विनंती जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांना केली होती. त्यात म्हटले होत. अकोले तालुका हा आदिवासी व दुर्गम असून येथे घरातील कर्ता माणूस दारु पिल्यानंतर घरात वाद होतात. घरात हाणामार्‍या होतात. त्यामुळे कुटूंबिक जनजीवन विस्कळीत होत आहे. त्या कारणास्तव तालुक्यातील मद्यविक्री बंद करण्यात यावी. जर आमदार यांचे म्हणणे सरकारने परसले असते तर आज एक बळी गेला नसता. त्यामुळे, त्यांनी केलेली मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे.
सागर  शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 28 लाख वाचक)