चुलता पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू, अकोल्यातील पिंपळगाव निपाणी येथील घटना!


सार्वभौम (पिंपळगाव निपाणी) : 
                       अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येेथेे शेततळ्याचे काम करण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.17) रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास गोर्डे वस्ती येथे घडली. यात कार्तिक सुनिल गोर्डे (वय 20) तर अनिल खंडू गोर्डे (वय 40) हे मयत झाले आहे. कार्तिक हा संगमनेर येथे डिप्लोमाच्या दुसर्‍या वर्षाला होता. तर अनिल हे शेतकरी होते. या घटनेमुळे या परिसरावर शोककळा पसरली आहे.
                  याबाबत सविस्तर माहिती अशी की, देशात कोरोनाचे संकट असल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती आहे. लोक घरात बसून कंटाळले असून उन देखील मी म्हणत आहे. अशा परिस्थितीत देखील शेतकरी त्यांचे काम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, लॉनडाऊनमुळे हतबल झालेल्या शेतकर्‍याला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. तर काही ठिकाणी जीवघेण्या संकटांना देखील सामोरे जावे लागत आहे. कारण त्याचे झाले असे की, रविवारी पिंपळगाव निपाणी येथे दुपारी कार्तीक हा शेतातील शेततळ्याचे लिकेज काढण्यासाठी गेला होता. काम करीत असताना त्याचा पाय घसला व तो पाण्यात पडला. हा प्रकार त्यांचे चुलते अनिल यांच्या लक्षात आला असता त्यांनी कार्तिकला वाचविण्यासाठी थेट शेततळ्यात उडी मारली. काही काळ अनिलने मोठे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही. जरा वेळात त्यांना देखील दम लागला आणि ते देखील बुडाले. अखेर दोघांनी आपल्या प्रयत्नांना पुर्णविराम दिला. दरम्यान काही काळानंतर हा प्रकार मळ्यातील लोकांना समजला असता त्यांनी दोघांना पाण्याच्या बाहेर काढले. तर तत्काळ उपचारासाठी रूग्णालयात नेले. मात्र, तोवर फार उशिर झाला होता.
                      दरम्यान अकोले तालुक्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कोरोनाचा एकही रुग्ण मिळून आला नाही. मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या कारणाने पाण्यात बुडून तब्बल आठ जणांचे मृत्यू झाले आहे. यात लहित येथे एका आदर्श शिक्षकासह दोन इंजिनियर आपण गमविले. त्यांच्या पाठोपाठ, उंचखडक बुद्रख व उंचखडक खुर्द येथे प्रत्येकी एक आज दोन आणि कोतुळ परिसरातील अपंग व्यक्ती असे आठ जणांचे मृत्यू झाले आहे. त्यामुळे, लॉकडाऊनच्या काळात घरात बसा. मात्र, नदी, शेततळे किंवा जीवघेण्या ठिकाणी जाऊ नका असे आवाहन प्रशासनाने केले आहे.