राज्याचा लॉकडाऊन पुन्हा वाढला. 31 मे पर्यंत घरात बसायचे, काही नियम व अटी राखून चालु राहणार तालुके!


सार्वभौम (मुंबई)  : 
                 महाराष्ट्र राज्यात 31 मे पर्यंत लॉकडऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज रविवार 17 मे रोजी संपणार होता. केंद्राने आधीच लॉकडाऊन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मात्र याबद्दल कोणतीही घोषणा केली नव्हती. आज अखेर राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली असून 31 मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्योग टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहेत. पण करोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी कंटेन्मेंट झोनमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नाही. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्राच्या नियमावलीची आपण वाट पाहत असून त्यानंतर आपली नियमावली जाहीर करणार आहोत. यावेळी दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक जिल्ह्याने आपली परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची मुभा देण्याचा विचार आहे. प्रत्येकाला काळजी घेणं आवश्यक राहणार आहे. सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावं अशी अपेक्षा असणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
दरम्यान या काळात काही नियम शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यात आणि तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही. किंवा ते कोरोनामुक्त झाले आहे. तेथे काही उद्योग व व्यवसायांना बळकटी देण्यासाठी काही नियम शिथिल करण्यात येऊ शकतात. तसा अधिकारी जिल्हाधिकारी आणि स्थानिक अधिकारी यांच्या समन्वयातून पुढे निघेल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत हॉट्स्पॉट क्षेत्रात नियम शिथिल केले जाणार नाही. काही ठिकाणी रोटेशन पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. जसे की, अकोले तालुक्यात आठवडाभरात वेगवेगळ्या दुकानदारांना दुकाने उघडता येणार आहेत. तर संगमनेर पुर्णत: बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे, असे निर्णय घेण्याच्या अधिकार जिल्हाधिकार्‍यांना असणार आहे.
राज्यातील हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा आहे. 31 मे पर्यत जर कोरोना अटोक्यात आला तर पुढे जून महिन्यात पुन्हा नव्याने राज्य पुर्वपदावर येऊ शकते. मात्र, असे झाले नाही. तर पुन्हा लॉकडाऊन वाढू शकतो. त्यामुळे, नागरिकांनी येत्या 14 दिवसात स्वत:ची काळजी घ्यावी, घरात बसून शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.