निंबाळे गावचा तो तरुण निगेटीव्ह! लॅबचा भोंगळा कारभार चव्हाट्यावर! प्रशासनासह नागरिकांचा संभ्रम.!



सार्वभौम (संगमनेर) : 
                           संगमनेर शहराच्या अगदी जवळच निंबाळे येथे एका 30 वर्षी तरूणास कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्याच्या अहवालात प्रचंड संदिग्धता असल्याचे समोर आले आहे. कारण, मंगळवार दि. 19 रोजी त्याचे स्वॅब धुळ्याला पाठविण्यात आले होते. ते आज प्राप्त झाले असून रविवार दि.24 रोजी पुण्याला पाठविण्यात आलेला अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे हा व्यक्ती क्वारंटाईन नसून दुनियाभर फिरुन आला आहे. एक रिपोर्ट पॉझिटीव्ह तर एक निगेटीव्ह असे द्विधा रिपोर्ट असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी झाली असून नेमकी हा तरुण बाधित आहे की नाही. यासाठी पुन्हा टेस्ट करावी लागणार आहे. मात्र, सध्या जो नव्याने घेण्यात आलेला अहवाल आला आहे तो निगेटीव्ह असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
                     याबाबत सविस्तर माहिती अशी की, निंबाळे येथील एका तरुणाला 19 मे रोजी भुरळ आली होती. त्यामुळे तो नाशिक येथील एका रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेला होता. यावेळी त्यास त्रास होत असल्यामुळे त्याचे स्वॅब घेऊन धुळ्याला पाठविण्यात आले होते. कारण, नाशिक येथील लॅब बंद असल्यामुळे धुळ्याच्या रिपोर्टची प्रतिक्षा करावी लागली. मात्र, तेथील भोंगळ कारभारामुळे तो अहवाल पडून राहिला. रिपोर्ट येत नाही म्हणून नाशिकच्या डॉक्टरांनी याचे नमुणे रविवार दि.24 मे रोजी पुन्हा पुण्याच्या लॅबला पाठविले. ते रिपोर्ट निगेटीव्ह असल्यामुळे या निंबाळ्याच्या तरूणास सोडून देण्यात आले. आज नऊ दिवसानंतर धुळ्याचे रिपोर्ट नाशिकच्या रुग्णालयात प्राप्त झाले. त्यांनी याबाबत माहिती संगमनेर प्रशासनाला कळविली आहे. म्हणजे धुळ्याची गंमत वरातीमागून घोडे सोडल्यासारखे झाले आहे. यात संगमनेर प्रशासनाची डोकेदुखी झाली आहे.कारण, त्यांना पुण्याच्या लॅबचे विश्वसनिय रिपोर्ट प्राप्त झाले असून आता नऊ दिवसांनी धुळ्याचे रिपोर्ट आले आहे. त्यामुळे ही लॅबची संदिग्ध माहिती प्रशासनासाठी एक डोकेदुखी ठरली आहे. तरी प्रशासनाने सावध भुमिका घेऊन दोघांना क्वारंटाईन केले आहे.
                        दरम्यान या कोरोना बाधिताची सासरवाडी जांबुत येथे असून तो तेथे होता तेव्हा त्याला भेटण्यासाठी मुंबईहून काही पाहूणे आले होते. त्यांना निंबाळे येथे प्रशासन व गावातील काही जागरुक नागरिकांनी क्वारंटाईन केले आहे. मात्र, या कोरोना बाधित व्यक्तीचा निंबाळे गावशी कोणताही संपर्क आलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. 
कोरोना बाधित रुग्ण हा गेल्या काही दिवसांपुर्वी संगमनेर तालुक्यातील जांबुत येथे त्याच्या सासरवाडीला गेला होता. तेथे नेमकी कोणाच्या संपर्कात आला हे सिद्ध झाले नाही. मात्र, त्याची बहिन मुंबईहून भेटण्यासाठी आली होती. त्यामुळे, त्या दृष्टीने प्रशासनाची यंत्रणा काम करीत आहेे.
- सुशांत पावसे