केळेवाडी दंगा, पोलीस मागे लागले अन त्याने तळ्यात उडी टाकली आणि तो मयत झाला!


सार्वभौम (संगमनेर) : 
                    संगमनेर तालुक्यातील केळेवाडी येथे तलाव व बोरच्या पाण्याहून दोन गटात वाद झाले होते. यात उत्तरेकडील गटाने वरच्या दक्षिणेकडील गटातील 29 जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्याला प्रतिउत्तर म्हणून आज सकाळी वरच्या गटाने खालच्या गटातील 45 जणांवर गुन्हा दाखल केला होता. दरम्यान आज दुपारी दोन्ही गट आमनेसामने आले होते. त्यावेळी पोलीस देखील तेथे उपस्थित होते. यावेळी दोन्ही गट एकमेकांना भिडले असता पोलिसांनी जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एक तरुण जिवाच्या आकांताने पळु लागला असता त्याने तळ्यात उडी मारली. मात्र, त्यास पोहता येत नसल्यामुळे तो तळ्यात बुडून मयत झाला आहे. निकेश लक्ष्मण लामखेडे (वय 30) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

                           याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी दि.24 रोजी दुपारच्या सुमारास येथे तळ्याच्या पाण्याहून वाद झाले होते. त्यामुळे तळ्याच्या उत्तरेस असणार्‍या जमावाने एस.बी लामखडे यांच्या शेतातील पाईपलाईन कुर्‍हाड व दगडाने फोडून टाकल्या होत्या. त्यावेळी आरोपी यांनी धमकी दिली होती की, जशा तुमच्या पाईपाईन फोडल्या तसे तुम्हाला फोडून काढू अशी धमकी देत शिवीगाळ, दमदाटी केली होती. असे लामखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तर आज या फिर्यादीस प्रतिउत्तर म्हणून सकाळी दक्षिणेकडे असणार्‍या वरच्या गटाने खालच्या गटाच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. यात 45 जणांना आरोपी करण्यात आले होते. 
                        हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज मंगळवार दि.26 रोजी दुपारी दोन्ही गट आमनेसामने आले होते. दरम्यान या ठिकाणी पोलीस देखील उपस्थित होते. त्यांच्या समोर हा प्रकार घडला असता त्यांनी जमाव पांगविण्यासाठी थोडी धरपकड सुरू केली. यावेळी जमावात असणारा निकेश लामखेडे याने आपला जीव वाचविण्यासाठी पळापळ सुरू केली. मात्र, जेव्हा कोठेही पळण्यास जागा दिसली नाही. तेव्हा त्याने तळ्यात उडी मारली. मात्र, त्यास पोहता येत नव्हते त्यामुळे तो पाण्यात बुडून मयत झाला.
                       
 या घटनेनंतर त्यास स्थानिक रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तोवर फार उशिर झाला होता. या मयत व्यक्तीच्या मृत्युचे कारण वेगवेगळे सांगितले जात असले तरी स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी धरपकड सुरू केली असता तो जीवाच्या अकांताने पळाला व त्याचा पाण्यात बुडून मृृत्यू झाला. याबाबत पोलिसांना माहिती विचारली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.