मधू ते मधुभाऊ.! एक शुन्यातून सुरू झालेला प्रवास!
रोखठोक सार्वभौम
तो काळ 1978-79 चा होता. घरात बुवासाहेब नवले यांच्या रुपाने अन्यायाविरुद्ध बंडाचे वारे ‘आरपार’ वाहत होते. राज्याच्या नकाशावर स्पष्ट अक्षरानी अकोले तालुक्याचे नाव दर्शविल्याचे दिसत होते. इतकी मोठी कम्युनिष्ट चळवळ त्यांनी गावासह तालुक्यात आणि राज्यात रुजविली होती. या गोष्टीचा त्यांच्यानंतर नकळत प्रभाव त्यांच्या विचारांचे वारसपुत्र मधुकर नवले यांच्यावर पडत चालला होता. त्यामुळेच की काय! जसे समजायला लागले तेव्हापासूनच त्यांच्या अंगभूत गुणांचे कौतुक बड्या-बड्या नेत्यांच्या तोंडचे कौतुक होऊ लागले होते. ते फारसे श्रीमंती घेऊन जन्माला आले नव्हते, शेतकरी पुत्र आणि आजच्या बाजारतळावर बसून कांदे घ्या कांदे असा साद घालणारा तो लहानसा शेतीपुत्र अकोले शहराच्या माथ्यावरच इवल्याशा नवलेवाडीच्या कुशीत या कर्तुत्वाचा जन्म झाला होता. त्याकाळी समाज आज सारखा स्वार्थी नव्हता. दिल्या घेतल्याची जाण होती. कारण, तेव्हा जन्मत: सामाजिकता रक्तात नसली तरी ती जन्मानंतर समाजात आल्यानंतर ती ओतप्रोत भरलेली असे. कारण, ती पिढी जरा वेगळीच होती. त्याकाळी नवलेवाडीत तरुण मुलांनी ‘निलकमल’ नावाचे युवामंडळ सुरू केले होते. त्यातून ‘साऊंड व मंडप’ डेकोरेशनचा व्यवसाय सुरू होता. म्हणतात ना ! अनुवंश आणि अंगभूत कला ही कितीही दडपली तरी तिचा जन्म हा नकळत कृतीतून होत असतो. असेच काहीसे भाऊंचे होते. संघटन आणि नेत्रुत्व असेल नसेल. पण, निवेदन कला ही त्यांच्यात ओतप्रोत भरलेली होती. सुदैव असे की, त्याकाळी ‘अमिन सयानी’ या निवेदकाने आपल्या आवाजाच्या कौशल्याने जगाला ‘वेड’ लावले होते. त्यांचा या तरुणावर फार मोठा प्रभाव होता. त्यामुळे त्यांची हुबेहुब नक्कल करीत ते ‘मनव्यक्त’ विहंग करीत असे.
अर्थात त्यांच्यातील कलाकार त्यांनी स्वत: दुर्लक्ष केले होते. मात्र, तमाम अकोलेकरांनी त्यांच्यातील ‘सयानी मोहदायांनी’ अगदी दिलखुलासपणे डोक्यावर घेतले होते. त्यानंतर लग्न, समारंभ आणि सांस्कृतीक कार्यक्रम यातून त्यांना फार चांगली दाद मिळत गेली आणि एक प्रसिद्ध निवेदक म्हणून त्यांच्यासारख्या शेतकरी मुलाचा चेहरा तालुक्यातून नावारुपाला आला. नाहीतर, डोक्यावर पाटी घेऊन अकोल्याच्या बाजारतळात कांदे विकणारा तो. कोण कुठला ‘मधू’ !! तेथेच बाजारतळाच्या ‘दगडगोट्यांत’ पाटीभर कांद्याची टोपली दहा पैशाचा कर भरुन दोन-दोन आणे जमा करत बसला असता. मात्र, ‘दैवाला’ ते मान्य नव्हते. कालवर ज्या बाजारतळावर कांदे विकण्यासाठी त्यांचा क्षीण झालेला आवाज ग्राहकांना आळवत होता. आज तोच आवाज, त्याच बाजारतळावर लाखो शेतकर्यांचा प्रश्न घेऊन गुंजताना अनेकांनी आजवर पाहिला आहे. हेच कदाचित दैवाला मान्य होते..! कारण, उद्याच्या वर्तमानात त्यांच्या राजकीय पटलावरी पक्ष बदलले तरी, त्यांचे तत्व कधीही बदलणार नाही. हे देखील नियतीला ठाव होते. म्हणून कर्मयोगाने कालचा ‘मधू’ हा आज ‘मधुभाऊ’ या नावाने जनतेच्या मनावर ‘अधिराज्य’ गाजवत आहे.
पुढे एक ‘उत्क्रुष्ठ निवेदक’ म्हणून उठत्या-बसत्या प्रतिष्ठीत व्यक्तींमध्ये त्यांची चर्चा होऊ लगली. त्याकाळी म्हणजे 1979 साली विधानसभा निवडणुकांचे नुकतेच वारे वाहू लागले होते. तेव्हा कॉ. सक्रुभाई मेंंगाळ यांचा प्रचार करताना त्यांना एक नामी संधी चालून आली होती. शेतकर्यांविषयी जन्मजात आत्मियता असल्यामुळे त्यांना कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घ्यावा, हा प्रश्न कधीच पडला नाही. ‘लाल निशान’ हाती घेऊन तो रंग रक्तात कसा मिसळला काहीच कळले नाही. या दरम्यान एक मात्र झाले. कालचा ‘निवेदक’ आज ‘वक्ता’ म्हणून कसा पुढे आला हे ना त्यांना उमगले ना जनतेला. येथे एका गोष्ट लक्षात आली. की खर्या सोन्याला पारख करण्याची गरज भासत नाही. खरं सांगायचे तर शेती, तरुण मित्र मंडळ आणि निवेदक आणि वक्ता आता हा सामाजिक प्रवास येथेच थांबला नाही. तर त्याला नकळत राजकीय डोहाळे लागत गेले. सत्ता नको, पद नको, पण जनतेची मस्तक ठिकाण्यावर आणण्याचा वसा त्यांनी घेतला आणि कदाचित येथेच त्यांच्या राजकिय जिवणाचा उगम झाला. पुढे 1978-79 च्या काळात जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या होत्या. तेव्हा कॉ. कारभारी उगले व भाऊसाहेब पाटील यांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी दंड थोपटले. विचारांच्या लढाईने जग कसे जिंकता येते याचा त्यांनी प्रचंड अभ्यास केला होता. म्हणून तर या चळवळीचे रोपटे अगदी प्रचंड वेगाने वाढत होते. हा प्रवास असाच वाढता झाला. सन 1981 साली ते खर्या अर्थाने कम्युनिष्ट पार्टीचे सदस्य झालेे. हातात लाल बावटा पडला की त्याचे संक्रमण जणू रक्तात भिनत होते. त्यामुळे ही चळवळ आता त्यांना शांत बसू देत नव्हती. काळानुरुप त्यांच्या कार्याला इतकी गती मिळत गेली. की, 1983 साली कम्युनिष्ट पक्षाचा तालुका सेक्रेटरी म्हणून त्यांना नियुक्ती मिळाली.त्यावेळी, मधुकर पिचड हे तालुक्याचे आमदार होते. तर शेतकरी नेते म्हणून दशरथ सावंत यांचे नाव सन्मानाने अग्रस्थानी होते. तेव्हा ‘पाट-पाणी’ लढा, विडी कामगार, शेतीचे प्रश्न हे ऐरणीवर होते. त्यावर सावंत यांनी प्रचंड मोठी चळवळ उभारली होती. आणि तेव्हा सावंत साहेबांचा ‘उजवा हात’ म्हणून त्यांचे नाव ‘अग्रभागी’ होते. आजवर अकोल्याच्या चळवळीत कधी नव्हे इतका जनाधार 1983 ते 90 या काळात त्यांच्या चळवळीला मिळाला होता. तेव्हा एक ‘लोकमान्य कार्यकर्ता’ म्हणून मधुभाऊ यांना समाजाने स्विकारले होते. मात्र, त्यांच्या मनात एक खंत कायम नांदत होती. ती म्हणजे, येथे विडी कामगार चळवळ मोठ्या प्रमाणात होती. त्या तुलनेत शेतकर्यांच्या न्यायी हक्काचा लढा कमी होता. जर कम्युनिष्ट पक्षाला येथे बळ द्यायचे असेल. तर, शेतकर्यांचे प्रश्न उभे करून त्यांना न्याय देणे. या मागणीवर ते ठाम राहिले. हळुहळू त्यांची विचारधारा प्रगल्भ होत गेली. सर्वव्यापी प्रश्नांवर ते वैचारिक ठेवा मांडत होते. मात्र, कम्युनिष्ट पार्टीची जी तत्व आणि पत्थ्य होती. त्याला त्यांच्याकडून कधीही गालबोट लागणार नाही. याची ते कटाक्षाने काळजी घेत होते. या पक्षीय जबाबदारी बरोबरच मुरलीधर नवले (1973) व बुवासाहेब नवले (1979) यांच्या पश्चात नवलेवाडी गावची देखील खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. कारण, त्यांच्या खांद्यावरील लाल बावटा आता मधुभाऊंनी स्वत:च्या खांद्यावर घेतला होता. संघटना वाढविणे आणि त्यातील प्रगल्भता व प्रखरता जिवंत ठेवणे हे त्यांच्यासमोरील मोठे आव्हान होते. ते पेलण्यासाठी आता ते पुर्णपणे सक्षम व यशस्वी झाले होते. असे म्हटल्यास काहीच वावघे ठरणार नाही.
अकोल्यात कम्युनिष्ट चळवळीने आता जोर धरला होता. कारण, शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांची उत्तरे आता त्यांना सहज-सहज शोधू लागली होती. तर संघर्ष हा देखील आमच्या रक्तात मिसळला होता. याचे कारण म्हणजे जो लाल बावटा त्यांच्या खांद्यावर होता. त्याचे ब्रिद हे शेतकरी कामगार यांच्या उन्नतीचे होते. त्यामुळे नकळत रक्तरंजीत झेंडे रक्तमिश्रीत अंगात भिनून गेले होते. दरम्यानचा काळ पाणी प्रश्नामुळे दशरथ सावंत हे मधुकर पिचड यांच्यासोबत होेते. त्यामुळे कॉ. उगले यांच्या पाठीशी उभे राहून त्यांनी चळवळीला बळ दिले. हवे तेथे त्यांनी मुठी आवळल्या. तर अरविंद नवले, शांताराम वाळुंज यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांच्या बरोबरीने एक नवोदीत कार्यकर्ता म्हणून त्यांचा चेहरा पुढे आला होता.
शेतकर्यांविषयी आत्मियता आणि न्याय देण्याची उर्मीही अंगात प्रखर निर्माण झाली होती. त्यामुळे, भाऊ जेव्हा सेक्रेटरी होतो. तेव्हा अकोल्यात सक्रिय चळवळीचे 72 सभासद होते. तर, नंतरच्या काळात 1997 पर्यंत त्यांनी 2 हजार 900 शे सभासद उभे केले होेते. यात एक विशेष बाब म्हणजे तेव्हा संपुर्ण महाराष्ट्राचे 2 हजार 500 सभासद होते. तर एकट्या अकोले तालुक्यात 2 हजार 900 सभासद त्यांच्या टिमने निर्माण केले होते. त्यामुळे, तालुक्यातील त्यांचे काम काय? हे नव्याने कोणाला सांगायची गरज कधीच पडली नाही.
या सर्व समर्पनाचे फलित म्हणून 1983 ला ग्रामपंचायत, अकोले एज्युकेशन सोसायटी, खरेदी विक्रीसंघ, सेवा सोसायटी, दुधसंघ अशा अनेक संस्थावर त्यांना कामे करण्याची संधी मिळाली होती. त्यात ते सार्थपणे यशस्वी ठरलेे. तर, 1989 ला सहकारी साखर कारखान्यावर तर 1982 ला झेडपीवर निवडून जाण्याचे भाग्य त्यांना लाभले. खरंतर भाग्य कसे म्हणता येईल. त्यासाठी त्यांनी अगदी लहानपणापासून आपला देह उगळला होता. आता लोकांना वाटले होते. राजकारण सुरू झाले की समाजकारण संपते. पण, भाऊंच्या बाबतीत ते मुल्यमापन फेल ठरले. कारण, अशा परिस्थितीत देखील त्यांनी आंदोलनाकडे कधीही पाठ फिरविली नाही. कारण, ज्या जनतेने मला उभे केले. त्यांची उतराई होण्यासाठी संधी मी कधीच गमविणार नाही. कारण, असे झाले असते तर, ज्या काळ्या मातीत मी राबलो, त्या मातीने मला कधीच माफ केले नसते. असेच त्यांचे विचार होते. त्यामुळे, पदाचा वापर करून, जनतेची काम करण्याचे भाग्य कपाळी लावून ते समाजात मोठ्या ऐरावतासारखे मिरवत होते. तर, काम केल्यानंतर चळवळ व पक्ष आपोआप कसा मजबुत होतो. याची प्रचिती त्यांना आली होती. दरम्यानच्या काळात त्यांच्या जीवणाची प्रचंड ओढाताण होत होती. परिणामी सन 1997 साली त्यांचा अपघात झाला आणि संपुर्ण धावपळीला पुर्णविराम बसला. गेली तीन वर्षे प्रचंड अस्वस्थता त्यांनी सहन केली. ज्या शेतकर्यांच्या प्रश्नासाठी ते लढत होतेे. ते मनात मुके होऊन दडून बसले होते. अपघाताने विचारांची घुसमट व शरिराची पोखरण होत होती. पण, पर्याय शुन्य होता. ते म्हणतात, त्या तीन वर्षाचा कालावधी मी चळवळीसाठी काळ्या पाण्याच्या शिक्षेत भोगला असता. तरी मी स्वत:ला भाग्यवान समजलो असतो. इतक्या खिन्न शब्दांचे हे बोल खरोखर काळजाला भिडून जाते.
पुढे सन 2000 मध्ये ते पुन्हा चळवळीत सक्रिय झाले. मात्र, पुर्वी जी लखलखीत विचारांची धार होती. ती अगदीच बोथट झाली होती. जो चळवळीत उत्साह होता. तो निश्तेज झाला होता. याचे कारण म्हणजे, डाव्या पक्षातील कार्यकर्ते सहकारी साखर कारखान्यावर निवडून गेले तेव्हा. चळवळीला सत्तेचे भेरुड लागले होते. प्रस्तापितांवर होणारी विरोधाची धार सत्तेच्या लालसेपोटी अगदी बोथट झाली होती. कालपर्यंत अगदी शौर्याने लढणारा पक्ष सत्तेच्या इर्शेत कधी बुडाला काहीच कळले नाही. मतभेदाचे टोक पराकोटीला गेले आणि चळवळीला खर्या अर्थाने उतरती कळा लागली. कालवर तत्वांसाठी हातात हात घेऊन लढणारे लालबावटे आज एकमेकांच्या पायात-पाय घालू लागले होते. एकवेळी मतभेद ठिक होता. परंतु, मनभेदाने चळवळ पोखरली गेली. एकात एक नाही, आणि बापात लेक नाही असे कालचे कुटुंब आजचे विभक्त वैरी झाले होते. याच कारणास्तव मधुभाऊ नवले यांनी 2006 मध्ये कम्युनिष्ट पक्षाचा राजिनामा दिला आणि थेट काँग्रेसमध्ये दाखल झालेे.त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते काँग्रेसच्या छताखाली कम्युनिष्ट चळवळ सांगू लागले. पण, एक मात्र नक्की, पक्ष बदलला म्हणजे त्यांची विचारधारा बदलली असे कोणाला वाटत असेल. तर, ते निव्वळ अल्पज्ञान ठरेल. ते तेथे गेल्यानंतर देखील त्यांनी कधी डाव्या विचारांच्या मुशीला ग्रहन लागू दिले नाही. त्यांनी त्यांची मूस कम्युनिष्ट मुल्यांवर पक्की ठेवली होती. त्यांचा पक्ष नक्कीच बदलला होता. मात्र, तत्व आणि स्वभाव चळवळीचाच होता. पुढे काँग्रेस पक्षात काम करताना त्यांना अनंत अडचणी आल्या. मात्र, ते तेथे समाधानी राहिले नाही. त्यांची अवधी दहा वर्षे तेथे फुकट गेली अशी खंत ते आजही बोलून दाखवितात. कारण, काँग्रेस पक्षात त्यांनाच काय त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील काम करण्यास वाव मिळाला नाही. तरी काँग्रेस पक्षात ते किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. हे काम करताना त्यांना तालुक्यात विशेषत: बहुतांशी अडचणी आल्या. येथे काँग्रेसचे संघटन अल्प असल्यामुळे आंदोलने, मोर्चे आणि विरोध करताना संकुचित पाठबळ मिळत होते. त्यामुळे तीन वर्षापुर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. येथे देखील त्यांना चांगले स्थान मिळाले होते. त्यांना महाराष्ट्र किसान सभेचा उपाध्यक्ष म्हणून त्यांना काम करण्याची संधी दिली. मात्र, कालांतराने राजकीय बदलाचे वारे वाहिले गेले.
पुढे अकोल्याची प्रस्तापित राष्ट्रवादी भाजपच्या वाटेवर गेली, त्या ओघात त्यांनीही प्रवाहाच्या दिशेने पाऊले टाकली मात्र, ते ना तालुक्याला पटले ना जनतेला. त्यामुळे त्यांच्यावर टिका झाली खरी. पण, वास्तवत: पुरोगामी चळवळ, विचारांचे व्यासपीठ, चळवळीचा कणा म्हणून जर कोणाकडे पाहिले जाते तर ते खरोखर मधुकर नवले यांचा चेहरा पहिला डोळ्यासमोर उभा राहतो. सद्या चळवळींनी वैराग्य धारण केले आहे. त्यामुळे, केवळ विचारांच्या बैठका सुरू आहेत. मात्र, भाऊंनी अभ्यास आणि शिक्षणाची एक अभिनव चळवळ उभी केली आहे. सध्या त्यांनी स्वत:ला त्या चळवळीत गुंतून घेतले आहे. अशा विचारांच्या व्यसपीठाला उदंड आयुष्य लाभो. त्यांना रोखठोक सार्वभौमचा मानाचा सलाम.!- सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 400 लेखांचे 39 लाख वाचक)