दारु पिऊ दिली नाही म्हणून तळेगावत एकास चाकुने भोकसले! तीन ठिकाणी वार, गुन्हा दाखल आरोपी अटक!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे दारुच्या वादातून एका तरुणास चक्क चाकुने भोकसल्याची धक्कादायक घटना गुरूवारी (दि.14) रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. समाजमंदीराच्या जवळ दारु पिण्यास मनाई केल्यामुळे हा प्रकार घडल्याची प्रथमदर्शनीय माहिती पोलिसांना मिळाली आहे. यात काशिनाथ पुंजाजी जगताप (वय 36) यांच्या छातीवर तसेच पोटावर वार करण्यात आले आहे. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अनिल रंगनाथ जगताप (रा. तळेगाव दिघे) यास अटक केली आहे.
अर्थव्यवस्थेचा कणा ठरलेल्या मद्यपींच्या सुविधांसाठी सरकार नको-नको ते चोचले पुरवत आहे. एकीकडे शासनाला महसूल मिळत असला तरी दुसरीकडे आता लोकं एकमेकांचा जीव घेऊ लागले आहे. तरी सरकार दारूड्यांसाठी घरपोच सेवा देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे, शासनाला आर्थिक बळकटी येत आहे तर पोलिसांच्या भोवती तपासाचा भुंगा लागला आहे. असाच एक अनोखा प्रकार तळेगाव दिघे येथे घडला आहे.
त्याचे झाले असे की, काशिनाथ पुंजाजी जगताप (रा. जुनेगाव, तळेगाव, ता. संगमनेर) हे रिक्षाचालक आहे. ते बुधवार दि.13 रोजी तळेगाव येथील समाजमंदीराच्या जवळ बसले होते. त्यावेळी आरोपी अनिल जगताप हा तेथे मद्य पिण्यासाठी आला होता. मात्र, तेथे दारु पिण्यास काशिनाथ यांनी विरोध केला. त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच जुपली होती. दरम्यान आरोपीने त्यावेळी शिवीगाळ दमदाटी करुन धमकी दिली आणि तो निघून गेला. मात्र, आपल्याला समाजमंदीराच्या जवळ दारु पिण्यास विरोध केल्यामुळे त्याच्या डोक्यात रोष कायम राहिला. दुसर्या दिवशी म्हणजे गुरूवार दि.14 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास काशिनाथ यास तळेगाव चौकात बोलावून घेतले. त्याला जाब विचारुन अचानक जवळ असलेल्या चाकुने त्याच्यावर वार करण्यास सुरूवात केली. यावेळी काशिनाथ यांच्या छाती व पोटावर गंभीर जखमा झाल्या आहेत. हा प्रकार स्थानिक काही ग्रामस्थांनी पाहिला असता त्यांनी सोडवासोडव केली. काशिनाथ हे जखमी होऊन जमिनीवर कोसळले. त्यामुळे काही काळानंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या शरिरातून फार रक्तस्त्राव होत होता. याप्रकरणी जखमीच्या जबाबाहून संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पोलिसांनी अनिल यास अटक केली आहे.