चार डॉक्टरांसह धांदरफळ गाव होमक्वारंटाईन, 23 जणांचे स्वॅब एकामुळे 323 कुटुंब आणि 1 हजार सातशे गावकरी बसले घरात


सार्वभौम (संगमनेर) -
                        संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येेथे एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने चांगलीच दक्षता घेतली आहे. या गावातील 323 कुटुंबातील 1 हजार 629 ग्रामस्तांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. तर यांच्यासह एक सरकारी वैद्यकीय अधिक्षक व तीन खाजगी डॉक्टर अशा चौघांचे देखील स्वॅब घेण्यात आले असून एकूण 23 जणांना नगर जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे धांदरफळ हे आखं गाव होमक्वारंटाईन करण्यात आले असून नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
                   संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आतापर्यंत संगमनेरच्या शहरी भागात कोरोनाचे रुग्ण अधिक सापडले होते. मात्र, संगमनेर तालुक्यातील धांदरफळमध्ये राहणार्‍या एका 68 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी काल उघड झाली आहे. या वयोवृद्धाच्या संपर्कात आलेल्या 23 जणांना प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. या 23 जणांना स्वॅब टेस्टिंग करण्यासाठी जिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले आहे. काल मृत्यू झालेला कोरोनाचा रुग्ण शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला होता. तेथेच त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. काल सकाळी त्याचा मृत्यू झाल्यानंतर मुंबईहुन प्राप्त झालेल्या अहवालात ती व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाची झोप उडाली व परिसरात धाकधूक वाढली.
                          कोरोनाबाधीत रुग्ण धांदरफळचा असल्याने संबंधित परिसर सील करण्यात आला आहे. परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान या आधी नेपाळचे चार कोरोना बाधीत रुग्ण आढळले होते. त्यांचे ही रिपोट निगेटिव्ह आले आहेत. त्यांना देखील संगमनेर खुर्द मधील एका हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्या पाठोपाठ काल उघड झालेल्या कोरोना ग्रस्तांच्या मृत्यूने प्रशासनाची ही चिंता वाढली आहे. संगमनेर तालुक्यात कोरोनाबधिताच्या मृत्यू नंतर प्रशासनाने लॉकडाऊनची अंबलबजावणी आणखी कठोरपणे केली आहे. संगमनेरकरांनी घराबाहेर पडू नये आणि प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान कोरोना आणखी पसरू नये यासाठी प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे.
दरम्यान, कोरोनाग्रस्त व्यक्ती आजारी असल्याने त्यांचे साकूर, घारगाव यासह अन्य गावचे नातेवाईक त्यांना गेल्या काही दिवसांपासून भेटायला येत होते.  अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे. ग्रामीण भागात लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्याने घरी पाहुण्यांची वर्दळ चालु असल्याची चर्चा गावात होती. त्यामुळे, या माहितीचा शोध घेऊन त्यावर प्रशासनाने खबरदारी घ्यायला हवी आहे. अन्यथा हा प्रादुर्भाव रोखणे कठीण होऊ शकतो. अर्थात नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. मात्र काळजी घेणे अपेक्षित आहे. दरम्यान गावात बाहेरचे लोक येत होते. हे पाहुन गावातील जबाबदार नागरिक व शासन निर्मित समितीने याकडे दुर्लक्ष केल्याने प्रशासनावर आता अतिरिक्तताण पडल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने गाव होमक्वारंटाईन केले असले तरी कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या सानिध्यात कोण-कोण आले याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. कारण, वारंवार आव्हान करून देखील लोक आपली माहिती लपवत असल्याचे अनेक अधिकाऱ्यांनी माध्यमांनपुढे सांगितले आहे. प्रशासन आता या घटनेनंतर किती कसोनीशी काम करते हा आता येणारा काळच ठरवणार आहे.

सुशांत पावसे