संगमनेर शहरात उद्यापासून पुन्हा 14 दिवस हॉट्स्पॉट पॉकेट, मोंढा भाजीपालाही बंद


सार्वभौम (संगमनेर) :
                 संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे. त्यानंतर त्याच्या सानिध्यात आलेल्या घरातील चौघांना कोरोेनाची लागण झाली आहे. तर शहरात कुरण रोड परिसरात एक व्यक्ती पॉझिटीव्ह मिळून आला आहे. त्यामुळे संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांनी कठोर पाऊले उचलत शहरातील मोंढ्याचा भाजीपाला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर धांदरफळ बु येथे हॉट्स्पॉट घोषीत करण्यात आले असून त्याच्या मध्यबिंदूपासून दोन किमीचे अंतर कोअर एरिया म्हणून घोषित केला आहे. तर शहरातील इस्लामपुरा,  कुरण रोड, बिलाल नगर, अपना नगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्ता ज्ञानमाते विद्यालय परिसर, कुरण (संगमनेर तालुका) येथे हॉट्स्पॉट घोषीत करण्यात आले आहे.
22 फेब्रुवारी रोजी नेपाळहुन रहेमतनगर येथे 14 जण संगमनेरला आले होते. त्यापैकी 4 जण कोरोना पॉझिटीव्ह मिळून आले होते. त्यानंतर  रहेमत नगर, अलका नगर, कोल्हेवाडी रोड, शिंदे नगर हे परिसर सील करण्यात आले होते. त्यात 8 हजार 690 लोक व 1 हजार 726 कुटुंब होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. तर त्यानंतर पुन्हा चौघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर  14 दिवस हॉटस्पॉट पॉकेट वाढविण्यात आला होता. त्यात 100 टक्के लोकांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामुळे येथे कोणी कोरोना बाधित रुग्ण मिळून आला नाही.                              मात्र, प्रशासन ज्या ठिकाणी मलमपट्टी लावत होते. त्या ठिकाणी जखम बरी झाली खरी. मात्र, भलत्याच ठिकाणी दुखणे उद्भवले. अचानक धांदरफळ येथे एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला.  त्या पाठोपाठ त्याच्या घरातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले. तर शहरातील कुरण रोड परिसरात एक रुग्ण मिळून आल्यामुळे प्रशासनाने कठोर भुमिका घेतली आहे. 
                    शहरात आता व्यापारी कोठे दिसून येणार नाही. तर शेतकरी थेट आपला माल विकू शकणार आहे. त्यामुळे, मोंढा विक्री बंद करण्यात आली असून हातमाल विक्री करता येणार आहे. आता शहरातील इस्लामपुरा, कुरण रोड, बिलाल नगर, अपना नगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्ता ज्ञानमाते विद्यालय परिसर, कुरण (संगमनेर तालुका) येथे हॉट्स्पॉट घोषीत करण्यात आले आहे. तर धांदरफळ बु. येथे गावात हॉट्स्पॉट घोषित करण्यात आले आहे. यात 1 हजार 700 ग्रामस्तांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.

विनाकारण बाहेर पडू नका, अन्यथा 188 नुसार कारवाई.
चार पेक्षा जास्त लोकांची गर्दी दिसले तर 144 चा गुन्हा.
घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क असणे आवश्यक.
कोणत्याही कारणास्तव गर्दी करता येणार नाही.
अत्यावश्यक सेवा व ठरवून दिलेलेच उद्योग चालु राहतील.
तालुका व जिल्हाबाह्यसंचार कोणालाही करता येणार नाही.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे धोक्याचे असेल.