अंभोर्‍यात भाऊबंद एकमेकांना भिडले! कुर्‍हाड व कोयत्याने केले वार! 13 जण जखमी, 22 जण आरोपी


सार्वभौम (संगमनेर) - 
                          रोटा मारताना शेतात लावलेले गिन्नी गवत, आंबा व शेवग्याच्या शेंगांचे नुकसान झाल्याच्या कारणाहून संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे दोन शेतकरी कुटूंब एकमेकांना भिडले. ही घटना रविवारी (दि.17) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. यात संगमनेर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून 22 जणांना आरोपी करण्यात आले आहे. तर 13 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर काही व्यक्तींवर कुर्‍हाड व कोयत्याने वार करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून जखमींवर उपचार सुरू आहे.
                          याबाबत बापु तुळशिराम खेमनर (वय 45) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बाबुराव गवाजी खेमनर, लहाणु गेणू खेमनर, धर्मनाथ पाराजी खेमनर, जलिंदर गेणू खेमनर यांच्यासह काही महिला शेतात आल्या. त्यांच्याकडे काठ्या कुर्‍हाडी व कोयते होते. त्यांनी बबन तुकाराम खेमनर यांना विचारणा केली की, तुम्ही आमच्या शेतात रोटा का मरता? ही शेतजमीन आमची आहे. असे म्हणत शिवीगाळ दमदाटी सुरू केली. फिर्यादी बापु खेमनर हे त्यांना समजून सांगत असताना अचानक आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. ज्यांच्याकडे कुर्‍हाड कोयते होतेे त्यांना सपासप वार केले. त्यात बापू यांच्यासह बाबासाहेब खेमनर, एकनाथ खेमनर, भाविक भाऊसाहेब खेमनर यांच्यासह दोन महिला जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात कलम 307 प्रमाणे सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                             तर बाबुराव गवाजी खेमनर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्या शेतात रोटा मारून शेतात लावलेले गिन्नी गवत, आंबा व शेवग्याच्या शेंगांचे नुकसान करण्यात आले. याबाबत आरोपी यांना जाब विचारला असता त्यांनी कुठलाही विचार न करता त्यांच्याकडील काठी व कुर्‍हाडीने मारहाण करण्यास सुरूवात केली. यात बाबुराव खेमनर यांच्यासह संदीब बाबुराव खेमनर, लहाणु गेणु खेमनर, धर्मराजा पाराधी खेमनर, जालिंदर गेणु खेमनर यांच्यासह दोन महिला जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यात भाऊसाहेब तुळशीराम खेमनर, पाटीलबा तुकाराम खेमनर, नामदेव तुळशीराम खेमनर, आशिष पाटीलबा खेमनर, बाबासाहेब बबन खेमनर, एकनाथ बबन खेमनर, शुभम पाटीलबा खेमनर, अजित खेमनर, भाविक खेमनर यांच्यासह काही महिलांना आरोपी करण्यात आले आहे.

दरम्यान हा प्रकार पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जे जखमी आहेत त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींची धरपकड सुरू केली असून यातील काही आरोपी आता पसार झाले आहे. भांडणे करण्यास गोड वाटले आता निस्तरण्यास नाकीनव येणार आहे. त्यामुळे, वाद करू नका, सलोख्याने प्रश्न मिटला तर असे प्रकार घडणार नाही अशी प्रतिक्रीया पोलिसांनी दिली आहे.

sagar shinde
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 28 लाख वाचक)