संगमनेरच्या पठाराहून आदिवासी महीलांची नामदार व प्रशासनाला आर्त हाक..! स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतरही त्या पाऊलवाटा डोंगरदरीत पाण्याच्या शोधात फिरतात


रोखठोक सार्वभौम (घारगाव) :
                             “स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडली. आता तरी आम्हा बाई माणसाचं जीनं बदलेल. आमच्याही आयुष्यात शहरी बायांसारखा सुखाचा किरण डोकावेल आणि दु.खाच्या भेगा काही अंशी लिंपल्या जातील असं सतत वाटत होतं. पण, ना आमचे दिवस बदलले ना आमचं जीनं. दिवस असो की रात्र, दररोज एक ते दिड किलोमीटर अंतर  पायी  जायचं आणि  डोंगर माथा उतरून खाली दरीत असलेल्या कड्या कपारीतून तांब्या तांब्याने पाणी काढून हांडे भरायचे. होय..तांब्या तांब्यानेच.. कारण तिथे एक झरा आहे. आजच्या स्वार्थी जगात माणसांची माया आटली तरी त्या झर्‍याची माया आम्हा गोरगरीब स्त्रीयांसाठी आटलेली नाही. पण तिथवर पोहचणं वाटतं तितकं सोपं नाही. डोक्यावर दोन-दोन हांडे घेवून पुन्हा डोंगर चढून वर येताना अंगाचा थरकाप होतो साहेब! जीव मुठीत घेऊन एक एक पाऊल जपून टाकत घरचा रस्ता धरावा लागतोय.हे जगणं आता  रोजचंच झालं आहे. जणु निसर्गाने आणि शासनानेही आमच्या पदरी हे दान अगदी भरभरून दिले आहे. घोटभर पाण्यासाठी ह्या जीवघेण्या वाटा रोज तुडवाव्या लागत आहेत. कधी तोल जाण्याची भीती तर कधी खडकाळ वाटेतून अडखळून पडण्याची भीती. साहेब! थांबणार तरी कधी आमची ही जीवघेणी परपट. आणि बुजणार तरी कधी या डोंगरातील पायवाटा? अशाच काहीशा, काळजाला चिरणार्‍या कथा आणि व्यथा संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठारावर असलेल्या सुतारवाडी येथील आदिवासी महिलांनी मांडल्या आहेत.
                   
 संगमनेरच्या त्या पठारावर सुतारवाडी, पायरवाडी, गिर्हेवाडी, दगडसोंडवाडी अशा एकूण सहा आदिवासी वाड्या आहेत या वाड्यांना हिवरगाव पठार गावातून पाईप लाईनद्वारे पाणी पोहचविले आहे. पण, वारंवार पाईप लाईन किवा रोहित्रामध्ये  बिघाड होत असल्याने या आदिवासी बांधवांना वेळत पाणी मिळत नाही. त्यामुळे, वर्षानुवर्षापासून याठिकाणी डोंगरात एक झरा आहे. त्या झर्‍याला कायमस्वरूपी पाणी असते. म्हणून महिलांना झर्‍याचा आधार झाला आहे. थेंबे-थेंबे तळे साचे असे म्हणतात, तसे थेंब-थेंबे या माय माऊलींचा हांडा भरत असतो. मात्र, त्यासाठी दोन मैलाचा प्रवास करुन त्यांच्या पोटाला पाणी मिळत असते. खरंतर दिवस असो की रात्र, झर्‍यावर पाणी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी पाहवयास मिळत असते. एक हंडा भरायचा असला तरी कधी कधी तासन तास महिलांना उन्हातान्हात झर्‍यावर बसावे लागते. हळूहळू तांब्याने पाणी काढायचे आणी हंडा भरायचा अशा पद्धतीने या महिलांचा रोजचा नित्यक्रम झाला आहे. वर्षानुवर्षापासून या भागातील महिलांसाठी हा पाण्याचा झरा जीवनदायी ठरला आहे.  सध्या सुतारवाडीतील महिलांचे पिण्याच्या पाण्यावाचून मोठे हाल होत आहे. पाण्याची टाकी बांधली आहे. पण, त्या टाकीत कधी तरीच पाणी येत आहे. त्यामुळे याठिकाणी असलेल्या महिलांना एक ते दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरातील झर्‍याचा आधार घ्यावा लागत आहे.
             या डोंगरातील झर्‍यातून पाणी आणताना आमच्या पायांचा थरकापही होतो. तरीही डोंगर दर्‍यातून वाट काढत आम्ही महिला पाणी आणतो. मागील वर्षी आम्हाला पिण्याच्या पाण्याचा टँकर येत होता, त्यामुळे आमचे एवढे हाल होत नव्हते. पण, साहेब! आता कोणत्याही परिस्थितीत आमच्या सुतारवाडीत पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करा. कारण, आमच्या लेकराबाळांना अन्नपाणी आणि मुलभूत गरजांसाठी जीवनाशी झुंजावं लागत आहे. त्यामुळे, तुम्हाला चिंता पडली कोरोना आणि देशाची, तर आम्हाला चिंता पडली आहे. रोजचे पाणी आणि भुकेलेल्या पोटाची खळगी भरण्याची. त्यामुळे, काही नका साहेब, पाणी द्या फक्त पाणी. असे म्हणत मंगल  केदार, कांचन केदार, माधवी मधे, सुनंदा केदार, सुरेखा केदार, आशा केदार, यांच्यासह अन्य महिलांनी आपले डोळे पान्हावत रोखठोक सार्वभौमपुढे त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत.
                      आता ही कहाणी एकल्यानंतर प्रश्न पडतो. त्या प्रशासनाचा. जे फक्त शहराला व तालुक्यातील काही गावांना कवटाळून बसले आहे. प्रश्न पडतो त्या नेत्यांचा, जे मतांचे भिक मागण्यासाठी पाच वर्षातून या गोरगरीबांच्या दाराचे उंबरे झिजवितात. पुढे जाऊन असे वाटते की, येथे राहणार्‍या तीन ते पाच हजार लोकांना महिला इतक्या लांबून पाणी वाहुन आणून देत त्यांच्या घशात ओततात त्यांच्यातील मोहरक्यांना किंवा राजकीय मुकादमांना याचे काहीच कसे वाटत नाही. महाराष्ट्रात झेडपी व पंचायत समित्यांची स्थापना 1962 साली झाली. तेव्हापासून एकही सक्षम सदस्य असा लाभला नाही का? जो पक्की पाईपलाईन तिथपर्यंत नेवू शकेल. फार दुर्दैव आहे. की, राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी राहुन चारही बाजुंना विकसित शहरे आणि दोन नद्या शेजारून वाहतात तरी तेथील जनतेचा घसा कोरडा आहे. का? कदाचित ते आदिवासी आहे. म्हणून तर नाही ना? अन्यथा बड्या लोकांसाठी फार समाजसेवक पुढे येतात.
               एक विशेेष बाब म्हणजे मा. ना. मंत्रीमहोदय यांनी 35 वर्षे तालुक्याची अविरत सेवा केली आहे. त्यांनी या गोरगरिबांच्या प्रश्नासाठी काहीतरी उपायोजना करणे गरजेचे आहे. सध्या सरकारी दरबार संगमनेरचा आहे. त्यामुळे, त्यांनी थोडं मनावर घेतले पाहिजे. तर तहसिलदार किंवा प्रांताधिकारी महोदयांनी तुर्तास तेथे पाण्याचे टँकर सुरू केले पाहिजे. कारण, पाणी हे अत्यावश्यक पेक्षा मुलभूत सेवा आहे. हे कोणी नव्याने सांगायला नको. देव करो आणि कोरोना पेक्षा पाणी वाहुन आणि पाण्यावाचून कोणाचे जीव जायला नको. अन्यथा हे पाप कोणाच्या माथी पडेल. हे देखील नव्याने सांगायची गरज वाटत नाही. काही झाले तरी, आम्ही एक नैतिकता म्हणून प्रश्न पुढे मांडला आहे. परंतु, अजून किती वर्षे हा पाण्याचा प्रश्न सुरू राहणार आहे. असा सवालही या आदिवासी महिलांनी केला आहे.
नवनाथ गाडेकर
(घारगाव प्रतिनिधी)
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 225 दिवसात 300 लेखांचे 25 लाख वाचक)