अकोल्याची ती हिरकणी आपल्या इवल्याशा जुळ्या मुलींसाठी थेट मुंबईहून पायी निघाली, पण...


छत्रपती शिवरायांच्या काळात आपल्या तान्ह्या मुलासाठी रायगडाचा कडा उतरुन बाळाला छातीशी लावणारी हिरकणी आपल्या सर्वांना माहिती आहे. अशीच एक सह्याद्रीच्या कुशीतील हिरकणी आपल्या जुळ्या मुलींना भेटण्यासाठी थेट ठाण्यातून अकोले तालुक्यातील साम्रद येथे पायी निघाली. मात्र, पोलीस आणि कुटुंबाच्या समजुतीनंतर तिला घरी परतावे लागले. हे असे असले तरी तिच्या मातृत्वाच्या कळा ह्या कमी होता होईना आणि गावाकडे अडकलेल्या तिच्या इवल्याशा दोन मुलींचा अर्त आवाज कमी होता होईना. त्यामुळे, यावर प्रशासनाने काहीतरी पर्याय काढला पाहिजे. कारण, आज एक महिना होत आला. अवघ्या दोन वर्षाच्या त्या जुळ्या मुली रडून-रडून थकल्या आहेत. तर मुलींच्या विरहाने आईच्या काळजाची लाही-लाही झाली आहे. त्यामुळे, ठाणे पोलीस प्रशासनाकडे त्या मातेने अर्ज केला आहे. काही नको साहेब! फक्त माझ्या मुलींपर्यंत मला पोहच करा. त्यांना कुशीत घेऊन मी आयुष्यभर होमक्वारंटाईन रहायला तयार आहे. पण, या कोरोनाच्या भितीने माझ्या लेकरांचे रडून-रडून होणारे हाल मला पहावत नाही. त्यांना काही झालं तर मी सुद्धा जगू शकणार नाही. त्यामुळे मला फक्त तिथपर्यंत पोहचवा.! 
                         
स्वाती भवर ही पंडरीनाथ पवार रा. रतनवाडी यांची मुलगी आहे. तिचा विवाह साम्रद येथे भवर कुटुंबात झाला होता. मात्र, कामानिमित्त ते ठाण्यातील आंबिवली परिसरात राहतात. गेल्या दोन वर्षापुर्वी त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या होत्या. गेल्या महिन्यापुर्वी या मुलींना त्यांच्या आजीने अकोले तालुक्यातील साम्रदला गावाकडे आणले होते. त्यांच्या पाठोपाठ त्यांची आई आणि वडिल देखील येणार होते. मात्र, दुसर्‍या दिवशी अचानक लॉकडाऊन सुरू झाला. आई तिकडे आणि मुली इकडे. चारदोन दिवस मुलींनी दम काढला. त्यांना खेळवता-खेळवता घरच्यांच्या नकीनव आले. पण, म्हणतात ना, ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’. त्यानंतर त्या मुलींना काही नको होते. हवी होती ती फक्त आई. त्यामुळे, ही आजी त्या मुलींना कोठून आई उपलब्ध करुन देणार होती. एखाद्याचा मोबाईल घ्यायचा, त्याला डोंगर माथ्यावर रेेंज शोधायची आणि व्हाट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलींग करुन आई दाखवायची. पण, ही व्हाट्सअ‍ॅपची आई मुलींना फार काळ भावली नाही. उलट आई दिसते पण तिला हात का लावता येत नाही. आई रोज प्रमाणे कुशीत का घेत नाही. त्यामुळे, या व्हाट्सअ‍ॅपचा भोत त्यांना नको होता. या मुलींना जे हवे ते खायला-प्यायला देणे सुरू होते. मात्र, त्यांनी ठाण मांडली होती. आता काही नको! हवी तर आईच. त्यामुळे, त्यांना सांभाळणारे कंटाळून गेले होते. रात्री-अपरात्री जर मुली उठल्या तर एकीच्या आवाजाने दुसरी उठत होती. त्यामुळे, आई विना लेकरं संभाळायची कसरत ते ही दोनदोन मुली हे ज्यांने महीनाभर अनुभवले. त्यांना बाकी सॅल्युट केला पाहिजे.
                                     आता हा सर्व तमाशा तब्बल एक महिना सुरू होता. ती माय माऊली रोज घराबाहेर निघे व तिला रोज पोलीस पिटालून लावी. त्यात गुन्हा दाखल होण्याची भिती असल्यामुळे तिला घरच्यांनी रोज समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, ती जरी शांत बसत असली तरी तिच्यातील मातृत्व शांत बसेल ती आई कसली. रात्र-रात्र जागून लेकरं झोपले असतील का? जेवले असतील का? असे नाना प्रश्न डोक्यात घेऊन त्या उठून बसत होत्या. पण, पर्याय नव्हता. त्यांनी एकदा थेट कोणालाही न सांगता पहाटेच पायी निघण्याचा चंग बांधला. पण, आईची जीव लेकरात आणि बापाचा जीव बायकोत. त्या पित्याने मात्र, लेकी आणि पत्नीच्या भावनांचे दु:ख काळजावर दगड बांधून सासले होते. काय हे कोरोनाने दिवस आणलेत असे म्हणत तो बाप नि:शब्द होत होता. काय करावं म्हणून त्यांनी वाहतुकीच्या गाड्या, भाजीपाला, दुधगाड्या यांना हात करुन प्रवास करु पाहिला. पण, तो देखील शक्य झाला नाही. अखेर रोखठोक सार्वभौमशी संपर्क केला असता त्यांना आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
                       सद्या स्वाती भवर यांच्या नावे ठाणे शहर पोलीस यांच्याकडे ऑनलाईन अर्ज दाखल केला आहे. हा लेख वाचून ज्याला कोणाला शक्य होईल. त्यांनी जी काही मदत करता येईल. ती करण्याचा प्रयत्न करावा. पोलीस प्रशासनाची परवानगी मिळाल्यास प्रश्न संपेल. पण, अन्यथाचा मार्ग फक्त आई आणि त्या दोन मुलींच्या भावनिकशी खेळल्यासारखा शिल्लक राहिल. पण, साडेतीनशे वर्षापुर्वी लेकरासाठी हिरकणीने रायगड उतरला होता. आजही तो आदर्श पुढे चालु राहील. कारण, मुलांसाठी एक आई काहीही करु शकते, हे वंदनिय छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला नवे नाही.
सागर  शिंदे
8888782010
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे २३ लाख वाचक)