*"वाटीच्या डोहात तरुण बुडाला, ३० तासानंतरही शोध सुरुच.! "निंबाळे,रायते वाघापुरच्या प्रवरेत शोध*


सार्वभौम (संगमनेर) -
                संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील फादरवाडी परिसरातील अनिल गुलाब मेहत्रे वय वर्ष 40 हे तीन मित्रांरोबर प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते नदीपात्रातून बाहेर आले नसल्याने परिसरातील नदीपात्रात शोध मोहीम सुरू आहे.
    संगमनेर शहरातील रहेमतनगर परिसरात चार कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने  हॉटस्पॉट पॉकेट जाहीर झाले आहे. या लगतच हा परिसर असल्याने घरा-बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या झळया व घरात बसुन लाई-लाई होण्यापेक्षा नदीला पोहण्याचा आनंद घेण्यासाठी अनिल मेहत्रे व त्यांचे तीन मित्र रविवारी दुपारी 3:30 च्या सुमारास प्रवरेतील "वाटीच्या डोहावर" पोहण्यासाठी गेले होते. नदीच्या याकडे वरून पलीकडच्या कडेवर गेले आणि पुन्हा येण्याचा प्रयत्न केला असता दमछाक झाला, नदीचे पात्र खोलवर असल्याने ठाव लागला नाही. आणि गटांगळ्या खाण्यास सुरवात झाली. परंतु, एकदा खाली गेल्यानंतर पुन्हा वरती न आल्याने मित्रांची ही धांदल उडाली आणि शोध घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करू लागले. परंतु, त्यांनाही अपयश आले.
मित्रांबरोबरच नातेवाईक व परिसरातील लोकांनी ही प्रयत्न केला परंतु शोध लागला नाही. पोलिसांनी ही घटनास्थळी पाहणी करून आपली शोध मोहीम सुरू केली आहे. मात्र आत्तापर्यंत शोध लागलेला नाही. निंबाळे-रायते व वाघापुर पर्यंत नदीपात्रात शोध घेतला आहे. नदी पात्रेच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे असल्याने काहीशा प्रमाणात शोधण्यास व्यत्यय ही येत आहे. वाळु उपशाने नदीपात्रात खोल खड्डे झाले असुन या घटनेच्या निमित्ताने नदीपात्रात सूरु असलेल्या वाळु उपशाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सुशांत पावसे