आ. रोहित पवारांनी घडविली त्या जुळ्या मुलींच्या आईची भेट! अन ती आई सह्याद्रीचा कोकणकडा चढून चिमुकल्यांना भेटली.


रोखठोक सार्वभौम (अकोले) :
                               लॉकडाऊनमध्ये अकोले तालुक्यातील साम्रद येथे अडकलेल्या त्या दोन वर्षाच्या जुळ्या मुलींना भेटण्यासाठी त्यांची ‘आई’ मुंबईहून चक्क पायी निघाली होती. ही बातमी रोखठोक सार्वभौमने प्रसिद्ध केली असता ती आ. रोहित पवार यांनी वाचली आणि थेट संबंधित हिरकणीशी त्यांनी संपर्क साधला. कायदेशीर प्रक्रियेची माहिती देत अर्ज भरण्यास सांगितले आणि ठाणे आयुक्तांशी चर्चा करुन स्वाती भवर यांना पास उपलब्ध करुन दिला. या प्रक्रियेत दोन दिवस गेले. मात्र, त्याच दिवशी पहाटे ती महिला चालती झाली आणि चक्क सह्याद्रीचा कोकणकड्याचा घाट चढून तिने आपल्या मुलींना पोटाशी लावले. दरम्यान पोलिस व गावकर्‍यांनी विचारणा केली असता पास दाखवत मुलींना त्या मातृत्वाने कवटाळले. त्यामुळे, भवर यांनी पहिले रोहित पवार यांचे मनोमन आभार मानले आहे. तर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी राष्ट्रवादी व पवार हे नाव विसरणार नाही. अशी प्रतिक्रीया त्या हिरकणीने दिली.
                 त्याचे झाले असे की, पंतप्रधान महोदयांनी अचानक लॉकडाऊन घोषित केला. त्याच्या दोन दिवसांपुर्वी स्वाती भवर यांनी त्यांच्या दोन वर्षाच्या जुळ्या मुली गावाकडे (साम्रद) पाठविल्या होत्या. दुसर्‍या दिवशी हे पतीपत्नी मार्गस्थ होणार होते. पण, अचानक लॉकडाऊन सुरू झाला आणि मायलेकीची ताटातुट झाली. चारदोन दिवस मुलींची समजूत काढली गेली. मात्र, त्या चिमुरड्या जुळ्या मुली. आईला साद घालुन रडणं सुरू केले की थांबता-थांबत नव्हत्या. मोबाईलवरील आई पाहुन त्यांना आणखी मातृत्वाचा पान्हा फुटत होता. पण, करणार काय? आईने घराबाहेर पडून वारंवार मुलींकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तिला घरी काढून दिले. बोलबोल करता करता एक महिना उलटून गेला. मात्र, ना कोणी गाडीत घेईना ना कोणी पायी चालु देईना. अखेर हा प्रकार एका व्यक्तीने ‘दै. रोखठोक सार्वभौम’ या वृत्तपत्राच्या संपादकांना बोलून दाखविला. त्यांनी “अकोल्याची ती हिरकणी जुळ्या मुलींसाठी थेट मुंबईहून पायी निघाली” या मथळ्याखाली लेख लिहीला.
                            हे लेख कर्जत-जामखेडचे संवेदनशील आमदार तथा शरद पवार साहेबांच्या विचारांचे वारसदार आदरणीय रोहित पवार यांनी वाचला आणि थेट त्या आईशी बोलण्याची ईच्छा व्यक्त केली. पवार यांच्या उदात्त अंत:करणाचे दर्शन त्या दिवशी अगदी सामान्य व्यक्तीस अनुभविण्यास मिळाले. ताई तुम्ही काही काळजी करु नका. आम्ही काहीतरी करतो. अधिकार्‍यांशी बोलतो. यावर तोडगा काढू असे म्हणत त्यांनी अगदी आत्मियतेने त्या खचलेल्या आईच्या काळजाची समजूत काढली. यावेळी एक सामाजिक उत्तरयित्व म्हणून रोखठोक सार्वभौमने ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुर्ण केली. प्रथम ठाणे शहर, नंतर ठाणे ग्रामीण, पुन्हा ठाणे शहर अशी कसरत करत एकूण तीन अर्ज भरण्याची वेळ आली. रात्रीच्या वेळी ठाणे ग्रामीण पोलिसांकडून जी वागणूक मिळाली ती पाहता फार निंदनीय होती. त्या पोलीस महाशयांचे उद्धट बोलणे आणि खूप काही बोल ऐकल्यानंतर मदतीचा उत जिरला होता. मात्र, त्या मातृत्वाचे बोल शांत बसू देत नव्हते. शेवटी ठाणे शहर आयुक्तांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.
                    आदरणीय रोहित पवार साहेबांंच्या शब्दावर स्थलांतरणाचा पास मिळाला. तो तिसरा दिवस उजाडला होता. मात्र, याच दिवशी त्या मातृत्वाच्या भावनांचा अंत संपला होता. त्या दिवशी सुर्य आभाळाच्या गर्भात असतांनाच पहाटेचा अंधार चिरत ही हिरकणी चालती झाली. मजल-दरमजल करीत तीने थेट गावाचा रस्ता गाठला. डोंगरदर्‍या तुडवत ती सायंकाळी कोकणकड्याच्या पायथ्याशी येऊन तिने वर पाहिले आणि कंबरेला पदर खोचून बघता-बघता चौंडीचा घाट पायाखाली घातला. त्या दिवशी 21 आदिवासी बांधव प्रशासनाने ताब्यात घेतले होते. मात्र, तोवर या हिरकणीकडे पोलीस प्रशासनाचा पास प्राप्त झाला होता. तसेही हा प्रकार राजुरचे पोलीस अधिकारी नितीन पाटील यांच्या कानावर घातलेले होते. त्यांचे कायदेशीर मदतीसाठी प्रयत्न सुरू होते. त्यांनी चौकशीअंती त्या मातृत्वाचा फार काही अंत पाहिला नाही. काल त्या माऊलीने आपल्या दोन्ही मुलींना कडकडून मिठी मारली. त्या तिघी मायलेकींनी एक महिन्याचे दु:ख हलके करण्यासाठी एकमेकींच्या गळाभेटी घेऊन रड-रड रडत मन मोकळे केले. आज त्या मातृत्वाने वृत्तपत्राशी संपर्क साधून आपली कृतज्ञता व्यक्त केली. त्या मायलेकीची आमच्या माध्यमातून भेट झाली. हेच आमच्या बातमीदारीतेचे फळ म्हणायचे. मात्र, एक गोष्ट यात प्रकर्षाने नमुद करावीशी वाटते की, यात सर्वात मोठा वाटा राहित पवार यांचे स्वीय सहाय्यक सोमनाथ गर्जे यांनी या सर्व घटनेचा पाठपुरावा केला. त्यांचे आभार प्रार्थनिय आहे.

शेवटच्या श्वासापर्यंत मी
राष्ट्रवादी आणि पवार हे नाव विसरु शकत नाही!

मुलींची ओढ काय असते हे आई झाल्याशिवाय कोणाला कळणार नाही. मी महिनाभर फार तडफड केली. मुली रडण्याचा रोज आवाज येत होता. पण मी हतबल होते. अशात रोहित पवार साहेबांनी मला आधार दिला. पास मिळवून देण्यासाठी अधिकार्‍यांशी बोलणे केले. त्यांचे मी कधीच ऋण फेडू शकत नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी आणि पवार हे नाव कधीच विसरू शकत नाही. आणि गर्जे साहेब व वृत्तपत्राची साथ अविस्मरणीय राहिल. 
 स्वाती भवर

सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 27 लाख वाचक)