संगमनेरची हजार भटकी जणावरे थेट कत्तलखाण्यात! सामाजिक व धार्मिक संघटना आक्रमक, प्रशासनाने शोध घेवून कारवाई करावी - मागणी


सार्वभौम (संगमनेर) :
                             देशात कोरोनाचे संकट पसरल्यामुळे सगळीकडे लॉकडाऊनची परिस्थितीत निर्माण झाली आहे. त्यामुळे, काही काळ अत्यावश्यक सेवा देखील बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, अशा परिस्थितीचा फायदा घेत संगमनेर शहरात काही अज्ञात गो-तस्करांनी मोकाट फिरणार्‍या जवळपास 500 गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने तस्करी केल्याचा दावा काही संघटनांनी केला आहे. त्यात म्हटले आहे की, संगमनेर शहरात मोकाट फिरणारे गोवंश हजारोंच्या संख्येने होते. त्यात रंगारगल्ली येथील रणजित ग्राऊंड वर 200 ते 250 गोवंश, जाणता राजा ग्राऊंडवर 150 ते 200 गोवंश, राहाणेमळा 100 ते 125, मालदाड रोडवर 150 ते 200, विठ्ठल मंदिर, तिवारी ग्राऊंड, अकोलेरोड बायपास येथे 100ते 150 व शहरातील इतर भागातील 150 ते 200 असे जवळपास हजार ते बाराशे  गोवंश जातीच्या जनावरांच्या मोठी संख्या आहे. मात्र, आता ही जनावरे गेली कोठे हे समजायला तयार नाही. याबाबत एका संघटनेने पत्रक काढून प्रशासनाला विचारणा केली आाहे.
                         संगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील मोठया बाजारपेठचा भाग असून जाणता राजा मैदान, राहणेमळा, जुने गावठाण, बाजारपेठ, नेहरू चौक याठिकाणी गोवंश फिरत असतात. त्यांना परिसरातील नागरिक धार्मिक व भावनिक प्रेमापोटी चारापाणी देतात, तसेच या जनावरांना नैवेद्य देणारा धार्मिक वर्ग मोठया प्रमाणात आहे. तसेच, त्यांना विश्व हिंदू परिषद बजरंग दल, हेल्पिग हँड, नमो ग्रुप व्हिजन चारा उपलब्ध करून देतात. तर जखमी जनावरांना उपचारासाठी हेलपिंग हँड मदत करतात. असे असताना त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी  मोठी संख्येत घट झाल्याचे दिसते आहे. हा प्रकार फार काळाचा नाही तर तो या लॉकडाऊनच्या काळात झाल्याचे दिसते आहे. सद्यस्थितीत रणजित ग्राऊंडवर 20 ते 25 , जाणता राजा मैदानात 15 ते 20 असे एकूण 50 ते 60 गोवंश जातीचे जनावरे शहरात शिल्लक राहिल्याने शहरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. गो तस्करीचे करून गोमांस विक्री केल्याचा संशय काही संघटनांनी केला आहे. याला प्रमाण म्हणजे संगमनेर शहर पोलिसांच्या गोमांस संदर्भातील 2 केसेस व वावी, ता. सिन्नर येथील 4 केसेस मधील 29.5 टन गोमांस पकडण्याची कारवाई करण्यात आली आहे. म्हणजे एकीकडे देश बंद असताना संगमनेरात मांस मिळणे किती सोपे आहे. यावरून या गो तस्करीचे कनेक्शन राज्यभर असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजीपाल्यांच्या नावाखाली मांसाची निर्यात होत असून शहरात कत्तलखाने जोरात सुरू असल्याचे लक्षात येते. शहरातील मुक्या जनावरांचा जीव घेवून बक्कळ कमाई केली जात असल्याचे उघड होऊ लागले आहे. तरी या गो तस्करांचा शहर पोलिसांनी शोध घ्यावा व उर्वरित गोवंशाचे संरक्षण करावे अशी मागणी गोरक्षकांनी केली आहे. आज तालुका कोरोनामुक्त आहे. उद्या बाहेरुन तो आत यायला वेळ लागणार नाही.  कारण, जळगाव जिल्हा कोरोनामुक्त होऊन पुन्हा तेथे तीन रुग्ण सापडले आहेत. ते केवळ बाहेरील लोकांच्या संपर्कात असल्यामुळे. त्यामुळे, प्रशासनाला लवकर शहानपणा सुचला तरी बरे अन्यथा संगमनेरकरांचे आरोग्य पुन्हा धोक्यात येऊ शकते असे मत समाजसेवकांनी व्यक्त केले.

...तर केलेल्या मेहनतीवर पाणी फिरेल.
संगमनेर शहर आत्ता कोठे कोरोनामुक्त झाले आहे. जर येथील भाजीपाला आणि अन्य अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली मांसाची आयात निर्यात होत असेल तर कोरोनाचा संगमनेरात शिरकाव व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे, अशा तस्करीवर आळा घातला पाहिजे. किमान अशा आणिबाणीच्या काळात तरी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने मलिद्याकडे दुर्लक्ष करून कठोर कारवाई केली पाहिजे. असे झाले नाही तर महसुल, आरोग्य, पोलीस आणि नगरपालिकेच्या केलेल्या मेहनतीवर पाणी फिरेल.
अन्य गोवंशाचे संरक्षण करावे.
संगमनेर शहर कडकडीत बंद असल्याचा फायदा घेत काही गोतस्करांनी मोकाट फिरणार्‍या अनेक गोवंश जातीच्या जणावरांची कत्तलीच्या उद्देशाने तस्कारी केली आहे. तरी यांचा शोध घेऊन पोलिसांनी कडक कारावाई करावी. तसेच अन्य गोवंशाचे संरक्षण करावे. अन्यथा संरक्षक संघटना कठोर भुमिका घेईल.
- कुलदिप ठाकूर (बजरंगदल, जिल्हा सहा.संयोजक)

सुशांत पावसे