...अखेर अकोल्याच्या धान्य तस्करीत तिघे गुन्हेगार; गुन्हा दाखल करुन एफआयआर पाठवून देणे-तहसिलदारांचे आदेश


सार्वभौम (अकोले) -
                         अकोले तालुक्यातील गोरगरिब जनतेसाठी जिल्हा पुरवठा विभगाच्या अंतर्गत नवनागापूर येथून निघालेला 600 पोत्यांचा तांदुळ संगमनेर तालुक्यातील  समनापूर परिसरात तीन जणांनी गहाळ करण्याचा प्रयत्न केला. या पोत्यातील चार पोती काढत असतांना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. यात वडगाव गुुप्ता (नगर तालुका), संगमनेर येथील देवाचा मळा व राहाणे मळा अशा तीन जणांचा समावेश आहे. हे चौकशीअंती निष्पन्न झाले असून याप्रकरणी संगमनेरच्या महसुल अधिकार्‍यांनी पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी सखोल चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, रोखठोक सार्वभौमने दिलेल्या बातमीला अधिकृत दुजोरा मिळाला असून येत्या काही तासात याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
बुधवार दि. 15 रोजी रोखठोक सार्वभौमने रेशनच्या धान्याची तस्करी झाल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.  या बातमीनंतर अकोले प्रशासन, लोकप्रतिनिधी व सामजसेवक खडबडून जागे झाले. अशा प्रकारची तस्करी झालीच नाही, असा निर्वाळा देत प्रशासनाने ही अफवा असल्याचे सांगत चौकशी करायचे सोडून "आपण धुतल्या तांदळासारखे स्वच्छ" असल्याचे सांगितले. तर काही कथाकथित सामजसेवकांनी आपले कावळ्यासारखे बिनडोकपणे ‘कोकणे’ सुरू ठेवले. मात्र, ही बातमी खोटी किंवा अफवा नाही. आता हे खुद्द तहसिलदार साहेबांनी दिलेल्या पत्रानेच सिद्ध केले आहे. त्यामुळे. आता त्या तिघांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक अभय परमार, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, धादवड, पवार, हांडे, चौधरी व विजय पवार यांचे प्रथमत: आभार मानले पाहिजे. कारण, त्यांना माहिती मिळूनही तत्परता दाखविली नसती तर केवळ चार पोते सोडा या महाशयांनी 600 पोत्यांतील किती तांदुळ हाडप केला असता किंवा त्यात काय फेरबदल केला असता हे कल्पनेच्या पलिकडे आहे. विशेष म्हणजे या महाशयांना याची जरा देखील भिती का वाटली नाही. की, हा माल अकोले गोडावूनमध्ये खाली करुन घेताना पोती मोजली जातील किंवा याचे वजन करुन घेतले जाईल! तरी देखील इतका मोठा पराक्रम तो ही देशावर आपत्ती आढविली असताना? तालुक्यातील जनता अन्नधान्याची वाट पाहत असतांना? त्यामुळे, या घटनेची सखोल चौकाशी झाली पाहिजे. यात कोणा-कोणाचे हात पिवळे झाले आहे. हे त्याशिवाय बाहेर येणार नाही.
साहेब.! कोणी राशन देईल का राशन.!!!
                           दुसरी विशेष बाब म्हणजे, आ. डॉ. किरण लहामटे यांना ‘रोखठोक सार्वभौम’च्या माध्यमातून नेहमीच ‘कडवट शब्दांनी’ आळविले जाते. पण, त्यांनी त्याला ‘गोड’ माणून त्यांच्या कामाची ‘घोडदौड’ सुरू ठेवत या प्रकरणात हिरारीने लक्ष घातले. ‘मी माझ्या जनतेच्या ताटातील घास, कोणाच्या घशात जाऊ देणार नाही’ असे म्हणत त्यांनी सकाळपासून अधिकार्‍यांची कानपिळी सुरू केली होती. अखेर काल गुरूवार दि. 16 रोजी सायंकाळी प्रशासनाने चौकशीचे आदेश काढले. त्यात तिघांच्या नावासह गाडी व तिचा नंबर देऊन सविस्तर माहिती पोलीस प्रशासनाकडे दिली. त्यात म्हटले आहे की, जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 नुसार आपण सक्षम आधिकारी असल्याने अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडील शासन कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची प्रत महसुल विभागास पाठविण्यात यावी. असे पोलीस ठाण्यात दिलेल्या आदेशात म्हटले आहे     
त्यामुळे, ही कार्यवाही पुर्ण होताच अकोल्यात 600 पोते तांदुळ उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे तालुक्याच्या जवळच पिंपळगाव निपाणी येथे केवळ 10 वाजता अन्नाधान्याचा साठा संपल्याचे सांगण्यात आले होते. अक्षरश: लोक बंद दुकानाच्या बाहेर बसून होते. त्यामुळे, आदिवासी आणि दुर्गम भागात अन्नधान्याची काय परिस्थिती असेल. याचा विचार केला तरी मनात कालवाकालव होते. त्यामुळे, रोखठोक सार्वभौमच्या माध्यमातून दानशुर व्यक्तींना एक प्रांजळपणे आवाहन करण्यात येते की, ज्यांना शक्य आहे. त्यांनी काही गहु, डाळी, किराण यांची पुर्तता करण्याचे सहकार्य करावे. एक विशेेष बाबा म्हणजे, आदिवासी भागातून अशा प्रतिक्रिया येतात की, शासन आम्हाला तांदुळाचा पुरवठा करते. पण, आमच्या घरात तांदुळाच्या राशी लागल्या आहेत. येथे तांदुळ सोडून काय पिकते! त्यामुळे, जर पर्यायी म्हणून काही देता आले तर ती खरी मदत होईल.
या गोष्टीला विचारात घेतले तर आपण देखील एकच भाजी आठवड्यातून तीन वेळा खाल्ली तरी आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे, त्यांना रोज तांदुळ खायचा आहे. त्यामुळे, त्यांच्या मानसिकतेचा विचार करुन प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी यावर तोडगा काढला पाहीजे. तसेच आदिवासी भागात ज्यांची डोके ठिकाण्यावर आहेत किंवा ज्यांच्या काळजात संवेदनशिल नावाचा प्रकार आहे. त्यांनाच  रेशन दुकाना चालविण्याचे परवाने दिले पाहिजे. अन्यथा आम्ही आणायचे अन तुम्ही खायचे असे म्हणार्‍याना प्रशासनाने धडा शिकविला पाहिजे.

सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे २३ लाख वाचक)