दोन भाच्यांना वाचविताना मामाचा मृत्यू मुळा नदीत सापडले तीन मृतदेह, अकोले तालुक्यातील चासमधील घटना
सार्वभौम (अकोले) :
अकोले तालुक्यातील पिंपळदरी शिवारात मामा व दोन भाचे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवार दि. 12 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुनिल तुकाराम वाडेकर (वय 40), प्रविण दत्तात्रय फापाळे व सचिन दत्तात्रय फापाळे (रा.चास. ता. अकोले) अशी तिघांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रविण व सचिन ही दोघे मुंबईला खाजगी कंपनीत कामाला होते. ही दोघे इंजिनियर असून दोघेही आदर्श शिक्षक सुनिल वाडेकर यांचे भाचे आहेत. गेल्या महिन्यात मुंबईत कोरोनाने हाहाकार माजविल्यामुळे ते गावाकडे आले होते. आज सकाळी जेवण अटोपल्यानंतर त्यांनी जरा आराम केला. तर दुपारी गरम झाल्यामुळे ते पिंपळदरी शिवारतून मुळा नदीत आंघोळ करण्यासाठी गेले होते. तसे ही दोघे मुंबईकर असले तरी त्यांनी थोडेफार पोहणे जमत होते. तर सुनिल वाडेकर हे अट्टल पोहणारे होते. या दोघांनी नदीच्या कडेला पोहण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचाकन पाय घसरल्यामुळे त्यांनी पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे, एकास वाचविण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात दुसरा पाण्यात ओढला गेला. ही दोघे पाण्यात गेल्याचे पाहुन मामांनी दोघांना वाचविण्यासाठी स्वत:ची जीव धोक्यात घातला मात्र, दोन्ही भाच्यांनी जीव वाचविण्याच्या आकांताने त्यांना पकडून धरले. त्यामुळे, मुळेने तिघांचा जीव घेतला.
दरम्यान ही घटना सायंकाळी उशिरा लक्षात आली. त्यामुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे. कारण, सुनिल वाडेकर हे एक आदर्श शिक्षक होते. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात चांगले योगदान आहे. त्यामुळे तालुकाभर हळहळ व्यक्त केली जात आहे.
सागर शिंदे