अकोल्यात कराळे व तांबोळी किराणा मालकांवर गुन्हे!


सार्वभौम (अकोले) :
                         कोविड 19 चा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी जिल्हाधिकारी यांनी काही मर्यादा ठरवून दिल्या आहेत. असे असले तरी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. मात्र त्यालादेखील काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. त्या अटींचे उल्लंघन केल्यामुळे किराणा मालाचे व्यापारी तथा धनंजय सुपर शॉपी यांचे मालक राहुल विलास कराळे तसेच भारत एजन्सीमध्ये किराणा मालाचे व्यापारी मोहसीन हमीद तांबोळी अशा दोघांवर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
देशात व राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत देखील कोणी या विषाणूला गांभीर्याने घ्यायला तयार नाही. प्रशासन जीव तोडून सांगत असतानाही जबाबदार नागरिक नियमांची पायमल्ली करताना दिसून येत आहे. हाच प्रकार अकोल्यातही दिसून येत आहे. जीवनावश्यक वस्तूंना शासनाने परवानगी दिली तरी काही नियम व अटी घातल्या होत्या. अर्थातच त्या कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होत्या. किराणा दुकान, भाजीपाला, मेडीकल, दूध केंद्र, दवाखाने अशा विविध ठिकाणी नागरिकांना एक बाय एक चा स्क्वेअर तयार करून एक मीटरच्या अंतरावर उभे करणे तसेच कोणत्याही ठिकाणी पाचपेक्षा जास्त माणसे जमा होऊन गर्दी होणार नाही, अशी दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र सगळे नियम धाब्यावर बसवून व्यापा-यांनी संधी साधत लयलूट केली. यात अडला हरी गाढवाचे पाय धरी अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मिळेल त्या भावाला मिळेल त्या दराने ग्राहकांनी माल खरेदी केला. मात्र एक नैतिकता म्हणून कोणीही सामाजिक सद्भावना अंगी बाळगल्याचे दिसून आले नाही.
सामान्य माणसांची व्यापार्‍यां कडून लूट         
कोरोनाचे संकट ओढवलेले असताना काही व्यापारी हे मोठया प्रमाणावर दलाली करीत असल्याचे लक्षात आले आहे. तर किराणा माल व भाजीपाला यांचे भाव अक्षरश गगनाला भिडवले आहेत. त्यामुळे सामान्य माणसांची सर्रास लूट होत असून त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहीजे. कारण या पडत्या काळात प्रत्येकानेगरीब जनतेच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे आहे.
               अकोल्यात कोणाची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. कोरोनापासून देशाला वाचविण्यासाठी शासन व प्रशासन मोठ्या कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्यामुळे, सामान्य व्यक्तींनी त्यास सहकार्य करणे गरजेचे आहे. पण असे होताना दिसत नाही. कारण, अत्यावश्यक सेवांसाठी काही नियम ठरवून दिले होते. त्यांची पायमल्ली करताना काही किराणा दुकानदार दिसून आले. त्यामुळे, त्यांच्यावर कारवाई केली आहे. असेच जर कोणी नियम मोडत असेल. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.