त्या दानशुर ताईने वाटला 400 कुटुंबांना दोन लाखांचा किराणा


सार्वभौम (अकोले) : 
                           देशावर कोरोनाचे संकट कालियासारखे डोक्यावर आ वासून उभे आहे. आज मितीस देशात 130 करोड जनतेपैकी ग्रामीण भागातील 70 करोड जनता रोज दोन वेळच्या अन्नासाठी त्रस्त झाली आहे. अशा परिस्थितीत दानशूर व्यक्तींनी स्वयंस्पुर्तीने पुढे येणे गरजेचे आहे. विशेेषत: आदिवासी विभाग आणि मागासलेल्या कुटूंबांसांठी कोणीतरी देव म्हणून धावून येणे अपेक्षित असताना अकोले तालुक्यासारख्या दुर्गम भागात सोनालीताई चेतन नाईकवाडी या नगरसेविकेने चक्क दोन ते तीन लाखांचा खर्च करून चारशे ते पाचशे कुटूंबांना स्वखर्चाने महिनाभराचा किराणा घरपोच दिला आहे. त्यामुळे, या दानशूर ताईंचे तालुक्यातून कौतुक होत असून त्यांना खर्‍या अर्थाने गोर-गरिबांच्या दुवा लागल्या आहेत.

  तुम्हाला एक गोष्ट माहित आहे. जगात श्रीमंतांच्या यादीत आपले भारतीय कोठे कमी नाही. मात्र, ही बक्कळ संपत्ती असूनही काय कामाची? जी देशाच्या एखाद्या कठीण परिस्थितीत देखील उपयोगी पडत नसेल. त्यामुळे, लोकांच्या धनसंपत्तीचे कौतुक तेव्हाच होते. जेव्हा, त्यांच्या ताटातील एखादा घासातला घास गरजू व्यक्तीच्या पोटात जाऊन त्याला जगण्याला आधार मिळत असेल. असेच काहीचे काम सोनालीताई यांनी केले आहे. खरंतर कोणताही गवगवा न करता अवघ्या सहा जणांनी अन्नधान्याचे विभाजन करुन किराणा माल विभक्त केला आणि तो वाटला देखील. वास्तव पाहिले तर देश आज पहिल्यांदाच अशा कठीण परिस्थितीतून सफर करीत आहे. अशा स्थितीत देखील दिल्ले ते गल्लीपर्यंत राजकारण सुरू आहे. मात्र, सोनाली ताईंनी असा कोणताही राजकीय भाव मनात न बाळगता समग्र विचार केला. खरंतर त्यांचा प्रभाग क्रमांक पाच आहे. मात्र, त्यांनी केवळ त्यांच्या मतांचा विचार केला नाही. तर चार, पाच, सहा अशा सहा प्रभागात हातावर पोट असणार्‍या कुटुंबांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे, या सामान्य लोकांच्या चेहर्‍यावरील भाव काय होते. हे शब्दात मांडण्याजोगे नाही.
तुम्हाला माहित असेल नसेल. पण, एक गोष्ट अकोलेकरांच्या माहितीस्तव सांगतो की, गेल्या दोन दिवसापुर्वी महालक्ष्मी कॉलनी परिसरात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. का? तर केवळ रोजची चूल पेटत नव्हती, मुलांना दोन वेळचे अन्न देण्यात ती माऊली असमर्थ होती. हीच हतबलती त्यांना थेट फाशी घेण्यापर्यंत घेऊन गेली. त्यामुळे, सोनालीताई यांचे मनस्वी आभार. की, त्यांनी अशा शेकडो हतबल कुटूंबांच्या घरधन्यांचा स्वाभिमान त्यांच्या पदरी दिला आहे. कोण जेणे आज कोणाची अखेरची रात्र होती आणि ताईंच्या रुपाने त्यांना देव भेटला. अर्थात नियतीच्या गर्भात काय दडले आहे याबाबत आपण सर्वच अनभिज्ञ आहोत. म्हणून तर आज तालुक्यातून ताईंवर कौतुकाचा वर्षाव होत असतो.
 
  अर्थात हे फार जूने वाक्य आहे. की, एका यशस्वी पुरूषामागे एका स्त्रीचा हात असतो. याचीच जरा उलट पुनरावृत्ती ताईंच्या बाबत आहे. कारण, त्यांच्या या निर्णयाला चेतन नाईकवाडी यांनी कर्णासारख्या मनाचा आधार दिला. म्हणून तर हे शक्य झाले. अन्यथा अनेकांच्या पुरूषी मानसिकता काय असतात. हे आपल्याला नव्याने सांगायला नको. त्यामुळे, ताईंच्या बरोबरीने ज्यांच्या काळजापर्यंत गोरगरिब जनतेेच्या चेतना पोहचल्या त्या साहेबांचे देखील त्रिवार आभार मानले पाहिजे. हे उदात्ता अंत:करणाचे दान त्यांनी कोणत्याही हव्यासापोटी केले नाही. त्यामुळे, ज्यांनी एक हताने भरभरून दिले. ईश्वर दुसर्‍या हाताने त्यांच्या ओटीत भरभरुन देईल. अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत. तर, आज मिळालेली डाळ, तेल, तांदूळ, साखर, बेसनपिठ, मिठ, मसाले हे लोकांसाठी अन्नधान्य व किराणा असेल तो आमच्यासाठी रोज जगण्याला लागणारा श्वास आहे. अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)