संगमनेरात रेड झोनमधील सहा महिला ताब्यात, गुन्हे दाखल, आत्तापर्यंत 235 जणांवर 188 नुसार कारवाई!


सार्वभौम (संगमनेर) : 
                                  संगमनेर तालुक्यात कोरोनाचे चार रुग्ण आढळल्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यानी मंगळवार दि. 14 एप्रिल रोजी संगमनेर 23 तारखेपर्यंत हॉट्स्पॉट पॉकेट म्हणून घोषीत केले होते. संगमनेर शहरातील नाईकवाडापुरा हे रेड झोनमध्ये असताना देखील तेथे काही पुरूष नागरिक बेजबाबदारपणे वागताना दिसत होतेे. पण, आता तेथील महिला देखील विनाकारण घराच्या बाहेर पडू लागल्याचे चित्र पहायला मिळू लागले आहे. अशाच काही सहा महिला रेड झोनमध्ये घोळका करुन शासनाच्या नियमांचे उल्लंघन करताना मिळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्याच्यावर 188 व 260 तसेच आपत्ती कोविड 19 च्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे, शहरात व रेड झोनमध्ये गर्दीचे प्रमाण फारच कमी झाल्याचे पहायला मिळाले.
जो भाग हॉट्स्पाट पॉकेट म्हणून घोषित केला आहे. त्यांच्या मध्यबिंदुपासून दोन किलोमिटरचा परिसर सिल करण्यात आला होता. या भागाताील नागरिकांनी घरात बसणे अपेक्षित होते. त्यांना आणखी नऊ दिवस सर्व सुविधा शासन घरपोच पुरविणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना आपल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे या परिसरात जो रस्त्यावर दिसेल त्याच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होतेे. आज बुधवार दि. 15 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहरात लखमीपुरा, गवंडीपुरा, कुरणरोड, खलिफा वाडा, नाईकवाडापुरा अशा काही ठिकाणी महिला जमावाने घराच्या बाहेर पडल्याचे पहायला मिळालेे. ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी संबंधित ठिकाणी धाव घेत सहा महिलांना ताब्यात घेतले. त्यांची माहिती घेत थेट त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या परिसरात एकूण 1 हजार 854 कुटूंब असून त्यात 9 हजार 555 नागरिक होमक्वारंटाईन करण्याता आले आहेत. त्यांनी गुरूवार दि.23 एप्रिल पर्यंत घरात बसणे अपेक्षित आहे. अन्यथा जो नियमांचा उल्लंघन करेल. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान शहरात काही अत्यावश्यक सेवा म्हणून काही नियम शिथिल करण्यात आले आहे. मात्र, काही हौशी नागरिकांच्या पायातली भिंगरी त्यांना शांत बसू देत नाही. अशा व्यक्तींवर पोलिसांनी करवाई करण्याचा निर्धार केला आहे. शहरात पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभय परमार व  संगमनेर वाहतुक शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी आत्तापर्यंत 125 वाहनांवर कारवाई केली आहे. तर शहरात 110 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (अन्य पोलीस ठाण्याची माहिती मिळून शकली नाही.) एकंदर शहरात पोलिसांनी चांगले काम केले असून त्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.