हॅलो..! मी प्रांताधिकारी बोलतोय.! दुकानातील नोकरासाठी किराणा दुकानदाराचा सरपंचाला फोन


सार्वभौम (संगमनेर) : 
                            किराणा दुकानावर मनुष्यबळ कमी पडल्यामुळे एका मालकाने चक्क आपण प्रांताधिकारी बोलत आहोत, तुमच्या गावातील त्या व्यक्तीला बाहेर येण्यास मज्जाव करु नका. अन्यथा तुमच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करू. अशी धमकी चक्क गावच्या सरपंचास दिली. त्यामुळे, हाताने खाजवून दुखणे वाढवून घेण्यापेक्षा कसली गावबंदी आणि कसले काय! असे म्हणत सरपंच साहेबांनी त्या मुलास गावाबाहेर जाऊ दिले. या प्रकारामुळे, गावात हुकूमशांही करणार्‍या सरपंचांची चांगलीच जीरली तर हा प्रकार उघड झाल्यानंतर सरपंचांनी किराणा दुकानदाराची चांगलीच जीरविली. हा प्रकार जरा मजेदार वाटत असला तरी शासकीय अधिकार्‍यांच्या नावे अशा प्रकारे फोन कितपत योग्य? याचे चिंतन संबंधित व्यक्तीने करणे गरजेचे आहे.
याबाबत सविस्तर महिती अशी की, संगमनेर तालुक्यात कोरोनाचे चार रूग्ण आढळल्यानंतर शहरात प्रशासनाने कठोर भूमिका घेत काही अत्यावश्यक सेवांचे अधिकार देखील शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अशा परिस्थितीत देखील बक्कळ पैसा कमविण्यासाठी अनेक शकली लढविणारे ‘धिवटे’ आपल्याकडे कमी नाही. त्याचे झाले असे की, या कारोनाच्या काळात काही अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. त्यात किराणा दुकानांचा देखील सामावेश होता. मात्र, दुकाने चालु असली तर गावं मात्र बंद करण्यात आली होती. पोलीस पाटील व सरपंच यांनी गावावर ताबा मिळविला होता. त्यामुळे, कोरोना आपली वेस ओलांडणार नाही. यासाठी प्रत्येकजण खबरदारी घेत होता. यावेळी, बाजारसमिती परिसरातील एका किराणा दुकानात एक मुलगा कामाला होता. त्याचा मालक त्यास कामावर हजर राहण्यास आग्रह करीत होता. तर, गावचा सरपंच त्यास गावाबाहेर पडू देत नव्हता. बाहेर पडायचे असेल तर कायमचे बाहेरच रहावे लागेल, पुन्हा गावात प्रवेश नाही. असे म्हणत गावच्या पुढारक्यांनी संबंधित कामगाराला सुनावले. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी मनस्थिती त्याची झाली.
पण, हे प्रकरण येथेच थांबवतील तर ते व्यापारी कुठले! या मालकाने संबंधित सरपंच महोदयांचा नंबर घेतला आणि फोन फिरविला. हॅलो.! मी प्रांताधिकारी बोलतोय. तुम्ही अत्यावश्यक सेवेच्या कामात अडथळा आणत आहात का? आपत्ती व्यवस्थापन कायदा 188 प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो. चक्क साहेबांचा फोन आणि गुन्हा दाखल होणार हे शब्द कानी पडताच सरपंचांनी संबंधित कारमारास रस्ता मोकळा करुन दिला. जा बाबा संगमनेरात काय तू दिल्लीला जाय! पण, ही रिकाम्या झंजटीचे गाढव बोकांडी नको.!
या प्रकारानंतर हा कामगार कामावर हजर झाला. पण, भिंतीला देखील कान असतात. त्यामुळे, आपण फार हुशार आहोत अशी कल्पना त्यांची झाली. मात्र, या घटनेची शहनिशा केल्यानंतर खरा प्रकार उघड झाला. सरपंच महोदयांकडे त्याचे पुरावे राहून गेले. त्याची कानोकान वाच्चता झाली. मात्र, आता ‘झाकली मुठ सव्वा लाखाची’ सगळे अलबेले झाले. परंतु, अशा आणिबाणीच्या काळत एखाद्या अधिकार्‍याच्या नावेने फोन करुन त्याचा गैरफायदा घेणे हे कितपत योग्य आहे. याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.
- सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे २३ लाख वाचक)