मानलंं "बुवा" महाराज.! ३५ वर्षानंतर तुम्ही सगळे "विरोधक" एका "स्टेजवर" आणले.!

              
संपादकीय :- 
                   मानलं हं "बुवा" तुम्हाला.! जे अकोले तालुक्याच्या इतिहासात गेली ३० ते ३५ वर्षाच्या प्रदिर्घ कालखंडात घडले नाही. ते काल-परवा महाराजांनी घडवून आणले. इनपुट-आऊटपूट सारांश शुन्य.! पण, तालुक्यातील जनतेची अस्मिता आणि किर्तनकारांची मनधरणी करण्यासाठी का होईना.! पण,  सगळे कट्टर विरोधक तुम्ही एका स्टेजवर आणले. अर्थात "हाजीर तो वजीर" अशी म्हण आहे. पण, काल दोन कडव्या प्रतिस्पर्ध्यांनी अगदी कोणालाही वजीर होण्याची संधी दिली नाही. आजी-माजी, ज्येष्ठ-कनिष्ठ, हौशे-नौशे-गौशे अगदी सगळे एकवटून आले होते. या असल्या चळवळी अकोल्याच्या मातीने खूप कमी वेळा अनुभविल्या आहेत. यापुर्वी ८० च्या दशकात दशरथ सावंत यांनी पाटपाण्याचा लढा ऊभा केला होता. त्यावेळी, माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यासह सगळे एकाच व्यासपिठावर आले होते. त्यानंतर रविवारी (दि.२३) सगळा राजकीय गोतावळ्याचा "बाजार"तळावर भरला होता. अपवाद होता फक्त नि:स्वार्थी वारकरी संप्रदाय.!
         
   दशक १९९० चे स्व. यशवंतराव भांगरे यांचे चिरंजीव दिलीपराव भांगरे हे माजी मंत्री मधुकर पिचड साहेबांचे "कट्टर व पारंपारिक" विरोधक म्हणून उदयास आले होते. अर्थात या दोघांनी निवडणुका संपल्यानंतर कधी "आकस बुद्धीचे" राजकारण करुण ते पराकोटीचे टोकाला गेल्याचे दिसले नाही. पण, आजकाल तालुक्यात समर्थक व विरोधक, उताविळ कार्यकर्ते व उत्साही नेते यांच्यामुळे तालुक्यात वेगळाच पायंडा पडू लागला आहे. कोण कोणाचे बॅनर फाडतय तर कोणी जबाबदार नेेते भर सभेत कार्यकर्त्यांची "आयमाय" काढताय. काय ही संस्कृती.? कालचा "पुरोगामी" तालुका "अधोमागीत्वाकडे" वाटचाल करु लागला आहे की काय.? असा प्रश्न पडू लागला आहे. हे इतके भयवाह वातावरण असताना ही सगळी मंडळी एका छताखाली येईल, अशी यत्किंचतही कल्पना कोणाच्या मनाला शिवली नसेल. कारण, तालुक्यात अनेक ठिकाणी जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम पार पडले. पद्मश्री राहिबाई व केसरी सदगिर यांचा नागरी सत्कार आयोजित केला होता. पण, एकाचे तोंड इकडे तर दुसऱ्याचे तिकडे. अशा दुषित वातावरणाने तालुक्यात राजकीय आभाळ फाटत चालले होते. पण, त्याला शिवण्याची ताकद कोण्या मीडिएटरमध्ये नव्हती. पण, हे अशक्य वास्तव वारकरी सांप्रदायाने घडवून आणले आहे. निवृत्ती महाराज देशमुख हे सम-विषम बोलले काय.! त्यांच्या मागे बाईसाहेब लागल्या काय.! महाराजांच्या पाठीशी सगळा महाराष्ट्र उभा राहतो काय.! अन त्यात विचारांनी विस्कटलेला तालुका पुन्हा एका छताखाली येतो काय.! किती मोठी अदृश्य शक्ती म्हणायची ही.! कदाचित अगस्ति महाराज व देवादिकांनाही अकोल्यात अराजकता नको असावी. "जो जे वांच्छिल, तो ते लाभो".! ज्याला ज्याला जे जे पाहिजे, त्याला त्याला ते ते लाभो. पण, या तालुक्यात एकोपा नांदो.! हाच संदेश नकळत या समर्थन रॉलीने दिला आहे.
                 
  खरतर महाराजांनी सम-विषम हे मत आपले नाही. ते साहित्य संग्रहाचे मत आहे. अशा धार्मिक ग्रंथांत नोंदी आहेत. माझ्या मनाचे काहीच नाही. असे मत मांडायला हवे होते. कारण, डॉ. बी. तांबे यांनी त्यांच्या एका पुस्तकात असेच अक्षेपहार्य वाक्य टाकले होते. त्यानंतर त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप झाला. त्यावर डॉ. तांबे यांनी उत्तर दिले होते. की, संबंधित वाक्य हे मी संग्रही साहित्य संग्रहातून घेतले आहे. यात माझे मनमत मांडलेले नाही. त्याचे प्रमाण देत त्यांनी न्यायालयात पुरावे दिले. त्यावर न्यायालय म्हणाले. हे वाक्य त्यांचे नाही. संबंधित साहित्य संग्राहावर कायदेशिक कारवाई करा. त्यानंतर तांबे हे निर्दोष ठरले. हेच प्रमाण महाराजांना लागू होत होते. कारण, ते त्या लिखित वाक्याची फोड करुन सांगत होते. त्यातून त्यांनी कोणाला तसे कृत्य करण्यास प्रवृत्त केले नाही. एक महाराज मिसाईल तयार करण्याचे प्रबोधन करू शकत नाही. तर, ते धर्मग्रंथ, साहित्य, तर्कशास्र, संस्कृती व शास्रोक्त पद्धतीचे विश्लेषण करण्याचे काम करतात. उरला प्रश्न कणखर भाषेचा व काही अक्षेपहार्य शब्दांचा. तर भाषा ही प्रत्येकी १२ मैलावर बदलते. त्यामुळे तो महाराजांचा दोष नाही. हे विरोधकांना नव्याने सांगण्याची गरज भासू लागली आहे. अर्थात यात कायदेशिर मार्ग होते. पण, मी असे बोललोच नाही. असे म्हणून महाराज अणखी गोत्यात येऊ शकतात की काय.? असेही बोलले जाते. त्यामुळे, काल लाखो लोकांना उपदेश व सल्ला देणाऱ्या महाराजांवर दुसऱ्यांचा सल्ला घेण्याची वेळ आली आहे. तरी, तज्ञ लोकांना अजूनही वाटते. त्यांनी प्रशासनाकडे मांडलेले मत, समाधानकारक नाही. उलट त्यांच्या अशा पलटी खाण्याने व दुटप्पी वक्ततव्याने ते टिकेचे धनी ठरले आहेत. त्यामुळे, आपण दुसऱ्यांसाठी उत्तम जज होऊ शकतो. पण, स्वत:साठी चांगले वकील होऊच शकत नाही याची देखील प्रचिती पहायला मिळाली आहे.
           
           खरंतर हे वाक्य फार काही मनावर घ्यावे असे काही नव्हते. अन्यथा चार डोके सोडले. तर, सुप्रिया सुळे, जगातील सक्षम स्रीयांच्या यादित नाव असणाऱ्या नवनीत कौर, सोनाली नाईकवाडी, स्मिता आष्टेकर यांच्यासह कित्तेक जाणकार महिलांनी महाराजांच्या वाक्याचे समर्थन केले नसते. खरं पाहिले तर, मीडियाने नको त्या गोष्टीवर चक्क चर्चासत्र भरविले. एकीकडे "अंनिस" याला अधश्रद्धा म्हणते, देसाई ताई म्हणतात "महिलांचा अपमान" झाला तर "पीसीपीएनडीटी" कायदा रक्षक याला "गर्भलिंग निदान चाचणीवर नेवून ठेवतात. नेमके उत्तर द्यायचे कसे व कोणाला ? या कायद्याचे प्रश्न राहिले बाजुला आणि भलतेच "अतृप्त" विषय पुढे आले अन् "स्टंन्टबाजी" सुरु झाली. कोणीतरी प्रसिद्धी झोतासाठी असे विषय ताणून धरता व प्रशासन त्याला प्रॉटेक्शन देऊन भंगाराला सोन्याच्या भावात उभे करते. हेच खाकी यंत्रणेचे दुर्दैव आहे. 
           आता महाराजांचे सम-विषम प्रकरण संपुर्ण राज्यात गाजल्यामुळे, अनेकजणांची लायकी नसतांना ते अचानक मोठे झाले. तर, अभ्यासकांनी यातून हात आखडता घेत किमान सुसाट सुटलेल्या महाराजांच्या तोंडाला लगाम तरी बसेल. या हेतून न्युटरल भुमिका घेतली. तरी, महाराज हे आमच्या सह्याद्रिची अस्मिता आहे. कळसुबाई शिखराचा उंच आवाज आहे. भंडारदाऱ्याच्या पाण्याइतके त्यांचे खळखळून हसणे व हसविणे आहे. त्यामुळे, संबंध तालुका त्यांच्या पाठीशी उभा आहे. हेच महाराष्ट्राला व विरोधकांना दाखवून दिले. हे सिद्ध करीत असतांना अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत. माजी मंत्री पिचड साहेब व त्यांचे विरोधक अशोक भांगरे साहेब एकत्र आले, माजी आमदार वैभव पिचड साहेब व विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे साहेब एकाच व्यासपिठावर आले. यांच्यासह अनेक कट्टर विरोधक नेते कार्यकर्ते अगदी मांडीला मांडी लावून बसल्याचे पहायला मिळाले. ही खरी सांप्रदायाची ताकद आहे. अशा प्रतिक्रिया माळकरींच्या तोंडून एकावयास मिळाल्या. फक्त असेच एकोप्याचे वातावरण कायम टिकून राहो.! जसे आज एक आले तसे तालुक्यातील विविध प्रश्नांसाठी सर्व मतभेद विसरुन एक येवो.! हेच देवाकडे साकडं.!
- सागर शिंदे
8888782010
 ============
       "सार्वभाैम संपादक"
       
           सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १७ लाख ५० हजार वाचक)