राष्ट्रवादीचे वाद चव्हाट्यावर आणू नका.! पक्षाची प्रतिमा जपा - संदिप वर्पे, अकोल्यात दरवाजाबंद मुलाखती

           
राजूर (प्रतिनिधी) :- 
               अकोले तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आज सोमवार दि.१७ रोजी राजूर येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक पार पडली. यात अनेक उमेदवीरांनी मुलाखती देण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार भानुदास तिकांडे, संपत नाईकवाडी, सुरेश खांडगे, संजय वाकचौरे, चंद्रभान नवले, संदिप शेणकर, राजेंद्र कुमकर, विनोद हांडे, पोपट दराडे, बाळासो आवारी, दिपक वैद्य यांच्यासह अनेकांची नावे अग्रस्थानी होती. दुपारी संदिप वर्पे यांच्या संबोधनानंतर मुलाखती सुरु झाल्या. तर, या निवडीसाठी मोठी हौशा, नवशा, गवशांनी मुलाखती दिल्या. मात्र, तालुकाध्यक्ष कोण.? हे दोन दिवसानंतर घोषित केले जाईल असे सांगण्यात आले आहे.

कोण काय म्हणाले ?

            अशोक भांगरे म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकारणी जाहिर करणे बाकी होती. जेव्हा तालुक्यात काही नाही असे वाटले तेव्हा महेश तिकांडे, रवी यांच्यासह थोडे लोकं होते. गेली ४० वर्षे ज्यांनी तालुक्यात वर्चस्व गाजविले. त्यांना आम्ही पराभूत करु शकलो. आमदारकीत विजय मिळवून देखील पंचायत समितीत अपयश आले. त्यासाठी कारणे वेगवेगळी आहे. मात्र यानंतर सोसायटी ते प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थावर ठराव करुन संघटन बांधले पाहिजे. आता वरिष्ठांनी पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या पाहिजे. कधी ना कधी नेमणूका करायच्या आहेत. त्यामुळे जास्त काळ लावू नका. अकोल्यातील कार्यकर्त्यांनी ६० हजार मतांनी आमदार निवडून आणले आहे. त्यामुळे, कोणी नाराज होणार नाही. प्रत्येकाला काही नाही काही पद देऊ, तालुक्यात नाही तर जिल्ह्यात देऊ. त्यामुळे, कोणी नाराज होऊ नये.!
         आ. किरण लहामटे म्हणाले की, अकोले तालुक्यात शरद पवार व दादांच्या नेतृत्वाखाली  आपण चांगले काम केला आहे. हे काम करताना कोणी अनेक कष्ट घेतले ते सर्वांना माहित आहे. तर, काही लोकांनी योगदान देऊन ते पुढे आले नाही. त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही. आज जे स्पर्धक जमले आहेत. त्यांच्या मुलाखती घेणार नाही. तर, विचार ऐकूण घेतले जाणार आहे. पक्षाचा आदेश कोणी डावलू नका. सोशल मीडियाचा वापर करुन पक्षाची बदनामी करु नका. जो अभद्र बोलून बदनमी करेल. त्याच्यावर काय कारवाई करायची. ते मी पाहुन घेईल. या निवडीत कोणी नाराज होऊ नये.
              अजित कदम म्हणाले की,  अकोले तालुक्यात अनेक संकटांना मार्ग काढून विजय मिळविला आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीचा दबदबा काय असतो हे आपण सिद्ध केले आहे. अकोल्यात तुमचा शत्रू फार मोठा आहे. त्यामुळे, तुमचे वाद चव्हाट्यावर आणू नका. चार भिंतीच्या आत वाद मिटवा. आता प्रशासन तुमच्या ताब्यात आहे. तालुत्यात १२ सेल व १५-२० कमीच्या आहेत.
         संदिप वर्पे म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीत पवार साहेबांच्या विचारांनी आपण प्रेरित झालो होतो. म्हणून राष्ट्रवादीचा झेंडा तालुक्यातून खाली पडू दिला नाही. आपले चांगले आमदार आले तरी आपण विरोधात बसू असे वाटले होते. पण आपल्या चाणक्याने आपल्याला सत्तेत आणले. या दरम्यान आपल्या अकोल्याचे आमदार १५ दिवस कारावासात होते. पण, त्यामुळे आपण सत्तेत आलो. आता तालुकाध्यक्ष नेमण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सद्या आता मुलाखत घेण्यात येणार आहे. मात्र, निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होणार आहे. अकोले तालुका, राजूर व पठार भागातील ३२ गावांसाठी वेगवेगळे प्रतिनिधीत्व देण्यात येणार आहे. याबाबत अजित दादा, जयंत पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मोठे लोक निर्णय घेतील. त्यावेळी कोणी नाराज होऊ नये. पक्ष प्रत्येकाची नोंद घेत असतो. पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडली पाहीजे. कोणी नाराज होऊ नये, रुसवा फुगवा धरु नये. कारण, कोणी पक्ष सोडून गेल्याने पक्ष थांबत नाही. राजकरण हा दुधाचा धंदा आहे. घरातलं कोणी मेलं तरी तो सोडून चालत नाही. दुधाच्या धारा काढाव्याच लागतात. इंदिरा गांधी यांना अग्निदाग देऊन रा.गांधीं यांनी शपथविधी घेतली होती.
    
           स्थानिक स्वराज्या संस्था आपल्याला टारगेट करायच्या आहेत. जिल्हा बँक आपल्याला ताब्यात घ्यायची आहेत. तेथे दादा लक्ष घालणार आहे. पुढील काळात नगरपंचायत तुम्हाला ताब्यात घ्यायची आहे. त्यावर पुढील आमदारकी आवलंबून आहे. सोशल मीडियावर बोलताना जाहिर रित्या प्रकट होऊ नका. पण, तसेही आपण सोपे नाही. कोणाच्या हाती लागणार नाही.    आपले नेतृत्व शरद पवार आहेत. त्यामुळे कोणत्याही पैलवानाने नाद करायचा नाही. तरी सोशल मीडियाचा वापर करताना तारतम्य बाळगा. आज तालुकाध्यक्ष पदाची निवड करताना कोणत्याही परिस्थितीत विसंगती होणार नाही. ती अगदी पारदर्शता राहिल. पण, निवडीनंतर कोणी नाराज होऊ नका.  राष्ट्रवादीच्या आचारसंहिता लागू ठेऊनच हे कमकाज पार पडेल. तालुक्यातील सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे

- आकाश देशमुख
(राजूर प्रतिनिधी )
 ============
       "सार्वभाैम संपादक"
       
           सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १७ लाख ५० हजार वाचक)