संगमनेरात सराफावर भर दिवसा गोळीबार, एक जखमी, एक ठार.! त्याचा तर हकनाक जीव गेला.! पथके रवाणा.!
संगमनेर (प्रतिनिधी) :-
संगमनेर शहरातील घुलेवाडी परिसरात सराफांवर गोळीबार करत लुटारुंनी लाखो रुपयांच्या चांदीचा ऐवज लुटल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. यात सराफास सोडविण्यासाठी गेलेल्या अविनाश शर्मा या दुचाकी स्वरावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. तर, सुवर्णकार ज्ञानेश्वर चिंतामणी हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लुटारुंनी सराफाकडील मुद्देमाल घेऊन नाशिकच्या दिशेने पोबारा केला. ही घटना अगदी काही क्षणात अगदी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे, संगमनेर शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर शहर पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेत आरोपींचा मागमूस घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान गाडीच्या माहितीसह काही पुरावे पोलिसांच्या हाती आले असून तपास गतीने सुरु आहे. ही घटना समजताच पोलीस अधिक्षक सागर पाटील यांनी संगमनेरात धाव घेतली. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे दिलीप पवार, शहर वाहतुकीचे एपीआय पप्पू कादरी यांनी त्यांची पथके तपासास रवाणा केली आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी (दि.५) सायंकाळी साई कृपा ज्वेलर्सचे मालक ज्ञानेश्वर चिंतामणी हे त्यांचे दुकान बंद करुन घराकडे चालले होते. संगमनेरच्या घुलेवाडी पोलीस ठाण्याच्या अगदी हकेच्या अंतरावर गेले असता त्यांना एक कार आडवी झाली. त्यात चौघे बसलेले होते. त्यातील तिघांनी गाडीच्या खाली उतरुन चिंतामणी यांच्या काचेवर वार केले. गाडीच्या काचा फुटल्यानंतर ते घाबरले व त्यांनी सराफास दमदाटी सुरु केली. दरम्यान गोळीबार व गाडीच्या फोडलेल्या काचेमुळे रस्त्यावर फोर मोठा आवाज झाला. सराफ व लुटारु यांच्यात चालेल्या झटापटीमुळे अविनाश शर्मा व त्याचा मित्र दुचाकीवरुन सराफाच्या जवळ आला. हे किरकोळ वाद नाही. तर, हे लुटारु आहेत, ते सराफास लुटत आहेत हे लक्षात येताच त्यांनी हलचाली सुरु केल्या. या दरम्यान दोघांच्या वादात शर्मा यांच्या मांडीला गोळी लागली व तो खाली कोसळला. दरम्यान लुटारुंनी सराफाकडील चांदीची पिशवी हिसकडून पळ काढला. तर, सराफ व शर्माच्या मित्राने देखील जीव मुठीत धरुन स्वत:चा बचाव केला. काही क्षणात दुरवर लोकांनी हा प्रकार पाहिला. जनता सावध होण्याच्या आत लुटारुंनी नाशिकच्या दिशेने आपले वाहन भरधाव वेगात नेले.
दरम्यान सराफास मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अविनाश शर्मा याच्या मांडीतून गोळी वर सरकली व त्याची प्रकृती चिंताजनक झाली. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, फार काळ तो श्वास रोखून धरु शकला नाही. रात्री उपचारादरम्यान शर्माने अखेरचा श्वास घेतला. ही घटना शहरासह जिल्ह्यात पसरली. त्यामुळे, चांगलेच दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, पोलीस अधिक्षक सागर पाटील यांनी संपुर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. ही तपास करण्यासाठी तत्काळ एलसीबीचे पथक रवाना झाले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी काही संशयीत गोष्टींचा तपास केला आहे. लवकरच आरोपींना आम्ही गजाआड करु असे अश्वासन देखील पोलिसांनी दिले आहे.
- सागर शिंदे
(क्राईम रिपोर्टर)