"होमगार्ड" झाले "न्यायधीश".! "एसपी" साहेब.! त्या दोघांना खात्यातून "बडतर्फ" करा, संघटनांची मागणी.!

नाही केलं तरी हो म्हणायचं.!

 संगमनेर (प्रतिनिधी) :- 
                  दि. २६ डिसेंबर २०१९ तुम्हाला आठवत असेल हैद्राबाद रेड्डी प्रकरण. या घटनेत आरोपींनी चार दिवसात बेड्या ठोकल्या होत्या. मात्र, पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास होण्यापुर्वीच त्यांचा एन्काऊंटर केल्याचा आरोप झाला. या पोलिसांच्या झटपट न्यायावर जनता खूश झाली. पण, विधीतज्ञ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तेशेरे ओढले. इतकेच काय.! प्रकाश आंबेडकर, निलमताई गोऱ्हे, विशेष सरकारी वकील उमेश्चंद्र यादव आणि संविधान माननाऱ्या सर्वांनीच या कारवाईचा निषेध केला. ईव्हन सर्वोच्च न्यायालयाने देखील वर्दीवर ताशेरे ओढले आणि त्या प्रकरणाची चौकशी लावली आहे. कारण, तो अधिकार पोलिसांना बिल्कूल नाही. आता हे सांगायचे तात्पर्य असे. की, काल संगमनेर बस स्थानकावर एक विद्यार्थ्याने विद्यार्थीनीची छेड काढली म्हणे, आणि त्याला शिक्षा काय ? तर भर बस स्थानकावर एक गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) महिला कर्माचाऱ्याने त्यास एक ना दोन तब्बल शंभर उठबशा काढायला लावल्या. अर्थात त्यांना माहित होते. हे सोशल मीडियावर राज्यभर पसरेल, माध्यमांना झळकेल, मग आपल्याला दबंग किंवा सिंघम म्हणून संबोधले जाईल. त्यामुळे, ताईसाहेबांचा पारा पार हाय लेवलला गेला. तु माझा काय बाप झाला काय रे.! अशा शब्दात त्या अल्पवयातल्या विद्यार्थ्यावर रेस झाल्या. पण, मॅडम देवाशप्पत.! मी काही केले नाही. मी छेड काढली नाही, हवतर ज्या कोणाची छेड काढली तिला विचारा समोर आणा. पण, याचे हे असले फिरुन बोलणे अर्धपावर असलेल्या खाकीला बोललेले सहन होत असते का ? मग काय.! धर कान आणि बस खाली. मॅडमच्या दिमतीला अणखी एक  जोडीदार.! आणि त्यातल्या त्यात समाज समोर उभा असताना याचा पावर कमी होईल तर ती खाकी कसली. शेवटी विद्यार्थ्याने धरले कान आणि झाल्या जोर बैठका सुरु. बघता-बघता खिशातून सगळेच मोबाईल बाहेर आले आणि कैद झाली ही जुल्मी कथा. खरं उंबऱ्याच्या बाहेर पडायच्या आत खोटं सगळं गाव पिंजून आलं. मात्र, जेव्हा या विद्यार्थ्याला पावलोपावली बोचणी बसू लागली. तेव्हा काळीज गलबलून गेलं आणि आपल्यावर झालेल्या अन्यायावर प्रहार करण्यासाठी त्याने छात्रभारती संघटनेला साद घातली. सिंघम ताई रुबाब गाजवून गेल्या खऱ्या.! पण, एक विद्यार्थ्यांचे आयुष्य हकनाक बरबाद होऊन गेले आहे. कारण, ती पाच मिनीटांची क्लिप त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या डोळ्यासमोर खेळत राहिल. त्यामुळे, कोणतीही शाहनिशा न करता होमगार्ड कर्मचाऱ्यांनी जो पवित्रा घेतला. त्याबद्दल जिल्हा पोलीस अधिक्षक तथा होमगार्ड अधिक्षक सागर पाटील साहेब यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. संबंधित घटनेची चौकशी करुन त्या कर्मचाऱ्यांना खात्यातून बडतर्फ करण्यात यावे.  तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मानवाधिकार संघटनेच्या एका वकिलाने केली आहे. तर, छात्रभारतीने देखील स्थानिक पीआय अभय परमार यांना सखोल चौकशीबाबत निवेदन दिले आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यावर दबंगिरी करणाऱ्या होमगार्ड कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असल्याची माहिती नगरच्या अधिकाऱ्यांनी दिली.

खाकीच्या नावाखाली हिटलरशाही.!

         सन २०१८-१९ मध्ये  गृहरक्षक महासंचालक संजय पांडे यांनी होमगार्डचे कर्मचारी पोलीस खात्याशी संलग्न करावेत असे आदेश काढले होते. त्यात नाशिक परिक्षेत्रासह १२ शे पोलिसांचा सामावेश होता. नगरला अप्पर पोलीस अधिक्षक घनश्याम पाटील साहेब असतांना त्यांनी जिल्ह्यातील ३० पोलीस ठाण्यापैकी १५ ठिकाणी १०० होमगार्ड नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यांना सुचित करण्यात आले होते. की, तुम्हाला पोलीस म्हणून नव्हे तर सहाय्यक म्हणून नियुक्त केले जात आहे. यांच्या ड्युट्यांचा कालावधी तेव्हा महिनाभर होता. स्टेशन डायरी, सीसीटीएनएस, तपास, डिटेक्शन, मुद्देमाल जप्ती आणि प्रशासकीय कोणतेही अधिकार यांना नसतील. मात्र, पंच, पैरवी अधिकारी, साक्षिदार, पेट्रोलिंग व कागदोपत्रास मदतनीस म्हणून तसेच आरोपींची ने-आण करण्यासाठी मनुष्यबळ म्हणून यांचा वापर करण्यात यावा. आता हे सगळे नियम क्लेअर असताना. सिंघम ताईंनी आरोपी म्हणून शिक्षा देणे, एखाद्याला जाग्यावर दोषी ठरवून जाग्यावर शिक्षा देणे. हे तर न्यायालयाच्या आणि हिटलरच्या वर गंमत झाली. जर, होमगार्ड प्रशासन इतके सजग आणि तत्पर आहे. तर, न्यायालय आणि संविधान तसेच आयपीसीच्या कलमांची अगदी काहीच गरज नाही. चक्क एसपी किंवा डेप्युटी सोडा.! पीआय देखील अशा शिक्षा देताना हजारदा विचार करतात. मॅडम तर खरोखर दामिनी पथकाच्या इन्चार्जच झाल्या.! आता त्यांचे अधिकार काय आहेत. हे संगमनेरचे होमगार्ड अधिक्षक त्यांना सांगतीलच, पण, पीआय एसपी साहेबांना, जर हे प्रकरण न्यायालयात गेेले तर कोर्टाला आणि बऱ्याच गोष्टींना उत्तर द्यावे लागणार आहे.

दंडोक्याच्या धाक अन खाली वाक

             दुसरी महत्वाची गोष्ट, भारताला संस्कृतीचा फार मोठा वारसा लागला आहे. त्यामुळे, येथील माणूस प्रचंड भावनिक आहे. काय खरं, काय खोटं काहीही असो.! "झट मंगनी, पट ब्याह" हिच अपेक्षा नागरिक बाळगतो. अर्थात चूक नाही. पण, न्याय व्यवस्था कशासाठी बनविली आहे.? तिच्या डोळ्यावर जरी पट्टी असली, तरी ती म्हणते. शंभर अपराधी सुटले तरी चालतील. पण, एका निरापराध्याला शिक्षा नको.! तुम्हाला माहित असेल. आज अगदीच दोन महिने झाले असेल. एका व्यक्तीला शिक्षा झाली आणि तो ओरडून सांगत होता. मी हा अपराध केला नाही. पण, ऐकेल तो समाज कुठला.? अखेर त्या तरुणाने आत्महत्या केली. कोण जबाबदार आहे याला ? माणसाने सद्सद विवेक बुद्धी जागी ठेवली पाहिजे. व्यक्तीच्या हातून चुका होतात. पण, त्याला लगेच अस्पृश्य करायचे नसते. आज तो मुलगा  चुकीचा असेल तर होय.! त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण, नसेल तर त्याची मानसिकता देखील लक्षात घेतली पाहिजे.

माफिनामा लिहुन द्या.!

           आज त्या विद्यार्थ्याच्या  पाठीशी छात्रभारती ठामपणे उभी राहिली आहे.  मानव अधिकार संघटना देखील त्याला बळ देत आहे. जर कायदेशीर फिर्याद झाली तरी ती मंजूर असेल. पण, खाकीच्या आडून होणारी हुकूमशाही सहन केली जाणार नाही. हिच भुमिका सामाजिक संघटनांनी घेतली आहे. पाहुयात चौकशीचा अहवाल काय म्हणतोय ते. पण, तो दोषी असल्यास ३५४ नुसार कारवाई आणि नसल्यास कर्मचाऱ्यांचे निलंबन अथवा बडतर्फ. या मागणीवर संघटना ठाम आहेत.


- सागर शिंदे

क्राईम रिपोर्टर
=============
                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १२५ दिवसात २४५ लेखांचे १५ लाख २५ हजार वाचक)