"सौ साल पेहेले"! एक होते आदर्श गुरुजी.! केरुजी जोरवर आनंतात विलिन.
अकोले :-
"मरावे परी "किर्तीरुपी उरावे". असे म्हटले जाते. असे झाले तरच "जगण्याला अर्थ" प्राप्त होतो. अन्यथा "सारांश शुन्य" जगण्याला 'अर्थ' तरी काय ? असेच एक "आदर्श जगणे" केरु पांडू जोरवर (रा. देवठाण, ता. अकोले) यांचे होऊन गेले आहे. "सौ साल पेहेले" म्हणजे अगदी शंभर वर्षापुर्वी त्यांचा जन्म झाला. इतिहासाने रेखाटावे असे उल्लेखनिय काम नसले. तरी, "इतिहासाला साजेसे" जीवन ते जगले आहे. एक "माणूस" आणि "शिक्षक" म्हणून त्यांनी जी "स्वत:ची प्रतिमा" तयार केली. ती खऱ्या अर्थाने समाजाला आदर्श ठरणारी आहे. कारण, अवघ्या वर्षात आई वडिलांचे "छत्र" हारपल्यानंतर 'आयुष्य' किती "उपरे आणि पोरके" होते. हे नव्याने सांगायला नको. पण, तरी देखील "पडायचं आणि उभं रहायचं" ज्याला जमतं तो खरा "संघर्षशिल" पुरुष होतो. तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास माहित असेल. साहेब अगदी इयत्ता चौथीत असताना आई "भिमाईने" डोळे मिटले. पण, तरी पोरका झालेला "भिवा" पुढे देशातील सर्वात मोठ्या "लोकशाहीच्या संविधानाचा शिल्पकार" झाला. म्हणून प्रत्येकजण "संघर्षातून" घडत असतो. त्यातीलच "केरु जोरवर गुरुजी" हे व्यक्तीमत्व आहे. "भारताच्या मध्ययुगीन इतिहासाचे साक्षीदार" ठरलेले हे व्यक्तीमत्व वयाच्या ९७ व्या वर्षी आनंदाने "दिर्घश्वास" घेत 'अनंतात विलीन" झाले. त्यांच्या आयुष्यावर "सौ साल पहले" या लेखातून टाकलेली ही एक ओझरती नजर.!
दि. १ जुलै १९२३ साल. आभाळाच्या गर्भात सुर्याचा जन्म तर सखुबाईंच्या गर्भात एका आदर्श व्यक्तीचा उदय होऊ घातला होता. मुहुर्त कसाही असो.! कर्तुत्व रणांगण गाजविते. हे राजे छत्रपती सांगून गेले आहे. कारण, पालथे जन्माला आलेले शंभुराजे दिल्ली पालथी घालतील. इतका प्रचंड सकारात्मक आत्मविश्वास त्यांच्यात होता. म्हणून तर राजे-राजे होते. अर्थात जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण, हे वाक्य आपल्या कानी वारंवार पडले आहे. म्हणून तर टाक्याचे घाव सोसल्यानंतरच दगडाला देवपण येते. अगदी तसेच झाले. केरु गुरुजींच्या आयुष्याला आज फुकट देवपण आले नाही. तर, अगदी लहानपणापासूनच त्यांच्या जगण्याला भावनांच्या ठेचा खाव्या लागल्या. कारण, वयाच्या चौथ्या वर्षी त्यांच्या डोक्यावरील आई वडिलांचे छत्र हरपले. कोण जाणे.! दैवाला त्यांच्या हातून किती समाजसेवा घडवायची होती. त्यामुळे त्यांच्या नशिबात फार काळ मातृत्वाचे प्रेम तो लिहु शकला नाही. म्हणतात ना.! "माय मरो, मावशी उरो"! या म्हणीप्रमाणे त्यांच्या आत्याने त्यांचा सांभाळ केला. त्यांचे कुंकू लक्ष्मण सदगीर यांनी पोटच्या गोळ्यासारखा हा मुलगा लहानचा मोठा करण्याची शपथ घेतली. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले" या म्हणीप्रमाणे केरुजी शाळेत अगदी दिमाखात जाऊ लागले. लक्ष्मण रामजी सदगीर यांची परिस्थिती जेमतेम असली, तरी त्यांनी या मुलास पोरकेपणाची आठवण येऊ दिली नाही. त्याचे फलित म्हणून केरुजींनी इयत्ता ७ वी मध्ये जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकविला. शासनाकडून त्यांची दखल घेतली गेली. त्याकाळी आज प्रमाणे डीएड, बीएड, बीपीएड असे काही नव्हते. व्यक्तीमत्वाचे मुल्यांकन गुणवत्तेवर होऊन थेट नोकरी मिळत होती. ना टिईटी ना सीईटी असल्या आयुष्याच्या कसोट्या घेणारे मापन नव्हते. त्यामुळे, केरुजींच्या अस्थिर आयुष्याला स्थिरतेचे वलय मिळाले. लक्ष्मणरावांचे कष्ट फळाला लागले.
शिक्षक म्हणजे काय ? तर हे केरु गुरुजींकडून शिकावं. आजकालचे मास्तर विद्यार्थ्यांना घडवितात की बिघडवितात.! हेच कळायला तयार नाही. मास्तरांच्या पापी नजरांनी मुलींसारख्या विद्यार्थींनींचे लोचके तोडले जात आहे. सकाळी वर्गात शिकविणारा मास्तर संध्याकाळी दारुच्या आड्ड्यावर दिसत आहे. पुर्वापार वाचनाची संस्कृती असणारे गुरुजी आजकाल व्यसनाच्या आहरी गेल्याचे दिसत आहे. पण, तुम्हाला सांगायला आनंद वाटतो. की, केरु गुरुजींनी कधी कोणतेही व्यसन केले नाही. कधी व्याभिचार केला नाही. शिक्षक म्हणून त्यांची नैतिकता अगदी १०० वर्षे आदर्श राहिली आहे.जेव्हा ते शिक्षक झाले. तेव्हा त्याकाळी दळणवळणाच्या सुविधा नव्हत्या. भेटली तर सायकल नाहीतर पायी प्रवास असायचा. गुरुजी नेहमी सायकलवर जात असताना त्यांच्या तोंडी "हरी मुखे म्हणाचा" गजर गुंजत असायचा. त्यांचे प्रचंड वाचन होते. एकवेळी भाकर नको.! पण, पुस्तक द्या.! हेच त्यांचे व्यसन होते. अध्यात्माने विकृत व्यक्ती देखील "माणूस" होऊ शकतो. यावर त्यांची धारणा होती. म्हणून, भगवतगीता, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, हरिपाठ अशा धार्मिक ग्रंथांचे पठण करणे हे त्यांच्या वाणीने कधी द्वेषाचे मानले नाही.
शिक्षक असताना त्यांनी हजारो विद्यार्थी डॉक्टर, वकील, इंजिनियर व शेतकरी घडविले. इतकेच काय.! तोच वसा आपल्या मुलांमध्ये रुजविला. निवृत्तीनंतर आपले आयुष्य समाजाप्रती खर्ची व्हावे. म्हणून त्यांनी अध्यात्मावर भर दिला. "जो जे वांच्छील, तो ते लाभो" असे म्हणत ज्ञानाचा विस्तार सुरु केला. गळ्यात तुळशीची माळ घालून विठ्ठलाप्रती अगाध प्रेम ते व्यतीत करी. नियमित पंढरीची वारी आणि टाळ मृदुंगाच्या गजरात ते समाज प्रबोधन करु लागले होते. हे विश्वची माझे घर.! नसावे आयुष्याला दार असे म्हणत त्यांनी कधी कोणाचा द्वेष केला नाही. काशी, बद्रीनाथ, केदारनाथ, वैष्णवदेवी, पंढरपूर हेच त्यांच्या पायाला आगदी ओळखीचे झाले होते. उभी हयात या व्यक्तीने आदर्श शिक्षकाचा वसा जपला. माणूस म्हणून जगणे काय असते. याचे ज्वलंत उदाहरण त्यांनी जनतेला दाखवून दिले. शरिरात प्राण असेपर्यंत तत्वांशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिलेले व्यक्तीमत्व म्हणजे केरु जोरवर होय.. या आदर्श व्यक्तीने अखेरचा श्वास घेऊन. खरंतर आपण देशासाठी काय करु शकतो. तर, स्वत: चांगले जगा. मागेपुढे निंदा नालस्ती करण्यापेक्षा समोर बोला, मने हलकी करा. तुम्ही एकटे आदर्श जगलात तर एकएक करुन सगळा देश आपोआप आदर्श होईल. म्हणून देशाला उन्नत बनविण्यासाठी स्वत:पासून सुरुवात करणाऱ्या केरुजी जोरवर यांना रोखठोक सार्वभौम कडून भावपुर्ण श्रद्धांजली. जोरवर हे पत्रकार लहानू सदगीर यांचे आजेसासरे आहेत.
- सागर शिंदे