"साहेब.! एक दादा प्रिय आणि दुसरे अप्रिय का ? नि:शब्द अनुत्तरीत प्रश्न.!"
आदरणीय पवार साहेब.!
प्रथमत: क्षमा असावी.! मी एक सामान्य कार्यकर्ता. "लहान तोंडी मोठा घास घेतोय". पण, तुम्ही "पुरोगामी" विचारांचे आहात. "मोदीजी व अमितजी" यांच्यासारखे "हम करे, सो कायदा" असा तुमचा स्वभाव नाही. म्हणून "संविधानाने" दिलेला "अधिकार" आणि त्याहुन पलिकडे एक "आपुलकीचे नाते". म्हणून एक "खेद" व्यक्त करतो. तो म्हणजे आ. रोहित पवार यांच्या मंत्रीपदाबाबतचा. खरतर मी माझ्या "मंडळाचा अध्यक्ष" व्हावा अशी अपेक्षा देखील कधी "उत्प्रेरित" झाली नाही. पण, आपले सरकार आले, आणि असे प्रकर्षाने वाटले की, तुमच्या पावलावर पाऊल ठेवत "रोहित दादा मंत्री" होतील. पण, साहेब.! पुर्ण "भ्रमनिराश" झाला. काय आणि कोण "अडथळा" झाला. देव जाणे.! पण, आमच्या भावणांना नक्कीच "दुसवट्याची" वागणूक मिळाल्याचे प्रकर्षाने जाणवले. कदाचित त्यांच्या प्रचाराला कोणीच आले नसते. तरी चालले असते. कारण, नकळत त्यांच्यावर "पवार कुटुंबाचा ठपका" बसला आणि अगदी "खड्यागत" त्यांना अलगद बाहेर फेकले गेले. पण, "दुर्दैव" आमचे की, लोकांना "नात्यागोत्यांचा फायदा" झाला. कोठे "लेकासाठी बाप" धावला, कोठे "लेकीसाठी. कोठे "भाच्यासाठी मामा धावला तर कोठे पुतण्यासाठी काका. पण, येथे नात्यानेच घात केला की काय! असे भासू लागले आहे. एकीकडे कौटुंबिक "राजकीय वलय" नव्हते म्हणून अंतीम क्षणी डॉ. लहामटेंना वगळले. तर, दुसरीकडे लेकरु कॅबिनेट मंत्री झालं पाहिजे.! यासाठी ऐनवेळी राऊतांना वगळून आदित्य ठाकरे मंत्री झाले. याला म्हणतात "आपुलकी" आणि "आपुलेपणाची आत्मियता". मग हे कमविण्यात आम्ही कोठे कमी पडलो.? याचेच उत्तर सापडता सापडेना. म्हणून साहेब.! तुम्हाकडे हा "शब्दकल्लोळ" माडावा वाटला आहे.!
साहेब.! सगळ्यांना चांगलच आठवतय, जेव्हा तुम्हाला "ईडीची नोटीस" आली. तेव्हा "रोहित नावाच्या वादळाने" मुंबईत उधानासारखं थौमान घातलं.! मी टिका करणार नाही. पण, आठवण म्हणून आठवतय की, अजित दादा तेव्हा अचानक "अज्ञातवासात" गेले होते. हो.! तेव्हा जितेंद्र आव्हाडांसारखे व्यक्तीमत्व अगदी सह्याद्रीच्या पाठीशी पहाडारखे उभे होते. त्याचे फळ त्यांना मिळाले. मग, समाज्याच्या मनावर अधिराज्य गाजविणारा हा तरुण का उपेक्षित राहिला. हा प्रश्न नेहमी माझ्या मनाला छळतो आहे. साहेब.! जेव्हा पडता काळ होता. तेव्हा पक्षाची सोडा, लोक तुमची काळजी करत होते. त्या काळजीत पहिले नाव या रोहित पवारांचे होते. मग, पडत्या काळात ज्यांनी आपली साथ दिली. त्यांना आपल्या चलतीच्या काळात दुर ठेवायचे. हे मनाला कोठेतरी फार बोचत आहे. लोक म्हणतात, इतिहासाची पुनरावृत्ती होते. ती नगर जिल्ह्यात झाली. शरद पवार यांना बाळासाहेब विखे यांच्यानंतर पुन्हा राधाकृष्ण विखे जड भरले. त्यास प्रतिउत्तर म्हणून याच रोहित पवार यांनी भाजपच्या अस्मितेवर घाव घातला आणि शिंदे साहेबांना पराभूत करुन भाजपला कळ सोसायला लावली. अर्थातच शिंदे यांनीच पराभूत उमेदवारांचे संघटन करुन विखे पाटलांच्या विरोधात बोंब कुटली. याचे श्रेय रोहित पवारांना जाते. कारण, शिंदे पडले नसते. तर, त्यांनी विखेंच्या विरोधात "ब्र" देखील काढला नसता. ईतकेच काय ! जर, आज कर्जत जामखेडला ताकद दिली असती. तर, उद्या विखेंच्या विरोधात कट्टर व तुल्यबळ उमेदवार उभा राहिला असता. पण, इतका परकेपणा का वाटला. याचे उत्तर मिळता मिळेना झाले आहे.
साहेब.! लोकं म्हटली असती पवार घराणे चालविले. पण, मंत्रीमंडळाच्या विस्तारात ४३ पैकी २२ मंत्री घराणेशाहीतून आले आहेत. लोकांचे सोडा, आपल्या राष्ट्रवादीत १४ पैकी ९ जण म्हणजे ६५ टक्के घराणेशाहीच आहे. मग, आणखी एक वाढला असता. तर, काय हरकत होती ? उमेदवारी देताना ११६ मतदारसंघात ९४ उमेदवार घराणेशाहीतून होते. तेव्हा कोणी विचार केला नाही आणि आज मंत्री होण्याची वेळ आली आणि.....! शब्दच अनुत्तरीत होऊन जातात. खरंतर, आज जी काही मंत्रीपदे मिळाली. ती, दादा गटाला मिळाली आहेत. होय.! तोच हा गट, जो शरद पवार साहेबांना न विचारता भाजपशी संलग्न झाला होता. त्यांना मंत्रीपदे, आणि जे दादांना सोडून साहेबांशी ठाम राहिले. त्यांच्या पदरी काय ! तर, निराशा. हेच फळ निष्ठावंत असण्याचे असते की काय ? याचे देखील उत्तर मला शोधून सापडले नाही.खरं सांगायचे झाले. तर, गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार यांनी काडी-काडी जमा करुन कर्जत-जामखेडच्या मनात अगदी घर तयार केले होते. कदाचित ते अपक्ष म्हणून उभे राहिले असते. तरी त्यांनी काठावर का होईना विजय खेचून आणला असता. किमान आ. बच्चू कडू किंवा आ. शंकरराव गडाख यांच्यासारखा सन्मान तरी झाला असता. पण, दुर्दैव असे की, नात्याचा आधारच निराधार करुन गेला की काय ! असे वाटू लागले आहे. राज्याचे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी मुलास मंत्रीमंडळात सामावून घेतले. कोणता अनुभव आहे दोघांनाही.? पण, शिकण्याची उर्मी तर आहे ना.! मग, अजित दादा जयंत पाटील यांच्या भाच्यासाठी अग्रही राहु शकले. पण, छोट्या दादासाठी का नाही.? याचेही उत्तर शोधून सापडले नाही.
वशीला होता म्हणून दादा उपमुख्यमंत्री झाले. नाहीतर, त्यांच्या इतकी चूक कोणी केली असती. तर, त्याला राजकारणातून सन्यास घ्यायला लागला असता. (अर्थात चूक मान्य करुन ते स्वत: सन्यास घेऊन शेती करणार होते. हे त्यांनीच जगजाहीर केले होते.) केवळ पक्ष बदलला म्हणून बबनराव पाचपते व वैभव पिचड यांची काय अवस्था केली. हे तुमच्या डोळयासमोर आहे. स्वत: शरद पवारांनी अनेकांना पळता भुई थोडी केली आहे. पण, इतके सगळे होऊन देखील दादा "नामानिराळे" आहेत. मग, निष्ठावंत रोहित पवारांची चुक काय ? त्यांना अनुभव नाही म्हणून की ते पवार कुटुंबाचा भाग असणे हाच त्यांचा गुन्हा.? तसेतर फार प्रश्न मनात काहुर करुन जातात. नगर जिल्ह्यात रोहित पवार व डॉ. किरण लहामटे हे मंत्री होतील. असे वाटत होते. पण, मामा भलतीच चाल खेळून गेले.साहेब.! कधी काळी का होईना, येत्या पाच वर्षात रोहित पवार मंत्री व्हावेत. हीच मापक अपेक्षा आहे आणि आम्हाला खात्री आहे. ही मागणी बेशक पुर्ण होईल. यात तिळमात्र शंका नाही. फक्त कधी. याची वाट आम्ही आतुरतेने पाहत आहोत. हेच स्मरणात असूद्या.
धन्यवाद
आपलाकार्यकर्ता
=============
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १२५ दिवसात २४५ लेखांचे १४ लाख ८५ हजार वाचक)