"मधुभाऊ नवले व मिनानाथ पांडे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विचार वाटेवर..!!

 अकोले (प्रतिनिधी) :-
                         माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या "कुटुंबाची" ४० वर्षे "अविरत" चालणारी 'परंपरा' २०१९ च्या विधानसभा  निवडणुकीच "संपुष्टात" आली. त्यामुळे, "साहेब आणि सत्ता" हे 'गणित' बदलून गेल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आता "सैरभैर" झाल्याचे दिसू लागले आहे. तळागाळात जे मा. "पिचडप्रेमी" होते. ते आ. "लहामटेप्रेमी" झाले असून, "कट्टर राष्ट्रवादीचा नारा" त्यांच्या तोंडून प्रकर्षाने बाहेर पडू लागला आहे. यात "बडे नेते" देखील कोठे कमी पडत नसल्याचे दिसू लागले आहे. त्याचे उत्तम उदा. म्हणजे, "पुरोगामी चळवळ आणि डाव्या विचारांचे" नेते "मधुभाऊ नवले" आणि "मिनानाथ पांडे" यांनी हळूहळू "राजूरच्या वाटेकडे दुर्लक्ष" करुन "संगमनेरची वाट" जवळ केल्याचे दिसून येत आहे. याचे "दाखले" देत स्पष्ट सांगायचे ठरले, तर "बुवासाहेब नवले पतसंस्थेचा बाहेर शुभेच्छा बॅनर" आणि "फोनोफ्रेंड" ही पडद्याआडच्या मधुभाऊंना काँग्रेसच्या "विचारधारेशी" संलग्न करून जाते. तर, महाविकास आघाडीच्या "शपथविधीसाठी" पांडे यांचे हजर राहणे, इतकेच काय !! मंत्री महोदय "बाळासाहेब थोरात" यांच्या घरी जाऊन त्यांचा "सत्कार, सन्मान" करणे. यातून नेमके काय "प्रतित" होते. !! हे नव्याने सांगायला नको.  ही "बंडाची सुरुवात" आहे असे "जनता" म्हणत असली तरी, हे दोन्ही नेते "पुर्वापार" पुरोगामी आणि डाव्या विचारसारणीचेच आहेत. हे देखील तितकेच खरे आहे. त्यामुळे त्यांनी शुभेच्छा देणे गैर नाही. ही दुसरी वैचारिक बाजू आहे. असे आम्हाला वाटते.!

आता पुन्हा मला टोपी घातली नाही, म्हणजे बरं.!

           सर १९९५ म्हणजे माजी मधुकर पिचड यांच्यासाठी अत्यंत पडता काळ होता. कारण, त्यांच्या सोबत असणारे सिताराम पाटील गायकर साहेबांपासून तर नियमित विरोधात असणाऱ्या भाऊसाहेब हांडे यांच्यापर्यंत सगळे समर्थक आणि विरोधक साहेबांच्या विरोधात एकवटले होते. तरी त्यांनी बाजी मारली. दुर्दैव असे. की,  आता पिचड पिता- पुत्रांनी विकासाच्या मुद्द्यावर बंड पुकारले आणि त्यांची बाजू उलथली. ते सुद्धा बंडखोर सोबत असताना देखील.!! त्यामुळे, हे राजकारण हे कोठून कसे फिरेल सांगता येत नाही.
                        आजकाल निष्ठा, अस्मिता, प्रेम, समानुभूती, मतदारांचा विचार, पक्ष, विचारधारा, अजेंडा, जातीयवाद, धर्मवाद, राष्ट्रप्रेम असे काहीच प्रकार राहिले नाही. हे या राजकारणाने अधोरेखित करून दिले. यातून एक धडा जनतेने चांगला घेतला. की, अजित पवारांनी दाखवून दिले. राजकारणी कोणी कोणाचे विश्वस्त नसतात, आ. थोरात व आ. विखेंनी दाखवून दिले. की,  कोणी कोणाचा विरोधक नसतो, शिवसेना-भाजपने संदेश दिला की, मैत्री फैत्री वेळ आली की आपआपले खरे रंग दाखवत असते. काँग्रेस-शिवसेनेने दाखवून दिले. की, सत्ता मिळत असेल. तर, कितीही कट्टर वैचारिक मदभेद असोत. त्यांना पंचवार्षीक योजनेसारखी स्थगिती दिलीच पाहिजे. उदयनराजें, वैभव पिचड यांच्या पराभवाने धडा दिला. की, ठरविले तर जनता काय करु शकते आणि शरद पवारांच्या धैर्याने दाखवून दिले. की, संपलेला डाव सुद्धा पुन्हा नव्याने मांडता येतो. या सगळ्यांत दुर्दैव असे की, सामान्य कार्यकर्त्यांनी अजूनही त्यांचा हेका सोडला नाही. तो मरेपर्यंत आपला दुष्मण असे समजून आजही निर्बुद्धी कार्यकर्ते एकमेकांशी गेंड्यासारखे लढताना आपण पाहतो आहोत. देव यांना सद्बुद्धी देवोत..!

बॅनर  फाडाफाडी अ सांस्कृतिक उपक्रम

        आज अकोल्यातील राजकीय वातावरण पाहता, ते प्रचंड तणावाचे आहे. जात, धर्म आणि पक्ष यातून राजकीय अस्थिरता दिसू लागली आहे. कोणी बॅनर फाडतय तर कोणी लोकप्रतिनिधींना अश्लिल शिविगाळ करतय, कोणी महापुरुषांचा अपमान करतय तर कोणी धमक्या देऊन राजकारण करू पाहतय.! किती ही अंतस्थ अराजकता आहे. ? येणाऱ्या काळात याचा उद्रेख झाला. तर, गोळीबार आणि मारामारीत रक्ताचे सडे पडतील. म्हणून लढाई वैचारिक झाली पाहिजे. भर गृपवर आईमाय काढून नव्हे.! वैचारिकता म्हणजे काय ? तर, सरळ-सरळ मधुभाऊ नवले, मिनानाथ पांडे यांच्यासारख्या पुरोगामी व्यक्तींसारखी. आज भलेही ही दोघे "मन मारुन" का होईना.! भाजपत आहे. तरी त्यांच्यातील "काॅम्रेडचे रक्त" जीवंत आहे. अर्थात त्यांनी "अपचणी" प्रवेश "पचनी" पडून घेतला तरी "वेश" बदलल्यानंतर "बेस" बदलत नाही. हे त्यांच्या आजच्या कृतीतून दिसून येत आहे.
                     खरतर असे बोलले जाते. की, पिचड साहेबांनी भाजपत जावं हे पांडे यांना मान्य नव्हते. पण, करणार काय ? "गुतली गाय अन फटके खाय" त्यापेक्षा झाकली मुठ सव्वा लाखाची.! अखेर त्यांनी गळ्यात भाजपचा दोरा घातला आणि उदोउदो सुरु केला. त्यांनी काँलेज जिवणापासून कम्युनिष्ट विचारधारा अंगी जोपासली. साहेबांच्या गाडीत बसून कारखान्यावर व्हाईस चेअरमन ते संचालक पदांवर आपले नाव कोरले. १९९५ ला तर साहेबांसोबत दशरथ सावंत, वसंत मनकर, विठ्ठल चासकर यांच्यानंतर विशेष कोणी नव्हते, पण, पांडे यांनी "ही दोस्ती तुटायची नाय" ! असे म्हणत त्यांचा हात आजवर सोडला नाही. म्हणून तर त्यांना महाराष्ट्र राज्याचा आदिवासी मित्र पुरस्कार मिळाला असे म्हणत त्यांच्यावर प्रचंड टिका झाली. पण, जोवर पिचड कुटूंब राष्ट्रवादीच्या विचार धारेवर होते. तोवर जीव गेला तरी बेहत्तर पण, त्यांनी मैत्रीत पिळ पाडला नाही. तालुक्यातील पाटपाणी, रस्ते आणि पाठरभाग यांचा अभ्यास असणारे ते साहेबाचे दिशादर्शक होते. इतकेच काय ! २०१९ च्या निवडणुकीत पठार भागात संगमनेरची मदत व्हावी. यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. पण, त्याला फळ आले नाही. आज साहेब पराभवाच्या दु:खात आहेत. त्यामुळे, भेटीगाठी कमी होत असल्या तरी पांडे साहेबांनी पुन्हा काँग्रेस विचारधारेला जवळ करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यांनी महाविकासआघाडीच्या  शपथविधीला लावलेली हजेरी व बाळासाहेब थोरात यांचा केलेला सन्मान हा तालुक्यात चर्चोचा विषय ठरला आहे.
       
तर दुसरीकडे ज्या बुवासाहेब नवले यांनी अकोल्यात कम्युनिष्ट चळवळीची बीजे रोवली. त्यांचे वारसदार मधुकर नवले यांनी सीपाआय, काँग्रेस, राष्ट्रवादी व नंतर भाजप असा विचारांच्या विरुद्ध राजकीय प्रवास केला. ते देखील काँग्रेसच्या विचारधारेसोबत येऊ लागले आहेत की काय ? असे अस्पष्ट चिन्ह दिसू लागले आहेत. कारण, बाळासाहेब थोरात आमदार झाले. तेव्हा बुवासाहेब नवले पतसंस्थेच्या बाहेर त्यांचे कौतुकास्पद फ्लेक्स लागले नाही. कदाचित पिचड साहेबांच्या पराभवाचा दुखवटा त्यांनी पाळला असे गृहीत धरु.! पण, आता त्यांच्यातील वैचारिक नसा धडधडू लागल्या की काय.! त्यामुळे त्यांनी थोरात साहेबांच्या मंत्रीपद निवडीला शुभेच्छा दिल्या आहेत. आता हे सर्व संस्थात्मक विकासाचे प्रेम म्हणायचे.! की, व्यक्तीप्रेम हे जनतेच्या मनावर आहे.
                       पण, या दोन्ही भाजपच्या नेत्यांना काँग्रेसच्या थोरात साहेबांनी संगमनेरात कारखान्याच्या माध्यमातून संधी दिलेली आहे. त्यामुळे, ते गैर नाही. या पलिकडे देखील ज्या व्यक्तीने वैभव पिचड यांना भाजपत जाण्यासाठी भरी घातले. ते मुग गिळून आहेत. त्यांची विरोधी बाजू म्हणून पिचड साहेबांना स्वगृही आणण्यासाठी हेच वैचारिक मानसे दुवे साधण्याचे काम करु शकतील. हे देखील नाकारता येणार नाही. त्यामुळे, नवले आणि पांडे या दोन्ही व्यक्तींच्या अदृश्य व दुर्लक्षित हलचालींवर जनतेचे बारीक लक्ष असल्याचे दिसून येत आहे. काहीही झाले. तरी, अकोल्याच्या राजकारणात फार मोठा ट्विस्ट पहायला मिळणार आहे. हे बाकी नक्की.!!!

 - सागर शिंदे

=============

                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०७ लेखांचे १४ लाख २ हजार वाचक)